या जिल्हा परिषदेत रंगले शिक्षणाधिकारी पदाचे नाट्य 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 4 डिसेंबर 2019

0 सोलापूरच्या माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांचा पदभार सुलभा वठारे यांच्याकडे 
0 उपशिक्षणाधिकारी विष्णू कांबळे यांना प्रशासनाचा आला फोन 
0 शिक्षणाधिकारी राठोड यांच्याकडील "माध्यमिक'चा पदभार काढला 
0 शिक्षणाधिकारी सूर्यकांत पाटील वैद्यकीय रजेवर 

सोलापूर : जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षणाधिकारी पदाचा पदभार सोमवारी (ता. 2) उपशिक्षणाधिकारी सुलभा वठारे यांच्याकडे देण्यात आला. तत्पूर्वी प्राथमिकचे उपशिक्षणाधिकारी विष्णू कांबळे यांना माध्यमिकचा पदभार घेण्याबाबतचा फोन सामान्य प्रशासन विभागातून गेला होता. पण, त्यानंतर प्रत्यक्षात पदभार हा वठारे यांच्याकडे दिला गेला. सेवाज्येष्ठ असणाऱ्या कांबळे यांना "निरंतर'चा पदभार देण्याचे आदेश मुख्य कार्यकारी अधिकारी प्रकाश वायचळ यांनी दिले. यावरून "माध्यमिक'च्या पदभाराचे नाट्य सोमवारी जिल्हा परिषदेत पाहायला मिळाले. 

हेही वाचा : अन्यथा पाच वर्ष सरकार टिकणार नाही 

सोमवारी (ता. 2) दुपारी दीडच्या सुमारास सामान्य प्रशासन विभागातून सेवाज्येष्ठ असणाऱ्या कांबळे यांना फोन गेला. आपल्याकडे माध्यमिक शिक्षण विभागाचा पदभार देण्यात येणार असल्याचे त्यांना सांगण्यात आले. मात्र, अर्ध्या तासातच पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले. शेवटी दुपारी दोनच्या सुमारास वठारे यांच्याकडे पदभार देण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला. सेवाज्येष्ठ असणारे कांबळे नाराज होऊ नये म्हणून त्यांच्याकडे "निरंतर'च्या शिक्षणाधिकाऱ्याचा पदभार देण्याचे आदेश मुख्य कार्यकारी अधिकारी वायचळ यांनी दिले. दरम्यान, प्राथमिकचे उपशिक्षणाधिकारी असलेल्या कांबळे यांनी निरंतरचा पदभार न स्वीकारण्याचा निर्णय घेतल्याची चर्चा मंगळवारी जिल्हा परिषदेच्या आवारात सुरू होती. "माध्यमिक'चा पदभार देण्याचा निर्णय सेवाज्येष्ठता डावलून प्रशासनाने घेतलाच कसा असा सवाल उपस्थित केला जात आहे. 

हेही वाचा : मूल दत्तक घ्यायचे आहे, तर मग अशी आहे प्रक्रिया 

जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षण विभागाचे शिक्षणाधिकारी सूर्यकांत पाटील हे वैद्यकीय रजेवर गेले आहेत. त्यांच्या पश्‍चात पदभार प्राथमिकचे शिक्षणाधिकारी संजयकुमार राठोड यांच्याकडे दिला होता. पण, नोव्हेंबरमध्ये झालेल्या सर्वसाधारण सभेत त्यांच्याकडील पदभार काढून घेण्याची मागणी काही सदस्यांनी केली होती. त्यानुसार सोमवारी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी श्री. राठोड यांच्याकडील पदभार काढून वठारे यांच्याकडे दिला आहे. 

शिक्षण आयुक्त व सर्वसाधारण सभा 
ध्यमिकचा पदभार यापूर्वीही श्री. राठोड यांच्याकडे शिक्षण आयुक्तांच्या सांगण्यावरून दिला होता. पण, सर्वसाधारण सभेच्या मागणीमुळे त्यांच्याकडील पदभार काढून सोमवारी तो वठारे यांच्याकडे दिला. श्री. राठोड यांना पहिल्यांदा आयुक्तांच्या सांगण्यावरून पदभार दिला. पण, दुसऱ्या वेळेला श्री. कांबळे यांच्या नावाची चर्चा असतानाही श्री. राठोड यांच्याकडे तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी पदभार दिला होता. आता तिसऱ्यांदा श्री. कांबळे यांना फोन आला असतानाही पदभार वठारेंकडे देण्यात आला. यावरून जिल्हा परिषदेतील या पदभार नाट्यामुळे जिल्ह्याच्या शिक्षण क्षेत्रात तर्क-वितर्कांना उधाण आले आहे. 
महाराष्ट्र 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: solapur zilla parishad education department drama