शिक्षकांना दोन दिवसांत १२५००चा ॲडव्हान्स अन्‌ पगार! शिक्षणाधिकाऱ्यांचे सुटीदिवशीही काम | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Cash
शिक्षकांना दोन दिवसांत १२५००चा ॲडव्हान्स अन्‌ पगार! शिक्षणाधिकाऱ्यांचे सुटीदिवशीही काम

शिक्षकांना दोन दिवसांत १२५००चा ॲडव्हान्स अन्‌ पगार! शिक्षणाधिकाऱ्यांचे सुटीदिवशीही काम

सोलापूर : दिवाळीपूर्वी शिक्षकांचे वेतन होणार असून त्यांना प्रत्येकी साडेबारा हजारांचा ॲडव्हान्स देखील मिळणार आहे. सोलापूर जिल्ह्यातील शिक्षकांच्या ॲडव्हान्ससाठी जवळपास नऊ कोटींची मागणी करण्यात आली आहे. तर प्राथमिक व माध्यमिक शिक्षकांच्या वेतनासाठी जवळपास १२० कोटी रुपये लागणार आहेत.

शाळांना दिवाळीनिमित्त २० ऑक्टोबरपासून सुट्ट्या आहेत. २१ ऑक्टोबरला वसुबारसाने दिवाळीची सुरवात होईल. तत्पूर्वी, शिक्षकांचे वेतन व ॲडव्हान्स एकत्रित मिळणार आहे. यंदा शिंदे-फडणवीस सरकारकडून दिवाळीचे अग्रीम वाढेल, अशी आशा होती. पण, राज्याची आर्थिक स्थिती बिकट असल्याने पूर्वीप्रमाणेच शिक्षकांना व इतर राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना प्रत्येकी १२ हजार ५०० रुपयांचाच ॲडव्हान्स दिला जाणार आहे. ती रक्कम संबंधित कर्मचाऱ्याच्या वेतनातून टप्प्याटप्प्याने कपात केली जाईल. दरम्यान, दिवाळीची सुट्टी आता तीन दिवसांवर (गुरुवारपासून) सुरु होईल. शिक्षकांना दिवाळीपूर्वी वेतन मिळावे, त्यांची कोणतीही बिले प्रलंबित राहू नयेत म्हणून शिक्षणाधिकारी किरण लोहार यांनी रविवारी (ता. १६) कार्यालयात येऊन शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, केंद्रप्रमुख, माढा प्रशालेच्या वेतनाचे कामकाज पूर्ण केले. जिल्हा परिषदेच्या सहा हजार ५१५ शिक्षक, २३ केंद्रप्रमुख, माढा प्रशालेतील १५ कर्मचाऱ्यांसह जिल्ह्यातील १५० शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना हा अग्रीम वितरीत केला जाणार आहे.

अग्रीमची रक्कम

  • शिक्षक : ८,१४,३७,५००

  • केंद्रप्रमुख : २८,७५,०००

  • कार्यालयीन कर्मचारी : १८,७५,०००

  • माढा प्रशाला : १६,५००

दोन-चार दिवसांत मिळेल ॲडव्हान्सची रक्कम

जिल्ह्यातील झेडपीच्या प्राथमिक शिक्षकांच्या ॲडव्हान्सपोटी जवळपास साडेआठ कोटींची मागणी शासनाकडे केली आहे. शिक्षकांना दिवाळीपूर्वी वेतन मिळणार असून त्यांची बिलेदेखील तयार करण्यात आली आहेत. दोन-चार दिवसांत वेतन व ॲडव्हान्स शिक्षकांसह शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना मिळेल.

- किरण लोहार, प्राथमिक शिक्षणाधिकारी, सोलापूर

प्राथमिक शाळा भरणार ५ नोव्हेंबरपासून

दिवाळीनिमित्त प्राथमिक शाळांमधील शिक्षकांना २० ऑक्टोबर ते ४ नोव्हेंबरपर्यंत (१५ दिवस) सुट्ट्या आहेत. माध्यमिक शाळा ८ नोव्हेंबरपासून सुरु होतील. दरम्यान, दिवाळी सत्र परीक्षेतून विद्यार्थ्यांची गुणवत्ता लक्षात येईल. त्यामुळे दिवाळी सुट्ट्यानंतर शाळा सुरु होताच अभ्यासात पिछाडीवर असलेल्या विद्यार्थ्यांना उपचारात्मक अध्यापन करावे लागणार आहे. त्यादृष्टीने प्राथमिक शिक्षण विभाग नियोजन करणार आहे.