सोलापूरच्या व्यापाऱ्यांना 19 लाखांचा गंडा !

सोलापूरच्या व्यापाऱ्यांना 19 लाखांचा गंडा !

सोलापूर : रमेश जैन असे नाव सांगून सोलापुरातील नऊ व्यापाऱ्यांकडून घरासाठी लागणाऱ्या 19 लाख 10 हजार 836 रुपयांच्या विविध वस्तू घेतल्या. काहींना धनादेश दिले तर काहींना आरटीजीएसद्वारे पैसे देतो म्हणून विश्‍वास संपादन केला. पाच दिवसांपूर्वी रमेश जैन हा लाखोंच्या वस्तू घेऊन सोलापुरातून गायब झाला आहे. या प्रकरणात विजयपूर नाका पोलिसांत जैन याच्यासह कामगारावर गुन्हा दाखल झाला आहे.

अभिषेक श्रीनिवास सोनी (रा. भवानी पेठ) यांनी विजयपूर नाका पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. या प्रकरणात रमेश जैनसह त्याचा कामगार केतन सूर्यकांत बनसोडे (रा. ओमनम: शिवाय नगर, हत्तुरे वस्ती) याच्यावर गुन्हा दाखल झाला असून पोलिसांनी बनसोडेला अटक केली आहे.

पन्हाळी पत्र्याचे व्यापारी अभिषेक सोनी यांना रमेश जैन याने मोबाईलवर संपर्क साधला. व्हॉट्‌सऍपवरून पत्र्याची ऑर्डर दिली. सोनी यांनी 8 नोव्हेंबरला सोलापुरातील हरेकृष्ण विहार येथील बाफना एंटरप्रायझेस या ठिकाणी साहित्य पाठवले. त्यावेळी रमेश जैन हा स्वतः तिथे हजर होता. त्याने 10 नोव्हेंबरला सोनी यांना दोन धनादेश पुढील तारखांचे दिले. त्यानंतर 13 नोव्हेंबरला रमेश जैन याने सोनी यांना व्हॉट्‌सऍपवर पुन्हा एकदा पत्र्यांची ऑर्डर दिली. त्याची रक्कम सोमवारी आरटीजीएसद्वारे कंपनीच्या नावे पाठवतो, असे सांगितले. जैन याने यापूर्वीच्या मालासाठी धनादेश दिल्याने सोनी यांनी विश्‍वास ठेवून साहित्य पाठविले. 16 नोव्हेंबरला पत्र्याच्या बिलासाठी जैन यास संपर्क साधला त्याचे दोन्ही मोबाईल बंद असल्याचे लक्षात आले.

पैशाच्या चौकशीसाठी जुळे सोलापुरातील पत्त्यावर सोनी व त्यांचे सहकारी गेले, मात्र जैन सापडला नाही. रमेश जैन याने अभिषेक सोनी यांच्याकडून पाच लाख 32 हजार 170 रुपयांचे पन्हाळी पत्रे घेतले. मोईन शेख यांच्याकडून 89 हजार 420 रुपयांचे पीव्हीसी कारपेट घेतले. उमर एजाज दलाल यांच्याकडून 93 हजार 834 रुपयांचे प्लायवूड आणि सनमाईक घेतले. केतन महिंद्र शहा यांच्याकडून एक लाख 23 हजार 990 रुपयांच्या इलेक्‍ट्रॉनिक वस्तू घेतल्या. सुरेश चंद्रशेखर स्वामी यांच्याकडून एक लाख 77 हजार 549 रुपयांचे नळाचे साहित्य घेतले. नवराम चौधरी यांच्याकडून दोन लाख 44 हजारांचे लाइट हाऊसचे साहित्य घेतले. बाहुबली गांधी यांच्याकडून तीन लाख 29 हजार 800 रुपयांचे फर्निचरचे साहित्य घेतले. रमेशभाई चौधरी यांच्याकडून 82 हजारांचे किचन ट्रॉलीचे साहित्य घेतले. वैभव वल्लभप्रभू यांच्याकडून दोन लाख 37 हजार 670 रुपयांच्या इलेक्‍ट्रॉनिक वस्तू घेतल्या. यातील काहींना बाफना इंटरप्रायजेस या फर्मचा मालक केतन बनसोडे याच्या नावाने धनादेश दिले. काहींना आरटीजीएस रक्कम देतो, असे सांगून विश्‍वास संपादन केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पोलिस उपनिरीक्षक सचिन बनकर तपास करीत आहेत.

केतन बनसोडेला ठेवले होते कामावर
रमेश जैन याने केतन बनसोडे यास कामावर ठेवले होते. जैन याने सर्व डॉक्‍युमेंट केतन बनसोडे याच्या नावाने बनविले. जैन दीड-दोन महिन्यांपासून सोलापुरात होता. 15 दिवसांपासून त्याने शहरातील विविध व्यापाऱ्यांशी संपर्क करून वस्तू खरेदी केल्या. 16 नोव्हेंबरला तो गायब झाला. 

नागरिकांचा विश्‍वास संपादन करून रमेश जैन याने फसवणूक केली आहे. या प्रकरणात त्याच्याकडील कामगार केतन बनसोडे यास अटक केली आहे. रमेश जैन याने शहरातील आणखी काही लोकांची फसवणूक केली असण्याची शक्‍यता आहे. - सचिन बनकर, पोलिस उपनिरीक्षक

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com