#Solapur : नवी पेठेत सोमवारपासून वाहनांना बंदी! कारण.. 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 12 डिसेंबर 2019

नवी पेठ परिसरात नेहमीच वाहतुकीचा अडथळा निर्माण होऊन अपघाताच्या किरकोळ घटना घडत असतात. यावर नियंत्रण येण्यासाठी तसेच नागरिकांना जाणे-येणे गैरसोयीचे होऊ नये यासाठी शहर वाहतूक शाखेच्या वतीने उपाययोजना करण्यात येत आहे.

सोलापूर : नवी पेठ परिसरात सोमवारपासून (ता. 16) 5 जानेवारी 2020 पर्यंत "नो व्हेईकल झोन' करण्यात येत आहे. नवी पेठ परिसरातील वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी शहर वाहतूक शाखेच्या वतीने हा निर्णय घेण्यात आला आहे.

हेही वाचा : मित्राकडे जेवण करून घराकडे निघाला अन्... 

व्यापाऱ्यांची केली होती मागणी 
नवी पेठ परिसरातील बाजारपेठेत शहरातील व शहराबाहेरील नागरिकांची कायमच वर्दळ असते. येथे नेहमीच वाहतुकीचा अडथळा निर्माण होऊन अपघाताच्या किरकोळ घटना घडत असतात. यावर नियंत्रण येण्यासाठी तसेच नागरिकांना जाणे-येणे गैरसोयीचे होऊ नये यासाठी शहर वाहतूक शाखेच्या वतीने उपाययोजना करण्यात येत आहे. गेल्या आठवड्यात वाहतूक शाखेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या परिसराची पाहणी केली होती. नवी पेठ व्यापारी असोसिएशनसोबत झालेल्या चर्चेत नवी पेठ परिसरात "नो व्हेईकल झोन' करण्यासंदर्भात सूचना समोर आली होती. त्यानुसार पोलिसांनी हा निर्णय घेतला आहे.

हेही वाचा : नोकरीचे आमिष; वाचा कसे फसवले तरुणीला..

या मार्गावर वाहनांना बंदी 
जुनी महापालिका इमारत ते राजवाडे चौक, सुभाष चौक ते बैलगोठा पार्किंग. 

हे आहेत पर्यायी मार्ग 
शिवस्मारक, शिंदे चौक, राजवाडे चौक ते पुढे. राजवाडे चौक, शिंदे चौक, शिवस्मारक ते पुढे. सरस्वती चौक, सुभाष चौक, लकी चौक, आसार मैदानापासून पुढे. 
सरस्वती चौक, नवी वेस पोलिस चौकी, मेकॅनिक चौक, शिवाजी चौक, काळी मशीद, शिवस्मारकपासून पुढे. लकी चौक, आसार मैदानापासून पुढे. 

येथे असेल पार्किंगची व्यवस्था 
मेकॅनिक चौककडून येणाऱ्या वाहनांसाठी : जुनी महानगरपालिका परिसर. 
शिवस्मारककडून येणाऱ्या वाहनांसाठी : जुना बैलगोठा मेजर शॉपिंग सेंटर पार्किंग. 
शिवाजी चौकाकडून प्रत्येक येणाऱ्या वाहनांना : सायंकाळी 6 ते रात्री 10 या वेळेत इंदिरा गांधी कन्या प्रशाला मैदान. 
सरस्वती चौक, दत्त चौकाकडून येणाऱ्या वाहनांसाठी : किल्ला बाग कंपाउंड लगत 

पोलिस अधिकारी म्हणतात.. 
शहरातील सर्व नागरिकांनी नवी पेठ परिसरात खरेदीस व अन्य कामांसाठी जाताना आपली वाहने ठरवून दिलेल्या ठिकाणीच पार्किंग करावीत. "नो व्हेईकल झोन' परिसरात वाहनांना प्रवेश बंदी आहे. पोलिसांच्या आदेशाचे उल्लंघन केल्यास कारवाई करण्यात येईल. 
- संतोष काणे, 
पोलिस निरीक्षक, शहर वाहतूक शाखा
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: #Solapur : Vehicles banned in Navi Peth