गॅस बचतीसाठी उपयुक्त सोलार स्टोव्हची निर्मिती | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Amogh Sahaje

गॅस बचतीसाठी उपयुक्त सोलार स्टोव्हची निर्मिती

सोलापूर - आदिवासी भागातील लोकांची स्वयंपाकासाठी लाकूड गोळा करण्याची मेहनत वाचावी, या हेतूने अमोघ सहजे यांनी अगदी कमी खर्चात सोलार स्टोव्ह तयार केला आहे. वाळवंटीय देश सुदान व झिम्बाब्वेमध्ये त्यांचा हा प्रयोग यशस्वी झाला आहे. वाढते गॅस सिलिंडरचे दर, वृक्षतोड व महागड्या सौरऊर्जेच्या साधनांना त्यांनी हा सशक्त पर्याय दिला आहे. अमोघ सहजे हे नवी मुंबईचे रहिवासी आहेत. बंगळूर येथील आयआयएससीमध्ये अभियांत्रिकी एमई शिक्षण पूर्ण केल्यानंतर ते आदिवासींची स्वयंपाकासाठी लाकूडफाटा जमा करण्याची पायपीट पाहून अस्वस्थ झाले. त्यांनी सोलार स्टोव्हचे मॉडेल आदिवासी भागातील मुलांच्या मदतीने तयार केले. आरशाचे तुकडे एका पॅनलवर लावून त्याद्वारे सौरउर्जा केंद्रित करून अन्न शिजवण्याचे हे मॉडेल तयार झाले. या सोलार स्टोव्हवर कमीत कमी पाच ते सहा किलो अन्न शिजू शकते. तसेच अन्न शिजवणे, फोडणी देणे, तळणे अशी सर्व कामे करता येतात. त्याच्या वापराने गॅस किंवा इतर इंधनखर्चात ८० टक्के बचत होऊ शकते.

सुरुवातीला नंदुरबार जिल्ह्यातील आदिवासींना त्यांनी हे सोलार स्टोव्ह वितरित केले. नंतर सुदानमध्ये संयुक्त राष्ट्र संघटनेच्या विकास कार्यक्रमाच्या अंतर्गत (यूएनडीपी) त्यांनी पायलट प्रोजेक्टमध्ये ३५० सोलार स्टोव्ह करून दिले. झिम्बाब्वेमध्ये देखील ॲलेक्स मॅचिपिसा यांच्या मदतीने हे मॉडेल वापरले गेले. स्विझरलॅंडमध्ये या मॉडेलचा प्रयोग करण्यात आला. पुण्याच्या थिंक ट्रान्स फाउंडेशनच्या माध्यमातून या संकल्पनेचा प्रसार केला जात आहे.

कार्बन क्रेडिट व पर्यावरण संरक्षण

सोलार स्टोव्हमुळे ग्रामीण भागात इंधन म्हणून केली जाणारी वृक्षतोड कमी होणे म्हणजे पर्यायाने पर्यावरण संरक्षण केले जाऊ शकते. तसेच अन्य गॅससारख्या इंधनाचा वापर कमी होऊ शकतो. त्यामुळे कार्बन क्रेडिटची संधी या प्रयोगातून मिळणार आहे.

सोलार स्टोव्हची वैशिष्ट्ये

  • अत्यंत कमी खर्चात निर्मिती

  • सौरऊर्जा साधनांच्या तुलनेत स्वस्त

  • स्टोव्हवर शिजवणे, तळणे, फोडणी देणे शक्य

  • तापमानातील बदलांचा परिणाम नाही

  • वीस मिनिटांत शिजते अन्न

  • गॅस सिलिंडर व अन्य इंधनात थेट बचत

  • सुदान, झिम्बाब्वे या देशांमध्ये मोठा प्रतिसाद

  • सव्वातीन बाय सव्वातीन फूट जागेत स्टोव्ह बसवणे शक्य

ज्या लोकांना इंधनाचा वाढता खर्च असह्य आहे व नाइलाजाने वृक्षतोड करावी लागते त्यांना हा सोलार स्टोव्ह उपयोगी आहे. आता त्याचे उत्पादन सुरू करताना निर्मितीचा रोजगार ग्रामीण आदिवासी भागातील मुलांना मिळावा, असा प्रयत्न आहे.

- अमोघ सहजे, संशोधक (मो. 9869638335).

Web Title: Amogh Sahaje Manufacture Solar Stoves Suitable For Gas Saving

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top