Solapur : भीमा सहकारी साखर कारखान्यासाठी हाय व्होल्टेज फाईट; चुरशीचा सामना रंगणार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

 खासदार धनंजय महाडिक, आमदार राजन पाटील

Solapur : भीमा सहकारी साखर कारखान्यासाठी हाय व्होल्टेज फाईट; चुरशीचा सामना रंगणार

सोलापूर : मोहोळ तालुक्यातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवर परिणाम होण्यासह, खासदार धनंजय महाडिक, आमदार राजन पाटील आणि प्रशांत परिचारक यांच्या राजकीय अस्तित्वाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या ठरत असलेल्या तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लक्ष घातल्याने अत्यंत ''लक्षवेधी'' झालेल्या मोहोळ तालुक्यातील टाकळी सिकंदर येथील भीमा सहकारी साखर कारखान्याच्या ''हाय व्होल्टेज'' फाईट टू फाईट निवडणुकीच्या प्रचारामध्ये पिता-पूत्र, भाऊ-भाऊ उतरले आहेत. त्याशिवाय काही नेत्यांच्या सौभाग्यवतीही प्रचाराच्या रणांगणात दिसत आहेत. त्यातून ‘कुटुंबं रंगले प्रचारात''चा प्रत्यय येत आहे.

भीमा कारखान्यावर कोणत्याही परिस्थितीत आपले वर्चस्व कायम राहिले पाहिजे, आपल्या अस्तित्वाच्या चाललेल्या लढाईत, निवडणूक प्रचारादरम्यान कोणत्याही परिस्थितीत आपण मागे रहायला नको, शेतकरी सभासदांपर्यंत पोहोचायलाच पाहिजे, या पक्क्या इराद्याने खास निवडणुकीसाठी मोहोळ तालुक्यात मुक्काम ठोकलेले भीमा परिवाराचे प्रमुख आणि खा. महाडिक, त्यांच्या सौभाग्यवती अरुंधती महाडिक, सुपुत्र विश्वजीत महाडिक हे प्रचाराच्या आखाड्यात आहेत. प्रचारासाठी अवघे काही दिवस राहिले असताना, प्रचाराचे दिवसभराचे वेळापत्रक ठरवून ते अधिकाधिक मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहेत.

कडवे राजकीय विरोधक महाडिक यांना टक्कर देण्यासाठी राजधानी अनगरमधून भीमा कारखान्याच्या प्रांतात माजी आमदार राजन पाटील त्यांचे सुपुत्र बाळराजे उर्फ विक्रांत आणि अजिंक्यराणा पाटील यांनी आपले अश्व उधळते ठेवले आहेत. कोणत्याही परिस्थितीत महाडिक यांचे या कारखान्यावरील वर्चस्व बाजूला सारुन माजी आमदार परिचारक यांच्या सहकार्याने भीमा कारखान्यावर आपल्या नेतृत्वाचा झेंडा फडकवण्यासाठी अनगरकर-पाटील परिवार या निवडणुकीच्या आखाड्यात उतरला आहे‌. निवडणुकीच्या तापलेल्या प्रचारात अनगरकर-पाटील परिवार व्यस्त आहे.

विशेष म्हणजे भीमा कारखान्याशी सुधाकरपंत परिचारक यांच्यापासून अत्यंत जवळीकता असल्याने माजी आमदार परिचारक हेदेखील या कारखान्याच्या प्रचारात उतरले आहेत. प्रणव परिचारकांनीही या आखाड्यात प्रचारासाठी उडी घेतली आहे.

अनगरकरांवर उमेश पाटलांच्या पुन्हा धडाडत्या तोफा

राष्ट्रवादीचे प्रदेश प्रवक्ते आणि राज्यातील राष्ट्रवादीचे हाय प्रोफाईल नेतृत्व उमेश पाटील यांनी भीमा कारखान्याच्या निवडणुकीत महाडिक गटाच्या बाजूने प्रचारात उडी घेतली आहे. अनगरकरांवर चौफेर टीकेच्या तोफा डागण्याची आजवर एकही संधी न सोडलेल्या उमेश पाटील यांना अनगरकरांना 'लक्ष्य' करण्याची आयतीच संधी आली आहे. भीमा कारखान्याची निवडणूक ही उमेश पाटील यांच्यासाठी पर्वणी ठरली आहे. या प्रचारादरम्यान त्यांनी राजन पाटील परिवाराला टार्गेट करून त्यांच्या कारभाराचे पितळ उघड करत, महाडिक गटाच्या बाजूने चांगलेच रान पेटवले आहे.

विश्वजित महाडिक यांचा झंझावती प्रचार

उच्चविद्याभूषित विश्वजित महाडिक हे भीमा कारखान्याचा गड आपल्याच परिवाराच्या ताब्यात राहण्यासाठी जंग-जंग पछाडत आहेत. त्यांच्या भेटी आणि प्रचार सभांना भीमा कारखान्याच्या प्रांतात चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे सांगितले जात आहे. कारखान्याचे भावी चेअरमन म्हणून त्यांच्याकडे पाहिले जात आहे. अत्यंत पद्धतशीरित्या निवडणुकीच्या प्रचाराची धुरा पिताश्री धनंजय महाडिक यांच्या नेतृत्वाखाली ते सांभाळत आहेत. या निवडणुकीच्या आखाड्यात त्यांचा झंजावती प्रचार सुरू आहे.

नरखेडकर पाटील भाऊ-भाऊ प्रचाराच्या माहोलात

भीमाच्या प्रचाराच्या माहोलात नरखेडचे उमेश पाटील आणि संतोष पाटील हे सख्खे भाऊ उतरले आहेत‌. निवडणुकीच्या या प्लॅटफॉर्मवरून पाटील बंधूंनी अनगरकर पिता पुञांना चांगलेच 'लक्ष्य' केले आहे. अनगकरांवर टीकेचे तोफ गोळे फोडण्यासाठी पाटील बंधूंना या निवडणुकीचा तगडा प्लॅटफॉर्म सापडला आहे. भीमा परिवाराचे प्रमुख महाडिक हे भाजपवासी असले तरी, तत्वाचे राजकारण आणि तालुक्यातील शेतकऱ्यांच्या मालकीचा सहकारातील कारखाना चांगल्या संचालक मंडळाच्या ताब्यात देण्याच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे प्रदेश प्रवक्ते उमेश पाटील हे भीमा शेतकरी विकास आघाडी पॅनलच्या माध्यमातून प्रचाराचे रणांगण तापवत आहेत. तर त्यांचे ज्येष्ठ बंधू भाजपचे संतोष पाटील हे भाजप पुरस्कृत महाडिक गटाच्या पॅनलच्यावतीने निवडणूक आखाड्यात असणे साहजिक आहे.

नव्या पिढीचा झंझावात

भीमा कारखान्यावर आपल्याच गटाच्या नेतृत्वाचा अटकेपार झेंडा लागायला हवा, या इर्षेने पेटलेल्या नव्या पिढीतील नव्या दमाच्या विश्वजीत महाडिक, बाळराजे पाटील, अजिंक्यराणा पाटील, उमेश पाटील, संतोष पाटील आदींनी राजकारण आणि सहकारात नव्या पिढीचे नेतृत्व करणाऱ्या या मंडळींनी भीमाच्या निवडणुकीत झंझावात निर्माण केला आहे.