Solapur News : रमेश बारसकर यांच्या गाडीला अपघात करण्याचा प्रयत्न,पोलीस संरक्षणाची मागणी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ramesh baraskar

Solapur News : रमेश बारसकर यांच्या गाडीला अपघात करण्याचा प्रयत्न,पोलीस संरक्षणाची मागणी

मोहोळ : सोलापुरातील राष्ट्रवादी पक्षाची कामे करून मोहोळ कडे येत असताना राष्ट्रवादीचे प्रदेश चिटणीस तथा मोहोळचे प्रथम नगराध्यक्ष रमेश बारसकर यांच्या गाडीला एका ट्रकने धडक देण्याचा प्रयत्न केला,या प्रकरणी बारसकर यांनी मोहोळ पोलिसात फिर्याद दिली आहे.

जाणून बुजून अंगावर ट्रक घालण्याचा प्रयत्न केला असून बारसकर यांनी पोलीस संरक्षणाची मागणी केली आहे. या घटनेमुळे तालुक्यात मोठी खळबळ उडाली आहे. ही घटना सोलापूर- पुणे राष्ट्रीय महामार्गावरील सावळेश्वर टोल नाक्यावर सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास घडली.

मोहोळ पोलिसां कडून मिळालेल्या माहिती नुसार, रमेश बारसकर व त्यांचे स्वीय सहाय्यक शीलवंत क्षीरसागर हे सोलापुरातील राष्ट्रवादी पक्षाची कामे आटोपून गाडी नंबर एम एच 42 बीबी 19 20 मधून मोहोळ कडे येत होते. त्यांची गाडी दुपारी चार वाजण्याच्या सुमारास सावळेश्वर टोल नाक्यावर आली असता पाठीमागून ट्रक क्र केए 56/1315 ही चालकाने भरधाव आणुन बारसकर यांच्या गाडीला धडक देण्याचा प्रयत्न केला, व अंगावर ट्रक घालण्याचा प्रयत्न केला.

दरम्यान बारसकर यांच्या गाडीचा चालक ईशान खारकदारी रा मोहोळ याने प्रसंगावधान राखून बारसकर यांची गाडी बाजूला थांबवली. टोल नाक्यावरील कर्मचाऱ्यांनी पळत येऊन ट्रकच्या चालकास खाली उतरवुन नाव विचारले असता शांतलिंगेश्वर बाबुराव ढाले रा नांदगाव ता तुळजापूर असे त्यांने सांगितले. त्यास मोहोळ पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.

दरम्यान बारसकर यांनी माझ्या जीवितास राजकीय विरोधका कडून धोका असल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. यापूर्वी अपघाताचा बनाव करून शहरातील ब्रह्मदेव गायकवाड, पंडित देशमुख, नरखेड येथील सुहास उबाळे यांची अपघाताचा बनाव करून हत्या करण्यात आल्याचे ही फिर्यादीत नमूद केले आहे. यातील काही प्रकरणे न्यायप्रविष्ठ आहेत.

तसेच राष्ट्रवादीचे तत्कालीन जिल्हाध्यक्ष मनोहर डोंगरे यांच्यावरही खुनी हल्ला झाल्याची फिर्यादीत नमूद केले आहे. बारसकर यांनी विविध राजकीय पक्षाचा विरोध पत्करून प्रथम नगराध्यक्ष पद भूषविले होते. येत्या काही दिवसात मोहोळ नगर परिषदेची निवडणूक होणार आहे.

बारसकर हे एका पार्टीचा नेता म्हणून काम करीत असल्याने जाणून-बुजून अंगावर ट्रक घालण्याचा प्रयत्न केल्याचा संशय फिर्यादीत नमूद केला आहे. यातील ट्रक चालक शांतलिंगेश्वर ढाले व ट्रकचे मालक, क्लीनर महादेव विलास सुरवसे रा नांदगाव यांचे कॉल डिटेल्स काढून चौकशी करून योग्य ती कारवाई करावी अशी मागणी फिर्यादीत केली आहे.