
Solapur News: सोलापूर शहरात कोरोनाचे १४ रुग्ण! मेडिकल कॉलेजमधील डॉक्टरच्या संपर्कातून आठ जण पॉझिटिव्ह
Solapur News: कोरोनामुक्त झालेल्या सोलापूर शहरात मागील दोन दिवसांत कोरोनाचे १४ रुग्ण आढळले आहेत. सोलापुरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील एका कोरोना पॉझिटिव्ह डॉक्टरांच्या संपर्कातून आठ जणांना कोरोनाची बाधा झाली आहे.
तर उर्वरित सहा रुग्ण शहरातील विविध भागातील आहेत. त्या रुग्णांमध्ये कोरोनाची सौम्य लक्षणे असून त्यांना सात दिवस होम आयसोलेशनमध्ये राहावे लागणार आहे.
दोन महिन्यांपासून कोरोनाचा एकही रुग्ण नसलेल्या सोलापूर शहरात दोन दिवसातच रुग्णसंख्या १४ झाली आहे. शुक्रवारी (ता. ३) एक महिला पॉझिटिव्ह आढळली होती.
त्यानंतर त्यांच्या संपर्कातील एकूण ७० संशयितांची टेस्ट करण्यात आली. त्यावेळी आठजण पॉझिटिव्ह आढळले. सोमवारी शहरातील कोरोना रुग्णांची संख्या दहा झाली होती.
मंगळवारी (ता. ७) सोलापूर शहरातील सक्रिय रुग्णसंख्या १३ झाली होती. बुधवारी आणखी एक महिला कोरोना बाधित आढळल्याने शहरात सद्यःस्थितीत दहा महिला व चार पुरुष कोरोना पॉझिटिव्ह आहेत.
कोरोना बाधित आढळलेल्या रुग्णांमध्ये तीव्र किंवा मध्यम स्वरूपाची लक्षणे नाहीत. मेडिकल कॉलेजमधील बाधितांपैकी चार जणांवर सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचार करण्यात आले.
आता ते सर्वजण बरे असल्याची माहिती महापालिकेचे आरोग्याधिकारी डॉ. बसवराज लोहारे यांनी दिली. दरम्यान, कोरोनाचे रुग्ण वाढल्याने कोणीही घाबरून जाऊ नये, पण नियमांचे तंतोतंत पालन करणे जरुरी असल्याचे आवाहन देखील त्यांनी यावेळी केले.
दुसरीकडे तीन दिवसांपूर्वी सांगोला ग्रामीणमध्ये कोरोनाचा एक रुग्ण आढळला होता. तो आता बरा होऊन घरी परतला आहे.
सात दिवस होम आयसोलेशनचे बंधन
कोरोना टेस्टमध्ये पॉझिटिव्ह आढळलेल्या रुग्णांना त्यांच्या स्वतः:च्या घरी उपचार घेण्यास परवानगी आहे. पण, त्यांनी तज्ज्ञ डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार घेण्याचे बंधन आहे.
तसेच सात दिवस त्यांना त्यांचे घर किंवा खोली सोडून इतरांच्या संपर्कात येण्यावरही निर्बंध आहेत. जेणेकरून दुसरे कोणी त्यांच्यापासून बाधित होणार नाहीत, हा त्यामागील हेतू आहे.
महापालिकेचे आरोग्याधिकारी म्हणाले...
नागरिकांनी गर्दीत जाणे टाळावे, गर्दीत जाताना मास्क असावा
सकस आहार घ्यावा, पाणी भरपूर प्यावे व झोप व्यवस्थित असावी
प्रतिबंधित लस टोचून घ्यावी, सोशल डिस्टन्सिंगचे पालन करावे
सर्दी, ताप, खोकला, श्वास घ्यायला त्रास होत असलेल्यांनी करावी कोरोनाची टेस्ट