मामा पाठीराखा, भाचा झाला अधिकारी 

Amit Deshmukhs success in MPSC in Madha taluka
Amit Deshmukhs success in MPSC in Madha taluka

उपळाई बुद्रूक (सोलापूर) : शालेय शिक्षण सुरू असताना वडिलांचे छत्र हरपले. त्यामुळे भविष्याचे काय असा प्रश्‍न मुलांसमोर उभा असताना त्यांच्या मदतीला मामा धावून आले. भाच्याच्या शिक्षणासाठी मानसिक, आर्थिकदृष्ट्या सर्वच सहकार्य मामाने केले. पडत्या काळात मामा पाठीराखा झाल्याने भाचा पोलिस उपनिरीक्षक झाला आहे. माढा तालुक्‍यातील उपळाई बुद्रूक येथील ही घटना आहे. अमित बाळासाहेब देशमुख असे निवड झालेल्या युवकाचे नाव आहे. 
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वतीने 2018 मध्ये 387 जागांसाठी घेण्यात आलेल्या पोलिस उपनिरीक्षक या परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर करण्यात आला. यात उपळाई बुद्रूक येथील अमित बाळासाहेब देशमुख हे 20 व्या क्रमांकाने उत्तीर्ण झाले आहेत. अमित यांचे प्राथमिक शिक्षण गावच्या जिल्हा परिषद शाळेत तर माध्यमिक शिक्षण नंदिकेश्‍वर विद्यालयात व अकरावी-बारावीचे शिक्षण दयानंद महाविद्यालय सोलापूर, पदवी व पदव्युत्तर शिक्षण पुणे येथे झाले आहे. अमित हे गेल्या चार वर्षांपासून स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत होते. नुकत्याच जाहीर करण्यात आलेल्या परीक्षेत त्यांची पोलिस उपनिरीक्षक पदी निवड झालेली आहे. 
अमित यांच्या वडिलांचे निधन झाल्यानंतर त्यांच्या पुढील शिक्षणासाठी मानसिकदृष्ट्या व आर्थिक असे सर्वच सहकार्य त्यांचे मामा शरद पाटील यांनी केले होते. पडत्या काळात मामाने खंबीर साथ दिल्याने व धाकटे बंधू माऊली देशमुख यांच्या सहकार्यामुळे घरच्या परिस्थितीची जाण ठेवत अमित यांनी अपार कष्ट व मेहनत घेत, जिद्द चिकाटी व आत्मविश्‍वासाच्या जोरावर राज्यसेवेच्या पोलिस उपनिरीक्षक या परीक्षेत घवघवीत यश संपादन केले आहे. त्यांना गावातील पोलिस उपायुक्त डॉ. संदीप भाजीभाकरे, आयएएस रोहिणी भाजीभाकरे, आयकर उपायुक्त स्वप्नील पाटील, आयएएस शिवप्रसाद नकाते यांचे मार्गदर्शन लाभले आहे. निवडीची बातमी गावात समजताच फटाके फोडत गुलालाची उधळण करत कौतुकाचा आनंद साजरा करण्यात आला. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com