अबब..! १९ जागांसाठी ३४३ अर्ज, नोकरीसाठी नव्हे, गुरुजींच्या पतसंस्थेची निवडणूक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

 teacher
अबब..! १९ जागांसाठी ३४३ अर्ज, नोकरीसाठी नव्हे, गुरुजींच्या पतसंस्थेची निवडणूक

अबब..! १९ जागांसाठी ३४३ अर्ज, नोकरीसाठी नव्हे, गुरुजींच्या पतसंस्थेची निवडणूक

सोलापूर : सरकारी नोकरीतील एका जागेसाठी शंभरहून अधिक अर्ज, अशी स्थिती सर्वांनीच अनुभवली. पण, प्राथमिक शिक्षकांच्या पतसंस्थेसाठी १९ जागांसाठी तब्बल १८ पट अर्ज (३४३) भरण्याची ही पहिलीच वेळ आहे. १५० कोटींच्या ठेवी, ७२ कोटींचे भागभांडवल आणि ३२५ कोटींची वार्षिक उलाढाल असलेल्या पतसंस्थेवरील सत्तेसाठी शिक्षकांमध्येच चुरस पहायला मिळत आहे.

हेही वाचा: खासगी वाहनांना मासिक हप्ता! १२ हजाराचा पहिलाच हप्ता घेताना ‘पीएसआय’ पकडला

जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्थेच्या संचालक मंडळाची रणधुमाळी सध्या सुरू आहे. सात हजारांवर मतदार असलेल्या या पतसंस्थेच्या निवडणुकीत गुरुजी दंग आहेत. उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत ३४३ शिक्षकांनी अर्ज दाखल केले आहेत. राज्यात सुशिक्षित बेरोजगारीत वाढ झाल्याने नोकरी भरतीवेळी जसा अनुभव येतो, तसाच अनुभव या पतसंस्थेच्या निवडणुकीतून आला आहे. दरम्यान, अर्ज माघार घेण्यासाठी आणखी मुदत आहे, पण एवढ्या मोठ्या संख्येने अर्ज आल्याने गुरुजींची निवडणुकीबद्दलची आवड स्पष्ट झाली आहे. विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी प्रयत्न करणारे गुरुजी आता एकमेकांच्या विरोधात निवडणूक लढवून पतसंस्थेत आपले नशीब आजमावणार आहेत. सर्वसाधारण मतदारसंघातून २०७, महिला मतदारसंघातून ३८, इतर मागासवर्गीय मतदारसंघातून ३३, भटक्या विमुक्त जाती विशेष मागास प्रवर्गातून २७, अनुसूचित जाती जमाती मतदारसंघातून ३८ असे एकूण ३४३ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. उमेदवारी अर्जांची छाननी आज (शुक्रवारी) पार पडली असून सोमवारी (ता. २७) पात्र-अपात्र अर्जांची यादी प्रसिध्द होणार आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी ११ जुलैपर्यंत मुदत असून आवश्यकता भासल्यास २४ जुलैला पतसंस्थेसाठी मतदान घेतले जाणार आहे.

हेही वाचा: बाळासाहेब म्हणाले होते...‘उद्धव अन्‌ आदित्यला सांभाळा’! जिल्हाप्रमुख उध्दव ठाकरेंसोबत

निवडणुकीसाठी तीन पॅनेल आमने सामने

प्राथमिक शिक्षक पतसंस्थेच्या निवडणुकीसाठी आठ शिक्षक संघटनांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. पण, प्राथमिक शिक्षक संघाचे संभाजीराव थोरात व (कै.) शिवाजीराव पाटील या दोन गटांनी एकत्रित निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतल्याची चर्चा आहे. तर शिक्षक समिती आणि आदर्श शिक्षक समिती आपले स्वतंत्र पॅनेल उभे करतील, अशी स्थिती आहे. त्यांना जुनी पेन्शन संघटना, शिक्षक भारती, एकल शिक्षक संघटना, मागासवर्गीय शिक्षक संघटना यापैकी कोणती संघटना मदत करणार, याची उत्सुकता आहे. ११ जुलैला त्याचे चित्र स्पष्ट होणार आहे.

हेही वाचा: एकनाथ शिंदेंच्या बंडखोरीने ‘महाविकास’ला धडा! महापालिका, झेडपीसाठी तिन्ही पक्ष स्वबळावर

शिक्षक पतसंस्थेविषयी ठळक बाबी...

  • अर्ज छाननीनंतर सोमवारी जाहीर होणार पात्र-अपात्र उमेदवारांची यादी

  • ११ जुलैला अर्ज माघार, २४ जुलैला मतदान आणि २५ जुलैला मतमोजणी

  • पतसंस्थेकडे १५० कोटींच्या ठेवी; ७२ कोटींचे भागभांडवल अन्‌ वार्षिक ३३० कोटींचे कर्जवाटप

  • पतसंस्थेचे सात हजार १२६ मतदार असून पतसंस्थेवर सध्या शिवानंद भरले अध्यक्ष

हेही वाचा: ‘ईडी’च्या धास्तीनेच राजकीय उलथापालथ! दोन मंत्री तुरुंगात, राहुल गांधीही सुटले नसल्याची भीती

सहा महिन्याला ‘एक अध्यक्ष’चा फॉर्म्युला

१९४० मध्ये स्थापन झालेल्या प्राथमिक शिक्षक पतसंस्थेवर सध्या थोरात-पाटील गटाची सत्ता असून शिवानंद भरले हे अध्यक्ष आहेत. पण, पतसंस्थेवर सत्ता मिळाल्यानंतर या गटांनी पाच वर्षांत नऊ अध्यक्ष बदलले. आता आगामी निवडणुकीतही सत्ता मिळावी म्हणून त्यांनी ‘सहा महिन्यांसाठी एक अध्यक्ष’ हा फॉर्म्युला तयार करून सत्तेचे समीकरण जुळविण्याचा प्रयत्न सुरु केल्याचीही चर्चा आहे.

Web Title: 343 Applications For 19 Seats Not For Job Election Of Teachers Credit

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..