
Barshi Rape Case: बार्शीतील अमानुष घटनेवर मोठी अपडेट; महिला आयोग तपासणार राजकीय कनेक्शन
मुंबई : सोलापूरमधील बार्शीमध्ये एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्यानंतर पोलिसात तक्रार दिली म्हणून तिची बोटं छाटण्यात आल्याचा अमानुष प्रकार समोर आला होता. याप्रकरणाची महिला आयोगानंही दखल घेतली होती. पण आता यामध्ये एक महत्वाची अपडेट समोर आली आहे. याप्रकरणातील राजकीय कनेक्शन तपासणार असल्याचं आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी साम टीव्हीशी बोलताना सांगितलं. (Barshi Rape Case Big update Womens Commission to check political connections)
चाकणकर म्हणाल्या, "ज्यावेळी ही घटना घडली त्यानंतर तातडीनं मी या प्रकरणाच्या तपास अधिकाऱ्यांशी संपर्क केला होता तसेच त्यांना आवश्यक त्या सूचनाही केल्या होत्या. ज्या पद्धतीनं मुलीवर अत्याचार झाला आणि पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिली म्हणून घरी जाऊन घरातल्या व्यक्तीवर हल्ला करणं हा सगळा विकृतीचा प्रकार पाहता.
पोलिसांनी देखील या प्रकरणाची तात्काळ दखल घेतली आहे. मुलीचं मेडिकल करुन आणि त्यानंतरचा तपास याचा अहवाल सादर करण्याच्या सूचनाही राज्य महिला आयोगाच्यावतीनं दिल्या आहेत. या सर्व घटनेचा राज्य महिला आयोग पाठपुरावा देखील करत आहे"
याप्रकरणी जर काही राजकीय अँगल असेल तर त्याची आयोग दखल घेईल. या घटना माणुसकीला काळीमा फासणाऱ्या आहेत. फास्टट्रॅक कोर्टात हे प्रकरण चालवणार आहोत. संबंधित पीडित कुटुंबियांकडून जर राजकीय संशयाची माहिती आली तर त्याचाही तपास केला जाईल, असंही चाकणकर यांनी म्हटलं आहे.
सुरुवातीला ज्यावेळी आयोगानं या प्रकरणाची दखल घेतली तेव्हापासून अद्यापपर्यंत यामध्ये राजकीय कनेक्शन असल्याची कोणतीही माहिती आमच्यापर्यंत आलेली नाही. पण अशी माहिती असेल तर आयोग त्याची दखल घेईल, असंही यावेळी रुपाली चाकणकर यांनी स्पष्ट केलं.