esakal | गुड न्यूज ! कोरोनाची लाट 15 मेनंतर होईल कमी
sakal

बोलून बातमी शोधा

Corona

गुड न्यूज ! कोरोनाची लाट 15 मेनंतर होईल कमी

sakal_logo
By
तात्या लांडगे : सकाळ वृत्तसेवा

सोलापूर : राज्यात कोरोनाची दुसरी लाट सुसाट सुटली असून, दररोज राज्यात सरासरी 60 हजारांहून अधिक रुग्ण आढळत आहेत. मात्र, 15 दिवसांचा कडक लॉकडाउन केल्याने विषाणूची साखळी निश्‍चितपणे खंडित होणार आहे. 15 मे नंतर राज्यातील कोरोनाची लाट निश्‍चितपणे कमी होईल, असा विश्‍वास वैद्यकीय शिक्षण व संशोधन विभागाचे संचालक डॉ. तात्याराव लहाने यांनी व्यक्‍त केला आहे.

महाराष्ट्रातील पहिल्या लाटेतील कोरोना विषाणूच्या तुलनेत दुसऱ्या लाटेतील विषाणू कमी धोकादायक आहे. मात्र, लक्षणे असतानाही विलंबाने दाखल होणाऱ्या रुग्णांची संख्या वाढत असल्याने मृत्यू वाढत आहेत. राज्याचा मृत्यूदर पूर्वीच्या कोरोना लाटेच्या तुलनेत सुमारे तीन टक्‍क्‍यांनी कमी आहे. राज्यातील 54 टक्‍के लोक विनामास्क फिरत होते, अनेक ठिकाणी नियमांचे पालन होत नव्हते. परंतु आता लॉकडाउनमुळे गर्दीच्या माध्यमातून वाढणाऱ्या या विषाणूची साळखी खंडित होईल. आता घरातील जेवढे अधिकाधिक रुग्ण आढळतील, तेवढाच पुढील धोका कमी होईल. त्यामुळे ही लाट 15 मेनंतर ओसरायला सुरू होईल, असा अंदाज वैद्यकीय तज्ज्ञांनी वर्तविला आहे.

प्रतिबंधात्मक लसीकरणाचाही वेग आता वाढू लागला आहे. लॉकडाउनमुळे घरी थांबलेले संशयित थेट दवाखान्यात जात असल्याने त्यांच्यावर तत्काळ उपचार केले जात आहेत. अनलॉकनंतर नागरिकांनी मास्क, सोशल डिस्टन्सिंगचे पालन तंतोतंत करावे, लस टोचून घ्यावी, जेणेकरून कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होईल, असेही डॉ. लहाने या वेळी म्हणाले.

1 मेनंतर टप्प्या-टप्प्याने अनलॉक

राज्यात 1 मेपर्यंत कडक संचारबंदी लागू करण्यात आली आहे. मात्र, कडक संचारबंदीची मुदत संपल्यानंतर टप्प्या-टप्प्याने त्यात शिथिलता आणली जाणार आहे. बाजारपेठा, दुकाने, हॉटेल, बार, मॉल्स, खासगी व सरकारी कार्यालये सुरू करताना त्यांच्यासाठी निर्बंध लागूच राहतील; जेणेकरून खंडित झालेल्या कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव पुन्हा वाढणार नाही, याची दक्षता घेतली जाणार आहे. त्यादृष्टीने पुढील कृती आराखडा राज्य सरकारने तयार केल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन कक्षातील वरिष्ठ सूत्रांनी दिली.

नियमांचे पालन करावेच लागेल

कडक संचारबंदीमुळे कोरोना विषाणूची साखळी खंडित होण्यास मदत होईल. नागरिकांनी नियमांचे पालन केल्यास तिसऱ्या लाटेची शक्‍यता राहणार नाही. राज्यात आणखी पाच हजार 200 डॉक्‍टर वाढणार असून त्यांचीही मदत कोरोना काळात घेता येईल.

- डॉ. तात्याराव लहाने, संचालक, वैद्यकीय शिक्षण व संशोधन, मुंबई