esakal | ते आज पोहायला लवकर गेले अन्‌... 
sakal

बोलून बातमी शोधा

Accident on Solapur Barshi road

बार्शी (सोलापूर) : महाशिवरात्रीचा उत्सव सुरू असतानाच शुक्रवारी (ता. 21) सकाळी आठ वाजता येथील पंचायत समिती कार्यालयासमोरून कर्मचारी, अधिकारी, बचत गटाच्या महिला निघाल्या अन्‌ एक तासातच त्यांच्यावर काळाने घाला घातला. यात पाच जणांचा मृत्यू झाला. एका क्षणात त्यांचा संसार उघडा पडला. राळेरासजवळ झालेल्या एसटी आणि क्रूझरच्या भीषण अपघाताची माहिती बार्शीत समजताच पंचायत समितीवर दुःखाचा डोंगर कोसळला. 

ते आज पोहायला लवकर गेले अन्‌... 

sakal_logo
By
प्रशांत काळे

बार्शी (सोलापूर) : महाशिवरात्रीचा उत्सव सुरू असतानाच शुक्रवारी (ता. 21) सकाळी आठ वाजता येथील पंचायत समिती कार्यालयासमोरून कर्मचारी, अधिकारी, बचत गटाच्या महिला निघाल्या अन्‌ एक तासातच त्यांच्यावर काळाने घाला घातला. यात पाच जणांचा मृत्यू झाला. एका क्षणात त्यांचा संसार उघडा पडला. राळेरासजवळ झालेल्या एसटी आणि क्रूझरच्या भीषण अपघाताची माहिती बार्शीत समजताच पंचायत समितीवर दुःखाचा डोंगर कोसळला. 
सरकारच्या अधिपत्याखाली महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन उन्नती अभियान राबवण्यात येत आहे. दोन वर्षांपासून तालुक्‍याचे मुख्य कार्यालय बार्शीत आहे. शासकीय अधिकारी व कंत्राटी कर्मचारी महिला बचत गटांना प्रोत्साहन देण्यासाठी या अभियानात काम करतात. सोलापूर येथे सुरू असलेल्या रुक्‍मिणी यात्रेसाठी जात होते. या अभियानात बार्शी येथील महिला बचत गटांचे स्टॉल उभे करण्यासाठी सर्वजण बार्शीतून लवकर निघाले होते. पण रस्त्यातच त्यांना मृत्यूने गाठले तर नऊ जण जखमी झाले. 
मृतांमधील देवनारायण काशीद हे कनिष्ठ सहायक, संभाजी महिंगडे वरिष्ठ सहायक तर नृसिंह मांजरे विस्ताराधिकारी असे शासकीय सेवेतील कर्मचारी आहेत. महिंगडे रोज पोहायला जातात. आज सोलापूरला जायचे म्हणून लवकर पोहून येऊन जाण्यासाठी हजर झाले अन्‌ अपघातात त्यांचा मृत्यू झाल्याचे समजताच त्यांच्या मित्रपरिवाराला दुःख आवरले नाही. 
मनमिळावू स्वभावाचे देवनारायण काशीद पाच वर्षांपासून पंचायत समितीत कार्यरत आहेत. कामात नेटकेपणा, स्वच्छ पारदर्शक कारभार, प्रत्येक विषयाची माहिती देणे त्यांची खासियत होती. त्यांच्या मृत्यूची बातमी समजताच सहकाऱ्यांचे अश्रू अनावर झाले. अपघाताची माहिती समजताच पंचायत समितीचे गटविकास अधिकारी सावंत, सभापती अनिल डिसले, पोलिस उपअधीक्षक संदीप भोरे, वैराग पोलिस निरीक्षक सुगावकर यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.

loading image