सोलापुरच्या पाणीपुरवठा केंद्रात कुणीही यावे टॅंकर भरून न्यावे

विजयकुमार सोनवणे 
रविवार, 20 मे 2018

ज्या ठिकाणी टॅंकरच्या नोंदी करायच्या आहेत, त्या ठिकाणचा कारकून गायब होता. त्यामुळे या नगरसेवकांनीच टॅंकरच्या नोंदी घेतल्या.

सोलापूर - शहराला चार दिवसाआड पाणीपुरवठा होत असताना भवानी पेठ
पाणीपुरवठा केंद्रात मात्र कुणीही यावे टॅंकर भरून न्यावे असा प्रकार सुरु आहे. नोंदी नाहीत टॅंकर मात्र भरभरून नेले जात आहेत. महापालिकेने नियुक्त केलेल्या टॅंकर मक्तेदारांनी महापालिकेस लाखो रुपयांचा चुना लावल्याच्या पुराव्याचे गिफ्ट भाजपच्या नगरसेवकांनी आयुक्तांना दिले होते. तरीसुद्धा हे प्रकार थांबले नाहीत. 

रविवारी सकाळी नगरसेवक नागेश वल्याळ आणि संतोष भोसले यांनी अचानकपणे या केंद्राला भेट दिली. त्यावेळी टॅंकरबरोबरच काही नागरीक वाहनातून ड्रम भरून पाणी नेत असल्याचे त्यांना दिसले. ज्या ठिकाणी टॅंकरच्या नोंदी करायच्या आहेत, त्या ठिकाणचा कारकून गायब होता. त्यामुळे या नगरसेवकांनीच टॅंकरच्या नोंदी घेतल्या.

एकीकडे चार दिवसाआड पाण्यामुळे नियमित कर भरणारे नागरीक त्रस्त झाले असताना फुकटे मात्र बिनधास्त पाहिजे तितके पाणी विनाअडथळा घेऊन जात असल्याचे दिसून आले. विभागीय कार्यालय क्रमांक दोनअंतर्गत लाखो रुपयांचा गैरव्यवहार झाल्याचे पुरावे या नगरसेवकांनी आयुक्तांना दिले आहेत. गैरव्यवहाराचे पुरावे गिफ्टमध्ये देण्याची ही राज्यातील पहिलीच घटना असावी. पुरावे दिल्यामुळे आता कारवाई अपेक्षित आहे.

एखादा नगरसेवक घोटाळा बाहेर काढतो तेव्हा संबंधित त्याच्याशी संपर्क करतात व प्रकरण मिटवण्याचा प्रयत्न करतात. या घटनेत अद्याप तसे दिसले नाही, मात्र ज्यांनी हा घोटाळा बाहेर काढला, त्यांनीच तो तडीस न्यावा अशी समस्य सोलापूरवासियांची अपेक्षा आहे. प्रशासनाने दिलेल्या माहितीवर समाधान न होता मुळापर्यंत गेले तर मोठा घोटाळा बाहेर येण्याची शक्यता आहे.

आयुक्तांच्या मागणीनुसार घोटाळ्यांचे पुरावे त्यांना दिले आहेत. हे प्रकरण तडीस लावण्यासाठी त्यांच्या सहकार्याची अपेक्षा आहे. त्यांनी सहकार्य नाही केले तरी आम्ही हे प्रकरण तडीस लावू.
- नागेश वल्याळ, नगरसेवक

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

Web Title: The Solapur tanker system is unconditional