
Solapur News : मंगळवेढा आरोग्य विभाग सलाईनवर; पाच प्राथमिक आरोग्य केंद्रातील 31 पदे रिक्त
सलगर बुद्रुक (जिल्हा सोलापूर : मंगळवेढा तालुक्यातील ग्रामीण भागातील नागरिकांच्या आरोग्याचा बोजा वाहणारे प्राथमिक आरोग्य केंद्रे रिक्त पदांमुळे सलाईनवर आहेत.मंगळवेढ्यात पाच प्राथमिक आरोग्य केंद्रे आहेत.तर सव्वीस उपकेंद्रे आहेत.
आरोग्य केंद्र व उपकेंद्र मिळून 31 कर्मचाऱ्यांची पदे रिक्त आहेत.रिक्त पदामुळे आरोग्य सेवा देत असताना अपुऱ्या कर्मचाऱ्यांवर ताण जाणवत आहेत.याचा परिणाम ग्रामीण भागातील आरोग्य व्यवस्थेवर होत आहे.त्यामुळे तात्काळ रिक्त पदे भरली जावीत अशी मागणी ग्रामीण भागातील नागरिकांमधून होत आहे.
प्राथमिक आरोग्य केंद्रे
१) सलगर बुद्रुक,२)मरवडे,३)भोसे,४)बोराळे,५) आंधळगाव अशी तालुक्याच्या वेगवेगळ्या दिशेच्या गावांमध्ये पाच प्राथमिक आरोग्य केंद्रे आहेत.शिवाय या पाच आरोग्य केंद्राच्या अंतर्गत सव्वीस उपकेंद्रे आहेत.यामध्ये नव्याने लेंडवे चिंचाळे येथे एक उपकेंद्र मंजूर झाले आहे.तर सात उपकेंद्रे प्रस्तावित आहेत.
रिक्त पदे - मंगळवेढा तालुका प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये वैद्यकीय अधीकारी,औषध निर्माण अधिकारी,आरोग्य सहाय्यक,आरोग्य सहाय्यीका,आरोग्य सेवक,आरोग्य सेविका,प्रयोग शाळा तंत्रज्ञ,कुष्ठरोग तंत्रज्ञ असे एकूण एकशे एक पदे मंजूर आहेत.
त्यापैकी एकतीस पदे रिक्त आहेत.यामध्ये वैद्यकीय अधिकारी चार(कंत्राटी सोडून),औषध निर्माण अधिकारी तीन,आरोग्य सहाय्यक एक,आरोग्य सहाय्यीका पाच,आरोग्य सेवक आठ,आरोग्य सेविका नऊ,प्रयोग शाळा तंत्रज्ञ चार अशी 31 पदे रिक्त आहेत.
ऑनलाईन कामाचा ताण-:रुग्णसेवा देने हे एकच काम आरोग्य विभागाचे नाही.प्रत्तेक गोष्टीची ऑनलाईन माहिती भरणे बंधन कारक असते.त्यासाठी वाढीव पदांची आवश्यकता असताना आहे त्या पदांची भरतीची होत नाही.त्यामुळे याचा थेट परिणाम आजारी रूग्णांना सेवा देण्यात होतो.याचीही दखल घेणे गरजेचे आहे.
कोरोनाचा वाईट अनुभव पाठीशी -: कोरोना महामारीमुळे जगावर संकट येऊन गेले.सगळीकडे हाहाकार माजला होता.कोरोनामुळे आरोग्य व्यवस्थेतील अनास्थेची पोलखोल झाली होती.यातून धडा घेऊन आरोग्य व्यवस्था सदृढ होईल अशी लोकांची भावना होती.
पण प्रत्यक्षात कांहीही होताना दिसत नाही.कोरोनाचा भयानक अनुभव पाठीशी असताना देखील आरोग्य विभाग रिक्त पदांमुळे आजारी असल्याचे वास्तव आहे.त्यामुळे तालुक्याच्या ग्रामीण भागातील नागरिकांच्या आरोग्याबाबतीत शासनाचे धोरण उदासिन असल्याचे चित्र आहे.याची गंभीर दखल घेऊन योग्य ती कार्यवाही व्हावी अशी नागरिकांची मागणी आहे.
डॉ भाऊसाहेब जानकर,तालुका वैद्यकीय अधिकारी मंगळवेढा:- तालुक्यात एकतीस पदे रिक्त आहेत.या रिक्त पदांमुळे तालुक्यातील ऐंशी गावांना आरोग्य सेवा देत असताना अनेक अडचणी येतात.त्यातच ऑनलाईन कामाचा आरोग्य व्यवस्थेवर खूप ताण आहे.त्यामुळे रिक्त पदे भरली जावीत अशी आमची मागणी आहे.