
भिमाच्या निवडणुकीचे सर्वाधिकार महाडिक यांना व युवकांना संधी द्या; सभासदांची मागणी
मोहोळ : यापूर्वी आम्ही विरोधकांच्या मागणीवरून भीमा साखर कारखाना बिनविरोध त्यांच्या ताब्यात दिला होता, आता आमची विनंती आहे की त्यांनी मन मोठे करून, सभासदांच्या व कारखान्याच्या हितासाठी कारखाना बिनविरोध करावा या मागणीचा त्यांनी सकारात्मक विचार करावा. या निवडणुकीत युवकांचा विचार करण्यात येईल, निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जे बरोबर येतील त्यांना घेऊन जाऊ असे प्रतिपादन भीमा कारखान्याचे अध्यक्ष तथा नुतन खासदार धनंजय महाडिक यांनी केले. टाकळी सिकंदर ता मोहोळ येथील भीमा सहकारी साखर कारखान्याची पंचवार्षिक निवडणुकीची प्रक्रिया सुरू आहे.
त्या पार्श्वभूमीवर विचारविनिमय करून संचालक ठरविण्यासाठी विचार विनिमय सभेचे महाडिक शेड येथे आयोजन केले होते त्यावेळी खासदार महाडिक सभासद, ऊस उत्पादक शेतकरी व भीमा परिवाराच्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करीत होते. यावेळी कारखान्याचे उपाध्यक्ष सतीश जगताप, संतोष पाटील, विश्वराज महाडिक, विनोद महाडिक, पवन महाडिक, संजय डोंगरे, शंकर वाघमारे, बब्रुवान माळी, छगन पवार, मानाजी माने, विक्रांत माने, सुनील चव्हाण, माणिक बाबर, राजू बाबर, भारत पाटील, अशोक क्षीरसागर, महादेव देठे, भीमराव वसेकर, तानाजी गुंड, पांडुरंग ताटे, यांच्यासह मोहोळ, मंगळवेढा व पंढरपूर तालुक्यातील शेतकरी, सरपंच, उपसरपंच इतर पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या विचार-विनिमय सभेत निवडणुकी बाबतचे सर्व अधिकार खासदार महाडिक यांना सर्वानुमते देण्यात आले, तर अनेक सभासदांनी धनंजय महाडिक यांचे चिरंजीव विश्वराज महाडिक यांना अध्यक्ष करावे अशी मागणी केली, तसेच युवकांना संधी द्यावी,कारखाना बिनविरोध करावा अशा मागण्या करण्यात आल्या.यावेळी सूमारे 50 ते 60 इच्छुकांना त्याचे मनोगत व्यक्त करण्याची संधी देण्यात आली.
यावेळी माजी उपसभापती मानाजी माने म्हणाले, भीमा कारखाना बिनविरोध होईल असे मी मागील सहा महिन्यापूर्वी सांगितले होते, स्वतःची इस्टेट तारण ठेवून कारखान्या साठी पैसे उपलब्ध करणारे खासदार महाडिक हे एकमेव चेअरमन आहेत. यावेळी आरपीआयचे नेते हनुमंत कसबे म्हणाले, मोहोळ तालुक्यातील शेतकऱ्यांची पिळवणूक थांबवावयाची असेल तर खासदार महाडिक यांनी तालुक्यात लक्ष घातले पाहिजे, तसेच विधानसभा बदलासाठी खासदार महाडिक यांच्या शिवाय पर्याय नसल्याचेही त्यांनी सांगितले. तुंगतचे महादेव देठे म्हणाले, सध्या संगणकाचे युग आहे, कारखान्याच्या संचालक पदासाठी सुशिक्षित व पदवीधरांना संधी द्यावी या भीमा पॅटर्नचा आदर्श संपूर्ण महाराष्ट्र घेईल. यावेळी शंकर वाघमारे ,संतोष पाटील,दिगंबर माळी यांनी मनोगते व्यक्त केली.सुत्र संचलन पांडुरंग ताटे यांनी केले. देशाचे नेते तथा राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पावसात भिजत भाषण केले होते त्यावेळी त्यांना यश प्राप्त झाले होते.आजच्या सभेत ही खा महाडिक यांनी पावसात भिजत भाषण केले त्यामुळे विजय निश्चीत असल्याची चर्चा सभास्थळी होती.