Solapur Crime : गुप्तांग कापून खुनाचा प्रयत्न करणाऱ्या तिघांना सक्तमजुरी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Crime News

Solapur Crime : गुप्तांग कापून खुनाचा प्रयत्न करणाऱ्या तिघांना सक्तमजुरी

जेवायला जाण्याचा बहाणा करून जेवणानंतर निर्जनस्थळी नेऊन विश्वासघाताने तिघांनी एका इसमाचे गुप्तांग कापले. या प्रकरणाची गंभीर दखल घेत प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश डॉ. शब्बीर औटी यांनी तिन्ही आरोपींना ३० वर्षांची सक्तमजुरी व प्रत्येकी ५० हजारांच्या दंडाची शिक्षा ठोठावली. तसेच जखमी फिर्यादीला ३० लाखांची भरपाई देण्याचेही आदेश दिले.

फिर्यादी हा घरी असताना त्याचे लहानपणीचे मित्र खदीरसाब ऊर्फ नंदा चांदसाहेब पटेल व अ. हमीद ऊर्फ अमीर नजीर मुल्ला (दोघेही रा. तडवळगा, ता. इंडी) हे त्याच्याकडे आले. त्यांनी जेवायला जाऊ म्हणून फिर्यादीला बाहेर नेले. धाब्यावर जेवायला बसल्यावर हुसेनी नबीलाल जेऊरे ऊर्फ तोडुंगे (रा. करजगी, ता. अक्कलकोट) हा त्या ठिकाणी आला. सर्वांचे जेवण झाल्यावर आरोपी अ. हमीद याने त्याच्या मित्राची रिक्षा कडबगावजवळ बंद पडल्याचे सांगून त्यांनी फिर्यादीला निर्जनस्थळी नेले. त्याठिकाणी आरोपी अ. हमीदने फिर्यादीला शिवीगाळ केली व त्याच्या बियरची डोक्यात बाटली घातली. तर खदीरसाबने फिर्यादीला काठीने मारहाण केली.

‘का मारताय, माझे काय चुकले‘ अशी विचारणा करताच हुसेनीने ‘तू आमच्या डोक्यात बसलाय’ व ‘तुला माज आलाय, तुला जीवंत सोडणार नाही’ म्हणून छातीत लाथ घातली. त्यावेळी खदीरसाब व अ. हमीद या दोन मित्रांनी खाली पाडले आणि हुसेनी याने फिर्यादीचे कपडे काढून ब्लेडने गुप्तांग कापले. त्यानंतर फिर्यादीचा रक्तस्त्राव पाहून तिघेही पसार झाले. फिर्यादी हा विव्हळत तेथेच बेशुद्ध पडला.

पहाटे शुद्धीवर आला आणि तेथून जाणाऱ्या पादचाऱ्याकडील मोबाईलवरून भावाला हकीकत सांगितली. फिर्यादीच्या मेहुण्याने पोलिस पाटलांना माहिती दिली. पोलिस घटनास्थळी दाखल झाले आणि फिर्यादीवर अक्कलकोट ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार करून सिव्हिल हॉस्पिटलला हलवले. १७ नोव्हेंबर २०२१ रोजी अक्कलकोट दक्षिण पोलिसांनी गुन्हा दाखल झाला. फिर्यादीचा जबाब नोंदवून सहायक पोलिस निरीक्षक सी. बी.

बेरड यांनी तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. १४ साक्षीदार तपासले. त्यात पोलिस पाटील, फिर्यादी, मोबाइल दिलेला युवक, डॉक्टर व तपास अधिकाऱ्यांची साक्ष महत्त्वाची ठरली. फिर्यादीचा जबाब आणि साक्षीतील सुसंगती आणि परिस्थितीजन्य पुरावे, सरकारी वकिलांचा युक्तीवाद ग्राह्य धरून न्यायालयाने आरोपींना दोषी धरले.

सरकारी वकिलांचा जोरदार युक्तिवाद

फिर्यादी जीवनात कधीच सामान्य माणसांप्रमाणे लग्नानंतरचे जीवन उपभोगू शकत नाही. त्यामुळे जखमीस जास्तीत जास्त नुकसान भरपाई मिळावी म्हणत सरकारी वकिल माधुरी देशपांडे व नागनाथ गुंडे यांनी उच्च व सर्वोच्च न्यायालयाचे निवाडे सादर केले. तो युक्तीवाद ग्राह्य धरून प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश डॉ. औटी यांनी आरोपींना शिक्षा ठोठावली. मूळ फिर्यादीतर्फे ॲड. हुसेन बागवान यांनी तर आरोपींतर्फे ॲड. रियाज शेख यांनी काम पाहिले. कोर्टपैरवी म्हणून दिनेश कोळी यांनी मदत केली.

न्यायाधीशांकडून १५ दिवसांत निकाल

आरोपींतर्फे या गुन्ह्याचा निर्णय लवकर व्हावा म्हणून प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीशांकडे विनंती अर्ज करण्यात आला होता. १३ फेब्रुवारी रोजी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश डॉ. औटी यांनी या गुन्ह्याची तपासणी सुरु केली आणि २८ फेब्रुवारीला त्याचा निकालही दिला. तिन्ही आरोपींचा फिर्यादीला जीवे ठार मारण्याचा उद्देश होता. अतिशय निर्घृणपणे हे कृत्य करून आरोपींनी फिर्यादीच्या जीवनात अपरिमित असे नुकसान केले आहे. या पार्श्वभूमीवर आरोपींना शिक्षा ठोठावली. खुनाचा प्रयत्न केल्याच्या गुन्ह्यात एवढी मोठी शिक्षा देण्याची राज्यातील ही पहिलीच घटना असावी, असे सरकारी वकिलांनी सांगितले.

टॅग्स :Solapurcrime