
Solapur News : मोहोळ तालुक्यातील ऐतिहासिक आष्टी तलाव दुरुस्तीसाठी 40 कोटी मंजूर
मोहोळ : मोहोळ तालुक्यातील ऐतिहासिक अशा आष्टी तलावाच्या दुरुस्तीसाठी शिंदे- फडणवीस सरकारने नुकत्याच सादर केलेल्या "बजेट" मध्ये 40 कोटी रुपयांची तरतूद केल्याची माहिती भाजपचे जिल्हा युवा मोर्चाचे उपाध्यक्ष रणजीत चवरे यांनी दिली.
चवरे यांनी आमदार रणजीतसिंह मोहिते पाटील यांच्याकडे यासाठी पाठपुरावा केला होता. त्यामुळे शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण पसरले आहे. मोहोळ तालुक्यात आष्टी तलाव प्रसिद्ध आहे. या तलावाची निर्मिती ब्रिटिश कालीन राणी व्हिक्टोरिया यांनी केली होती.
पावसाच्या पाण्यावरील हा तलाव आष्टी, रोपळे, येवती या गावातील 2 हजार 500 हेक्टर क्षेत्रावर उभारला आहे. त्याची पाणी साठवण क्षमता एक टीएमसी इतकी आहे. या तलावाची अत्यंत दुरावस्था झाली असून, पडझड झाली आहे.
भराव्याला भेगा पडल्या आहेत. मोठ-मोठी काटेरी झुडपे वाढली आहेत. त्यामुळे या तलावाला धोका होऊ शकतो. गेल्या अनेक वर्षापासून या तलावाची देखभाल व दुरुस्ती झाली नाही. या तलावावर सध्या सुमारे 23 हजार हेक्टर क्षेत्र बागायती आहे, तर सहा ते सात पिण्याच्या पाण्याच्या योजना कार्यान्वित आहेत.
तलावाच्या दुरावस्थेबद्दल चवरे यांनी आमदार रणजीतसिंह मोहिते पाटील यांच्या निदर्शनाला वस्तुस्थिती आणून दिली होती. गेल्या नागपूरच्या अधिवेशनात मोहोळ तालुक्यातील आष्टी उपसा सिंचन योजनेसाठी व आष्टी तलाव दुरुस्तीसाठी आमदार रणजीतसिंह मोहिते पाटील यांनी 100 कोटी रुपयांची मागणी केली होती.
दरम्यान कालच्या बजेट मध्ये तलाव दुरुस्तीसाठी 40 कोटी रुपयांची तरतूद आमदार मोहिते पाटील यांच्या पाठपुराव्या मुळे झाली असल्याचे चवरे यांनी सांगितले. या तलावाच्या दुरुस्ती नंतर तलावाचे पुनरुज्जीवन होणार असून, पाणीसाठा वाढणार आहे. परिणामी बागायती क्षेत्र व फळबागाचे क्षेत्र ही वाढणार आहे. 40 कोटी रुपये मंजूर झाल्याचे समजतात खंडाळी, पापरी, येवती, आष्टी, रोपळे, पेनुर या गावातील शेतकऱ्यांनी आनंद व्यक्त केला.