सोलापूर जिल्ह्यात पाणी खोल खोल...

अशोक मुरुमकर
सोमवार, 8 ऑक्टोबर 2018

सोलापूर - यंदा पाऊस कमी पडल्याचा फटका पाणीपातळीला बसला आहे. जिल्ह्यातील भूजल आणखी २.२८ मीटरने खाली गेले असून, पाच वर्षांतील ही सर्वांत जास्त खाली गेलेली पातळी आहे. त्यावरून येणाऱ्या काळात टंचाई कशी असेल याचा अंदाज येत असून, पाण्याचा काटकसरीने वापर करणे हाच एकमेव पर्याय आपल्यापुढे आहे.

सोलापूर - यंदा पाऊस कमी पडल्याचा फटका पाणीपातळीला बसला आहे. जिल्ह्यातील भूजल आणखी २.२८ मीटरने खाली गेले असून, पाच वर्षांतील ही सर्वांत जास्त खाली गेलेली पातळी आहे. त्यावरून येणाऱ्या काळात टंचाई कशी असेल याचा अंदाज येत असून, पाण्याचा काटकसरीने वापर करणे हाच एकमेव पर्याय आपल्यापुढे आहे.

जिल्ह्यात यंदा फक्त ३९ टक्के पाऊस पडला आहे. सरकार, पाणी फाउंडेशन व स्वयंसेवी संस्थांनी पाणीपातळी वाढावी व दुष्काळाशी दोन हात करण्यासाठी विविध उपाययोजना केल्या. जलयुक्त शिवार, ओढ्यातील गाळ काढणे, माळरानावर घेतलेले खड्डे हा त्याचाच भाग. मात्र पुरेशा प्रमाणात पाऊस न पडल्याने सर्व कामांवर पाणी पडले आहे. पाणीपातळी वाढण्यापेक्षा पाच वर्षांत जेवढी पातळी खाली गेली नव्हती तेवढी यंदा भूजल पातळी खोल गेली आहे. पाच वर्षांतील सरासरी पाणीपातळी ४.४२ मीटर होती. यंदा ती ६.७० मीटर आहे. यात २.२८ मीटरची तफावत आहे.

करमाळा तालुक्‍यातील सर्वांत जास्त म्हणजे ३.०८ मीटरने पाणीपातळी खाली गेली असून, त्यापाठोपाठ मोहोळमध्ये ३.०२, तर सांगोल्याची पाणीपातळी ३.०१ मीटरने खाली गेली आहे. 

भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेनी पाणीपातळी मोजली आहे. त्यात यंदा एकाही तालुक्‍याच्या पाणीपातळीत वाढ झाली नसल्याचे दिसत आहे. पंढरपूर तालुक्‍याची पाणीपातळी सर्वांत कमी म्हणजे उणे ०.८१ मीटर आहे. ती सुद्धा प्लसमध्ये नाही. त्यापाठोपाठ बार्शी तालुक्‍याची पाणीपातळी आहे. तेथे १.५२ मीटरने पाणीपातळी खाली गेली आहे. उत्तर सोलापूरची पाणीपातळी १.४३, माढ्याची २.८९, तर अक्कलकोटची पाणीपातळी २.५० मीटरने खाली गेली आहे.

यंदा पाणीपातळी खाली गेली आहे. त्याचा अहवाल ग्रामीण पाणीपुरवठा विभागाला दिला आहे. जिल्ह्यात फक्त ३९ टक्केच पाऊस झाल्याचा हा परिणाम आहे. भूजल पातळी वाढावी म्हणून कामे चांगली झाली आहेत. मात्र पाऊस झाला नाही. सरासरी ९० टक्‍क्‍यांपर्यंत पाऊस झाला असता तरीही प्लसमध्ये पातळी आली असती.
- मुस्ताक शेख, वरिष्ठ भूवैज्ञानिक, भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा, सोलापूर

Web Title: Solapur Water Shortage Water Level Decrease