सोलापूर विद्यापीठाने तत्काळ चुकीची दुरुस्ती करावीः उत्पात

ahilyadevi holkar
ahilyadevi holkar

पंढरपूर: सोलापूर विद्यापीठाचे नामकरण करताना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर असे चुकीचे करण्यात आले आहे. वास्तविक पाहता ऐतिहासिक कागदपत्रांमध्ये 'अहल्या' असे नाव आहे तसेच पुण्यश्लोक हा पुल्लिंगी शब्द आहे, त्यामुळे नामकरण पुण्यश्लोकी अहल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ असे करायला हवे होते. विद्यापीठाने तातडीने चुकीची दुरुस्ती केली पाहिजे, असे मत भागवताचार्य वा. ना. उत्पात यांनी आज (शुक्रवार) 'सकाळ'शी बोलताना व्यक्त केले.

श्री. उत्पात म्हणाले, 'अहिल्या मधील आही म्हणजे सर्प. म्हणजे सर्प आणणारी असा होतो. याउलट अहल्या याचा अर्थ जीवनामध्ये, जगामध्ये प्रकाश आणणारी असा दिव्य अर्थ आहे. ही वस्तुस्थिती असताना बहुतांश मंडळी अहल्या ऐवजी अहिल्या असा चुकीचा नामप्रयोग करतात. त्यामुळे तो चुकीचा शब्द प्रचलित झाला आहे. परंतु, म्हणून विद्यापीठाने नाव देताना चुकीचे देणे योग्य नाही. चुकीची दुरुस्ती विद्यापीठांने करायला हवी होती. त्याचप्रमाणे पुण्यश्लोक हा पुल्लिंगी शब्द आहे. अहिल्यादेवींच्या नावापुढे वापरताना पुण्यश्लोकी असा स्त्रीलिंगी शब्द वापरायला हवा होता.'

याविषयीचे संदर्भ देताना श्री. उत्पात म्हणाले, 'महान इतिहासकार दत्तो वामन पोतदार यांनी लेख लिहिलेला आहे, त्याचे शीर्षकच अहल्यादेवी असे आहे. पेशव्यांकडून अहल्याबाईंना जी पत्रे गेली आहेत, त्यामध्ये गंगाजल समान पवित्र मातोश्री अहल्यादेवी असा उल्लेख आहे. दासगणू महाराजांनी अहल्याबाईंच्या जीवनावर किर्तन कथा लिहिली आहे, त्यातही अहल्या असाच उल्लेख आहे. मी लिहिलेल्या पुस्तकाचे नाव देखील अहल्यादेवी असेच आहे. विद्यापीठाने नामकरण करताना ते बिनचूक करणे अपेक्षित होते. विद्यापीठात मराठी, इतिहास आणि संस्कृतचे अनेक प्राध्यापक आहेत. त्यांच्या ही गोष्ट कशी लक्षात आली नाही. त्या मंडळींनी तरी विचार करायला हवा होता.'

कालचा आपण धनगर समाजाचे नेते गणपतराव देशमुख, श्री विठ्ठल-रुक्‍मिणी मंदिर समितीचे माजी अध्यक्ष अण्णा डांगे यांच्याशी संपर्क साधून त्यांचे या विषयाकडे लक्ष वेधले आहे. त्यांनीही नामकरण योग्य व्हायला हवे, असे मत व्यक्त केले आहे. त्यामुळे शासनाने आणि विद्यापीठ प्रशासनाने विद्यापीठ नामांतरातील चूक सुधारून तातडीने दुरुस्त केली पाहिजे, असे मत श्री उत्पात यांनी व्यक्त केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com