श्री सिद्धरामेश्‍वरांच्या यात्रा सोहळ्यास गुरुवारपासून प्रारंभ 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 9 जानेवारी 2017

देवस्थानचे अध्यक्ष धर्मराज काडादी : भाविकांसाठी एक कोटींचा अपघाती विमा 

सोलापूर - ग्रामदैवत श्री सिद्धरामेश्‍वरांच्या यात्रेतील मुख्य धार्मिक विधींना गुरुवारी (ता. 12) 68 लिंगांना यण्णीमज्जन (तैलाभिषेक) करून सुरवात होणार आहे, अशी माहिती श्री सिद्धेश्‍वर देवस्थान पंचकमिटीचे अध्यक्ष धर्मराज काडादी यांनी रविवारी पत्रकार परिषदेत दिली. यंदाच्या वर्षी यात्रेत येणाऱ्या भाविकांसाठी एक कोटी रुपयांचा अपघाती विमा उतरविण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले. यात्रेतील धार्मिक विधींबाबत पंचकमिटीचे सचिव ऍड. आर. एस. पाटील यांनी माहिती दिली. 

गुरुवारी (ता. 12) सकाळी आठ वाजता परंपरेप्रमाणे श्री मल्लिकार्जुन मठाजवळील हिरेहब्बू मठातून श्री सिद्धरामेश्‍वरांच्या योगदंडाचे प्रतीक असलेल्या नंदीध्वजांची आणि पालखीची मिरवणूक सुरू होईल. ही मिरवणूक नियोजित मार्गाने श्री सिद्धेश्‍वर मंदिरात जाईल. तेथून दुपारी एक वाजता पुन्हा मिरवणूक सुरू होऊन 68 लिंगांना तैलाभिषेक करून रात्री आठ वाजता हिरेहब्बू मठात येईल. 

शुक्रवारी (ता. 13) अक्षता सोहळा संमती कट्ट्यावर होणार आहे. तत्पूर्वी सकाळी सात वाजता हिरेहब्बू वाड्यातून नंदीध्वज मिरवणुकीस प्रारंभ होऊन दुपारी एक वाजता ही मिरवणूक श्री सिद्धेश्‍वर मंदिरात येईल. यानंतर अक्षता सोहळा होईल. या सोहळ्यानंतर 68 लिंगांना तैलाभिषेक करण्यासाठी नंदीध्वज मिरवणुकीने मार्गस्थ होतील. ही मिरवणूक दुसऱ्या दिवशी पहाटे पाच वाजता हिरेहब्बू मठात परत येईल. 

शनिवारी (ता. 14) सायंकाळी पाच वाजता हिरेहब्बू वाड्यातून होमप्रदीपन सोहळ्यासाठी नंदीध्वजांची मिरवणूक सुरू होईल. सोन्या मारुती येथील पसारे यांच्या निवासस्थानासमोर नंदीध्वज मिरवणुकीतील पहिल्या नंदीध्वजास नागफणी बांधण्यात येईल. तसेच इतर नंदीध्वजांना विद्युतरोषणाई करण्यात येईल. तेथून हे नंदीध्वज रात्री 10 वाजता होम मैदानावरील होम कुंडाजवळ पोचतील. होम हवनाचा आणि कुंभार कन्येच्या अग्निप्रवेशाचा कार्यक्रम होणार आहे. यंदाच्या वर्षी नागफणीचा नंदीध्वज पेलण्याचा मान सोमनाथ मेंगाणे यांना लाभला आहे. होमहवन झाल्यानंतर फडकुले सभागृह परिसरात भाकणुकीचा कार्यक्रम होणार आहे. 

रविवारी (ता. 15) होम मैदानावर यात्रेत रात्री आठ वाजता शोभेचे दारूकाम होणार आहे. यानंतर रात्री 11 वाजता श्री सिद्धरामेश्‍वर मंदिराभोवती प्रदक्षिणा घालून त्या दिवसाच्या धार्मिक विधींची सांगता होणार आहे. तर 17 जानेवारी रोजी कप्पडकळी (नंदीध्वजांचे वस्त्रविसर्जन) आणि प्रसादवाटप होऊन धार्मिक कार्यक्रमांची सांगता होणार आहे. 
या पत्रकार परिषदेस श्री सिद्धेश्‍वर देवस्थान पंचकमिटीचे अध्यक्ष धर्मराज काडादी, गुंडप्पा कारभारी, मल्लिकार्जुनप्पा वाकळे, ऍड. आर. एस. पाटील, मल्लिनाथ जोडभावी, बाळासाहेब भोगडे, यात्रा कमिटीचे अध्यक्ष रामकृष्ण नष्टे, अप्पासाहेब कळके, चिदानंद वनारोटे, जी. एन. कुमठेकर, सुभाष मुनाळे, महादेव चाकोते, काशिनाथ दर्गोपाटील, गौरीशंकर डुमणे, गिरीश गोरनळ्ळी, सोमशंकर देशमुख, ऍड. मिलिंद थोबडे, महेश अंदेली उपस्थित होते. 

Web Title: solapur siddharameshwar yatra