'भिमा' ने जमा केले शेतकऱ्यांच्या खात्यावर सात कोटी रुपये! ऊसाची आवक वाढली | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Bhima sahakari sugar factory

कारखान्यावरील शेतकऱ्यांचा विश्वास अधोरेखित झाला आहे.

'भिमा' ने जमा केले शेतकऱ्यांच्या खात्यावर सात कोटी रुपये

sakal_logo
By
राजकुमार शहा

मोहोळ (सोलापूर): टाकळी सिकंदर (ता.मोहोळ) येथील भीमा सहकारी साखर कारखान्याने चालू गळीत हंगामात गाळपास आलेल्या 1 ते 15 नोव्हेंबर या पंधरवड्यातील ऊसाची पहिली उचल प्रति टन 2 हजार 100 रुपयाप्रमाणे 5 कोटी 60 लाख रुपये तर, सन 2017/18 या गळीत हंगामातील शब्द दिलेल्या दीडशे रुपये पैकी 50 रुपयांचा पहिला हप्ता दीड कोटी रुपये असे एकूण 7 कोटी रुपये शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यात जमा केल्याची माहिती कारखान्याचे अध्यक्ष तथा भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष धनंजय महाडिक यांनी दिली. यामुळे कारखान्यावरील शेतकऱ्यांचा विश्वास अधोरेखित झाला आहे. दरम्यान उसाची आवक वाढल्याने सोमवार पासून नवीन युनिट सुरु करणार असल्याचे ही अध्यक्ष महाडिक यांनी सांगितले.

हेही वाचा: भीमा सहकारी साखर कारखान्याकडे १३५ कोटींची थकबाकी

या संदर्भात कारखान्याचे उपाध्यक्ष सतीश जगताप, कार्यकारी संचालक सूर्यकांत शिंदे यांनी दिलेल्या माहिती नुसार, भीमा कारखान्याकडे गेल्या गळीत हंगामातील 28 कोटी रुपयांची एफ आर पी थकीत होती. विविध शेतकरी संघटना सह विरोधकांनीही कारखान्यावर आरआरसी ची कारवाई करावी, अशी मागणी साखर आयुक्ताकडे केली होती, त्यामुळे कारखान्याची साखर असलेली 7 गोदामे महसूल प्रशासनासह बँकेने सील केली होती. एफ आर पी देणे 28 कोटी तर साखर अडकली 70 कोटी ची अशी अवस्था भिमाची झाली होती. दरम्यान अध्यक्ष महाडिक यांनी केंद्रासह राज्य शासनाच्या संबंधित मंत्र्याकडे वस्तुस्थिती मांडून पाठपुरावा केला, अखेर त्याला यश आले व आरआर सी अंतर्गत कारखान्याला साखर विक्रीची परवानगी मिळाली, त्यामुळे 28 कोटी ची एफ आर पी पूर्ण झाली.

हेही वाचा: भीमा सहकारी साखर कारखाना दुसरे बिल 100 रुपये प्रति टनाप्रमाणे काढणार

सन 2017/18 च्या गळीत हंगामातील एफआरपी कारखान्याने यापूर्वीच पूर्ण केली आहे, मात्र दीडशे रुपये प्रति टन जादा पैसे देण्याची घोषणा अध्यक्ष महाडिक यांनी केली होती, त्यापैकी काही जणांना ते पैसे मिळाले ही परंतु आर्थिक अडचणीमुळे काही शेतकऱ्यांना ते देणे शक्‍य झाले नाही. पैसे उपलब्ध होताच दिलेला शब्द पाळायचा या अध्यक्ष महाडिक यांच्या व्यवहारीक कार्यशैली मुळे त्यातील पन्नास रुपयाचा पहिला दीड कोटी रुपयांचा हप्ता उसाच्या पैशा अगोदर शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा केला.

हेही वाचा: थकीत एफआरपी व दिवाळीला शेतकऱ्यांना साखर देण्यासाठी "भीमा'चे बंद गोदाम उघडा : जनहित शेतकरी संघटना 

कारखान्याचे विस्तारीकरण झाले आहे. जुना कारखाना व नवीन कारखाना असे त्याला संबोधले जाते. सध्या जुना कारखाना सुरू आहे. मात्र ऊस उत्पादकांचा भिमाच्या काट्या वरील विश्वासामुळे उसाची आवक ज्यादा सुरू झाल्याने सोमवार (ता. 22) पासून नवीन कारखाना सुरू करणार असल्याचे उपाध्यक्ष जगताप यांनी सांगितले. नवीन कारखाना सुरू झाल्यामुळे सहवीज निर्मिती प्रकल्प कार्यान्वित होणार असून त्या माध्यमातून दररोज 15 लाख रुपयाची 4 लाख युनिट वीज तयार होणार आहे. ती सर्व वीज कराराप्रमाणे एक्सपोर्ट करणार असल्याचे जगताप यांनी सांगितले.

सध्या दररोज पाच हजार मेट्रिक टन उसाचे गाळप होईल एवढे नियोजन संचालक मंडळाने केले असून, तेवढी यंत्रणा सज्ज झाली आहे. अडचणीच्या ठिकाणी हार्वेस्टर यंत्राने ऊस तोडणी केली जात असून, अशा प्रकारची पाच यंत्र कारखान्याकडे असल्याचे कार्यकारी संचालक शिंदे यांनी सांगितले. यावेळी शेती अधिकारी माणिक पाटील, संचालक अनिल गवळी उपस्थित होते.

loading image
go to top