जिल्ह्यातील 70164 लाभार्थींना प्रत्येकी दीड हजार लॉकडाउन पॅकेज

जिल्ह्यातील लाभार्थींना मिळणार लॉकडाउन पॅकेज
Workers
WorkersEsakal

सोलापूर : कोरोनाची साखळी खंडित करण्याच्या हेतूने संपूर्ण राज्यात 15 दिवसांची संचारबंदी लागू करण्यात आली आहे. या पार्श्‍वभूमीवर हातावरील पोट असेलल्या घटकांसाठी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी मदतीचा हात दिला आहे. त्यानुसार सोलापूर जिल्ह्यातील 70 हजार 164 विविध घटकांमधील लाभार्थ्यांना दहा कोटी 52 लाख 46 हजारांची मदत मिळणार आहे.

कोरोनामुळे अनेकांसमोर उदरनिर्वाहाचा प्रश्‍न निर्माण झाला असून हातातील कामदेखील कोरोनामुळे गेले आहे. अशा परिस्थिती मुख्यमंत्र्यांनी नोंदणीकृत घरेलू कामगार, बांधकाम कामगार, परवानाधारक रिक्षाचालक आणि नोंदणीकृत फेरीवाल्यांना प्रत्येकी दीड हजार देण्याचा निर्णय घेतला. मात्र, बॅंका बंद असल्याने अथवा त्यांना घराबाहेर पडता येत नसल्याने ही रक्‍कम काढायची कशी हा पेच त्यांच्यासमोर निर्माण झाला आहे. सोलापूर जिल्ह्यात 34 हजारांहून अधिक नोंदणीकृत बांधकाम कामगार असून 18 हजारांपर्यंत घरेलू कामगारांची नोंदणी झाल्याची माहिती सहायक कामगार आयुक्‍त निलेश यलगुंडे यांनी दिली. तर शहरात नोंदणीकृत एकूण चार हजार 773 फेरीवाले आहेत. मात्र, काही दिवसांपूर्वी त्यांचा फेरसर्व्हे करण्यात आला. त्यावेळी महापालिकेने त्यांना कागदपत्रांची मागणी केली होती. परंतु, त्यातील एक हजार 966 जणांनीच महापालिकेकडे कागदपत्रे जमा केली. त्यामुळे आता किती फेरीवाल्यांना मदत मिळणार याबाबत संभ्रम आहे.

लॉकडाउनमध्ये मदत मिळणारे लाभार्थी...

  • नोंदणीकृत घरेलू कामगार : 18000

  • बांधकाम कामगार : 34,460

  • अधिकृत फेरीवाले : 4,773

  • परवानाधारक रिक्षाचालक : 12,931

  • प्रत्येकी मिळणारी मदत : 1500

परवानाधारक रिक्षाचालकांची यादी पाठविली जाईल

सोलापूर शहरात परवानाधारक रिक्षाचालकांची संख्या 12 हजार 652 असून अकलूज आरटीओ कार्यालयाअंतर्गत 279 परवानधारक रिक्षाचालक आहेत. त्यांची यादी परिवहन आयुक्‍तालयाला पाठविली जाणार आहे.

- संजय डोळे, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, सोलापूर

विडी कामगारांना काहीच मदत नाही

सोलापूर शहरातील जवळपास 55 हजार कामगार विडी उद्योगावर अवलंबून आहेत. राज्य सरकारने लॉकडाउन काळात नोंदणीकृत बांधकाम कामगार, घरेलू कामगारांना अर्थसहाय देण्याचा निर्णय घेतला. मात्र, असंघटित कामगारांची संख्या सोलापूर शहर-जिल्ह्यात मोठी आहे. त्यात विडी कामगारांचाही समावेश आहे. हातावरील पोट असलेल्या विडी कामगारांची चिमुकली शाळा शिकत पालकांना मदत करतात, असे चित्र पहायला मिळते. शासनाने त्यांना मदत देण्यासंदर्भात काहीच म्हटलेले नाही, असे सहायक कामगार आयुक्‍तांनी सांगितले.

निराधार योजनांचे दीड लाख लाभार्थी

कडक निर्बंध लावत असताना राज्य सरकारने संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ योजना, केंद्र पुरस्कृत इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्तीवेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती वेतन, इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्ती वेतन योजना अशा या पाच योजनेतील लाभार्थ्यांना दोन महिन्यांकरिता प्रत्येकी एक हजार रुपयांचे आर्थिक सहाय्य आगाऊ देण्याचा निर्णय घेतला आहे. सोलापूर शहर व जिल्ह्यात या पाचही योजनांचे जवळपास दिड लाख लाभार्थी आहेत. या लाभार्थ्यांना ही आर्थिक मदत मिळणार आहे.

सोलापुरात पाच ठिकाणी शिवभोजन

शिवभोजन थाळी योजनेतून एक महिन्यासाठी दोन लाख थाळ्या मोफत देण्याचा निर्णय राज्य सरकराने घेतला आहे. सोलापूर शहरात सध्या बसस्थानक, सोलापूर बाजार समिती, अश्‍विनी रुग्णालय, मार्कंडेय सहकारी रुग्णालय यासह इतर परिसरात एकूण 5 शिवभोजन थाळी केंद्र सुरु आहेत. सोलापूर शहरासाठी रोज 825 थाळ्या दिल्या जात आहेत.

संपादन : श्रीनिवास दुध्याल

बातमीदार : तात्या लांडगे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com