उजनी ८० टक्क्याच्या उंबरठ्यावर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Ujani dam

उजनी ८० टक्क्याच्या उंबरठ्यावर

सोलापूर - पावसाळ्याच्या ऐन तोंडावर (८ जुलैपर्यंत) मायनस १३ टक्क्यांपर्यंत गेलेले उजनी धरण आता प्लस ८० टक्क्यांवर आले आहे. धरणात मागील २३ दिवसांत तब्बल ४९ टीएमसी (९२ टक्के) पाणी जमा झाले आहे. सोलापूरसह पुणे जिल्ह्यातील पावसामुळे धरणाची वाटचाल आता शंभरीकडे सुरु आहे

राज्यातील अन्य जिल्ह्यांच्या तुलनेत सोलापूर जिल्ह्यात सर्वाधिक उसाचे क्षेत्र झाले आहे. सव्वादोन लाखांहून अधिक क्षेत्रावर सध्या ऊस आहे. दुसरीकडे सर्वाधिक साखर कारखान्यांचा जिल्हा म्हणूनही सोलापूरची ओळख झाली आहे. त्याचे कारण म्हणजे उजनी धरण आहे. उजनीच्या भरवश्‍यावर जिल्ह्यातील शेतकरी खरीप पिकांकडे विशेषत: उसाच्या लागवडीकडे वळले आहेत. रब्बीच्या जिल्ह्यात सर्वाधिक ऊस झाला आहे. पाण्याअभावी सातत्याने दुष्काळाचा सामना करावा लागणारा सोलापूर जिल्हा मागील तीन वर्षांपासून टॅंकरमुक्त झाला आहे. त्यातून कोट्यवधी रुपयांची बचत झाली आहे. दुसरीकडे शेतकऱ्यांच्या जीवनात कृषी क्रांती घडविण्यात उजनीचा मोठा वाटा राहिला आहे. धरणामुळे दुष्काळाच्या झळा कमी झाल्या असून, अनेकदा उजनीमुळे शेतकऱ्यांना दुष्काळाशी यशस्वी सामना करता आला आहे. जिल्ह्यात बारमाही बागायतीचे क्षेत्र वाढण्यातही उजनी धरणाचा खूप मोठा वाटा आहे. सोलापूर, पुणे, नगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे जीवनमान उजनी धरणामुळे उंचावले आहे.

ऑगस्टमध्ये मुसळधार पाऊस

पावसाळ्याच्या सुरवातीला जून महिन्यात काहीच पाऊस पडला नाही. त्यामुळे खरीपाच्या पेरण्या खोळंबल्या होत्या. ९ जुलैनंतर सलग पाच-सहा दिवस मुसळधार पाऊस झाला आणि पेरण्या झाल्या. आता मागील काही दिवसांत पावसाने दडी मारली आहे. पण, हवामान खात्याच्या अंदाजानुसार ४ ऑगस्टनंतर मुसळधार पाऊस पडेल. धरणातील पाणीसाठा ९० टक्के झाल्यानंतर भीमा-सीना नदीतून खाली पाणी सोडले जाणार आहे. त्यावेळी दौंडवरून येणारा विसर्ग आणि पडणाऱ्या पावसाचा फ्लो विचारात घेतला जाणार आहे. सध्या दौंडमधून पाच हजार क्युसेक विसर्गाने उजनीत पाणी येत आहे.