‘चालक’साठी १२७३ उमेदवारांची दांडी तर २५६ अपात्र; ९ जानेवारीपासून 'शिपाई'साठी मैदानी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पोलिस मैदानी चाचणी
‘चालक’साठी १२७३ उमेदवारांची दांडी तर २५६ अपात्र; ९ जानेवारीपासून 'शिपाई'साठी मैदानी

‘चालक’साठी १२७३ उमेदवारांची दांडी तर २५६ अपात्र; ९ जानेवारीपासून 'शिपाई'साठी मैदानी

सोलापूर : सोलापूर शहर पोलिस आयुक्तालयातर्फे सुरवातीला चालक पदांसाठी मैदानी चाचणी घेतली जात आहे. आतापर्यंत चार हजार २०० उमेदवारांना बोलावले होते, पण त्यातील तब्बल एक हजार २७३ उमेदवार मैदानीला आलेच नाहीत. तर २५६ उमेदवार अपात्र ठरले आहेत. आणखी दोन दिवस चालकांसाठी मैदानी चाचणी चालेल. त्यानंतर शिपाई पदांसाठी मैदानी घेतली जाणार आहे.

शहर पोलिस आयुक्तालयाच्या माध्यमातून चालकांची ७३ तर शिपायांची ९८ पदे भरली जात आहेत. चालकांसाठी पाच हजार ५५८ आणि शिपाई पदांसाठी सहा हजार १२१ उमेदवारांनी अर्ज केले आहेत. पहिल्यांदा २ जानेवारीपासून चालकांसाठी मैदानी चाचणी घेतली जात आहे. पुरुष उमेदवारांची मैदानी झाल्यानंतर आता महिला उमेदवारांची मैदानी चाचणी पार पडत आहे. मैदानी चाचणीत गोळाफेक, १०० व १६०० मीटर धावणे (पुरुषांसाठी) आणि महिलांसाठी गोळाफेक आणि १०० मीटर व ८०० मीटर धावणे, चालक पदांच्या उमेदवारांसाठी ‘कौशल्य’ चाचणी अतिरिक्त आहे. दुसऱ्या टप्प्यात शिपाई पदांसाठी मैदानी होणार असून दररोज ९०० उमेदवारांना बोलावले जाईल, अशी माहिती पोलिस उपायुक्त अजित बोऱ्हाडे यांनी दिली. ९ जानेवारीपासून त्याला प्रारंभ होणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

आतापर्यंत उमेदवारांची स्थिती (चालक)

  • एकूण अर्जदार

  • ५,५५८

  • चाचणीसाठी बोलावलेले

  • ४,२००

  • अनुपस्थित उमेदवार

  • १,२७३

  • अपात्र उमेदवार

  • २५६

  • अजून शिल्लक उमेदवार

  • १,३५८

एका पदासाठी दहा जणांची निवड

शहर पोलिस दलातर्फे ७३ चालक आणि ९८ शिपायांची पदे भरली जात आहेत. तर ग्रामीण पोलिसांकडून २८ चालक आणि २६ पोलिस शिपायांसाठी भरती प्रक्रिया सुरू आहे. दोन्हीकडे मिळून साडेचौदा हजार अर्ज आले आहेत. पण, अर्जांची संख्या मोठी असली तरीदेखील गैरहजर उमेदवारांची संख्या लक्षणीय आहे. काहीजण अपात्र देखील होत आहेत. दरम्यान, मैदानी चाचणीत उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांमधून एका जागेसाठी दहा जण, अशी लेखीसाठी निवड होईल. शहर-ग्रामीणमधील चालकांच्या १०१ जागांसाठी एक हजार ११० आणि शिपयांच्या एक हजार २४० उमेदवारांची निवड केली जाणार आहे.