पाण्यासाठी सोलापूरच्या हद्दवाढ भागात रांगा 

solapur
solapur

सोलापूर : शहर व हद्दवाढ भागातील नागरिकांना आता तीव्र पाणीटंचाई जाणवू लागली आहे. विशेषतः हद्दवाढ भागात टंचाईची तीव्रता जास्त असून, पाण्यासाठी रांगा लागण्यास सुरवात झाली आहे. दरम्यान, टाकळी येथील भीमा नदीच्या पात्रातून पाण्याची चोरी करणाऱ्यांविरुद्ध फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे निवेदन विरोधी पक्षनेते शिवसेनेचे महेश कोठे यांनी आयुक्त दीपक तावरे यांना दिले. या पाणीचोरीसंदर्भात "सकाळ'मध्ये बातमी प्रसिद्ध झाली होती. 

शहराला पाणीपुरवठा होणाऱ्या औज बंधारा व हिप्परगा तलावातील पाणी संपले आहे. त्यामुळे नियोजन करतेवेळी विशेषतः हद्दवाढ भागाचे नियोजन करताना प्रशासनाला कसरत करावी लागत आहे. महिलांना पाण्यासाठी रस्ता ओलांडून जावे लागते. पाणी भरून रस्ता ओलांडेपर्यंत त्यांचा जीव मुठीतच असतो. विडी घरकुल परिसरात पाण्याची टाकी आहे, मात्र त्या ठिकाणीही अपुरा पाणीपुरवठा होतो. तीन दिवसाआड केला जाणारा पाणीपुरवठाही आता चार ते पाच दिवसांआड होत आहे. पाणीपुरवठ्याच्या बाबतीत महापालिकेचा नियोजनशून्य कारभार नागरिकांच्या असंतोषास कारणीभूत ठरत आहे. 
शिवसेनेचे आयुक्तांना निवेदन टाकळी येथील पाणीचोरीप्रकरणी संबंधितांवर फौजदारी गुन्हे दाखल करावेत, असे निवेदन विरोधी पक्षनेते महेश कोठे यांनी दिले. नागरिक प्रचंड त्रस्त असून लोकप्रतिनिधीना नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे. एकीकडे अशी गंभीर परिस्थिती असताना दुसरीकडे टाकळी पंपहाऊस जवळच राजरोसपणे टॅंकरमध्ये मोटार लावून पाणी भरुन रस्त्याच्या कामासाठी वापरत असल्याचे आढळले आहे. सोलापुरकरांना पिण्यासाठी हे पाणी राखीव असताना अशा पध्दतीने इतर कारणांसाठी पाण्याचा वापर होणे योग्य नाही. पाणी नेणाऱ्या मक्तेदारावर व कोणी अधिकारी दोषी असल्यास सबंधित अधिका-यावर फौजदारी गुन्हा दखल करावा, असे निवेदनात म्हटले आहे. यावेळी नगरसेवक राजकुमार हंचाटे, गुरुशांत धुत्तरगावकर, विठ्ठल कोटा, विनायक कोंड्याल, प्रथमेश कोठे, शशीकांत कैंची व नगरसेविका कुमुद अंकाराम उपस्थित होते. 

पाणीपुरवठ्याचे वेळापत्रक विस्कळीत होणार नाही. आयुक्त 
सोलापूरचा पाणीपुरवठा आणि त्याचे वेळापत्रक विस्कळीत होणार नाही, याची खबरदारी प्रशासन घेत असल्याची माहिती पालिका आयुक्त दीपक तावरे यांनी पक्षनेते संजय कोळी यांना दिली. उजनी धरणातून भीमा नदीच्या पात्रात सोडलेले पाणी नियमित वेळेत औज बंधाऱ्यात पोचेल. त्यामुळे शहराचा पाणीपुरवठा विस्कळीत होणार नाही, असे आयुक्तांनी सांगितले. दरम्यान, बेकायदा पाणी उपसा करणाऱ्यांवर महापालिका प्रशासनाने कारवाई करावी, या मागणीचे पत्र श्री. कोळी यांनी दिले. अंदाजपत्रक आणि झोन निर्मितीचा कार्यवाही तातडीने करावी, असेही निवेदनात म्हटले आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com