
CM शिंदेंचा मोठा निर्णय! अतिवृष्टीमुळे नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांना मिळणार ५४ कोटीची आर्थिक मदत
कळंब : खरीप हंगाम अति पावसाने मातीमोल केला होता. यामुळे अर्थकारण कोलमडलेल्या शेतकऱ्यांना कमीत कमी तीन हेक्टरपर्यंत हेक्टरी १३ हजार ६०० रुपयाची थेट मदत देण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सरकारने घेतला होता.
यानुसार तालुक्यातील इटकूर, गोविंदपूर, शिराढोण, कळंब महसूल मंडळातील ४६ हजार शेतकऱ्यांना तब्बल ५४ कोटी रुपयांची मदत लवकरच वाटप करण्यात येणार आहे.
त्यासाठी तलाठी यांच्याकडून शेतकऱ्यांचे आधारकार्ड, बँक पासबुक झेरॉक्स जमा करण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे.
तालुक्यातील ९८ हजार हेक्टर लागवडी खालील क्षेत्रापैकी तब्बल ७८ हजार हेक्टर क्षेत्रावर खरीपांची विविध पिके घेतली जातात. यामुळेच खरीप हंगाम हा तालुक्यातील प्रमुख पीक हंगाम म्हणून ओळखला जातो.
या हंगामातील सोयाबीन, तूर, कापूस आदी १३ पिके ही पूर्णपणे मोसमी पावसावर अवलंबून आहेत. परंतु, गत पावसाळ्यात जोमात बरसलेल्या वरुणराजाने खरीपातील पिके मातीमोल केली.
तालुक्यातील चार महसूल मंडळात अति पाऊस झाल्याने खरिपातील सर्व पिकाचे प्रचंड असे नुकसान झाले. चार महसूल मंडळातील शेतकऱ्यांचे जवळपास प्राथमिक अंदाजानुसार ६० कोटींपेक्षा जास्त रुपयाचे न भरून येणारे नुकसान झाले.
अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना प्रतिहेक्टरी मदत देण्याचा निर्णय शासनाने घेतला होता. यापूर्वी नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झालेल्या पिकांस प्रति हेक्टर ६ हजार ८०० रुपये आर्थिक मदत करण्याचे निकष होते.
यात मुख्यमंत्री शिंदे-उपमुख्यमंत्री फडणवीस सरकारने बदल करत कमीत कमी तीन हेक्टर पर्यंत हेक्टरी १३ हजार ६०० रुपयाची मदत शेतकऱ्यांना करण्याचा निर्णय घेतला आहे. फळपीकांसाठीही अनुदानाची मर्यादा वाढविण्यात आली आहे.
बँक डिटेल्स घेण्याचे काम सुरू
यात आधारकार्ड, बँक पासबुक झेरॉक्स संकलित करण्याचे काम तलाठ्यांमार्फत सुरू आहे. ही प्रक्रिया पूर्ण होताच शेतकऱ्यांनी दिलेल्या बँक खात्यावर अनुदानाची रक्कम वर्ग करण्यात येणार आहे.
इटकूर, गोविंदपूर, शिराढोण, कळंब महसूल मंडळातील सर्व गावातील ४६ हजार शेतकऱ्यांना आर्थिक मदत वाटप करण्यात येणार आहे. यासाठी तहसील कार्यालयाने शेतकऱ्यांना आर्थिक मदतीसाठी ५४ कोटी रुपयाची शासनाकडे मागणी केली होती.