52 मुलांसाठी 8 शिक्षक, पण वाचायला शिकली 4 मुले! 'सेतू' चाचणीतही मुलांची पाटी कोरीच

शाळांनी घेतलेल्या सेतू चाचण्यात ६० टक्के मुले अंकगणित व इंग्रजीत मागेच आहेत
Bridge Course
Bridge CourseSakal

सोलापूर - कोरोना काळात दोन वर्षे शाळा बंद राहिल्याने सेतू अभ्यासक्रमाच्या माध्यमातून मुलांची बौध्दिक पातळी उंचावण्याचा प्रयोग राज्य शैक्षणिक संशोधन परिषदेने केला. पण, शाळांनी घेतलेल्या सेतू चाचण्यात ६० टक्के मुले अंकगणित (आकडेमोड) व इंग्रजीत मागेच आहेत. कोरोना काळात मुलांना लागलेली मोबाईलची सवय अजूनही सुटत नसल्याची वस्तुस्थिती समोर आली आहे.

सोलापूर जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या दोन हजार ७९७ शाळा असून त्याअंतर्गत दोन लाख चार हजार विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. तर खासगी प्राथमिक व माध्यमिक शाळांमधील दुसरी ते दहावीतील विद्यार्थी संख्यादेखील एक लाखांवर आहे. कोरोना काळात ॲन्ड्राईड मोबाईलद्वारे मुलांचे ऑनलाइन शिक्षण सुरु हेाते. पण, जिल्ह्यातील एक लाखांहून अधिक मुलांकडे मोबाईल नव्हते. त्यामुळे त्या मुलांना ऑनलाइन शिक्षण घेता आले नाही. आता सर्व शाळा १५ जूनपासून सुरु झाल्या आहेत. सर्वच मुले एका पातळीवर येऊन शिकावीत, जेणेकरून मुलांमधील न्यूनगंड कमी होईल म्हणून सेतू चाचण्या घेण्यात आल्या.

शाळा सुरु होऊन आता दोन महिने पूर्ण झाले. तरीदेखील पहिली ते चौथीतील मुलांना अंकगणित, इंग्रजी जमत नसल्याचे निरीक्षण शाळांनी नोंदविले आहे. चाचण्या घेतल्यानंतर शाळांकडील सेतू चाचण्या अद्याप जिल्हा शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण संस्थेने (डायट) संकलित केलेल्या नाहीत. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेसाठी ‘डायट’ किती गंभीर आहे, हे स्पष्ट होते. दुसरीकडे पुस्तकी अभ्यासक्रम पूर्ण करण्याकडेच बहुतेक शिक्षकांचा कल पहायला मिळत आहे.

कोरोना काळात दोन वर्षे शाळा बंद राहिल्याने मुलांची गुणवत्ता घसरली आहे. गुणवत्तावाढीसाठी अजूनही सर्व शिक्षकांचे मनापासून प्रयत्न दिसत नाहीत. आता मुलांच्या गुणवत्तेचे सातत्याने मूल्यमापन करण्यात येईल. शिक्षकांनी शाळा सुरु होण्यापूर्वी अर्धातास अगोदर शाळेवर जावे, हे बंधनकारक असेल.

- किरण लोहार, प्राथमिक शिक्षणाधिकारी, सोलापूर.

तीन शाळांमधील चौघांनाच वाचता आले

प्राथमिक शिक्षणाधिकारी किरण लोहार यांनी शुक्रवारी (ता. १२) शहराजवळील शेळगी, महालक्ष्मी नगर व दहिटणे या जिल्हा परिषदेच्या शाळांना भेटी दिल्या. त्यावेळी शेळगी शाळेवरील ३० पैकी केवळ तीनच विद्यार्थ्यांना मराठी वाचता आले. उर्वरित मुलांना ना आकडेमोड ना वाचन करता आले. तेथून जवळच असलेल्या महालक्ष्मी नगरातील शाळेत गेल्यावर ११ मुलांसाठी दोन शिक्षक त्याठिकाणी होते. तेथील मुलांचीही अशीच आवस्था पहायला मिळाली. दहिटणेतील शाळेचा पट २३ पण, हजर ११ विद्यार्थी होते. धक्कादायक बाब म्हणजे ११ मुलांसाठी चार शिक्षक असतानाही मुलांची अपेक्षित प्रगती नाही. गुणवत्ता वाढीसाठी सर्व शिक्षकांनी प्रामाणिकपणे काम केल्याशिवाय गुणवत्ता सुधारणार नाही, असे लोहार यावेळी म्हणाले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com