Solapur : 'मला शेवटचं बोलायचंय..’; भाजप नेत्याचा बेडरूममधील व्हिडिओ व्हायरल; महिलेचा आत्महत्येचा प्रयत्न | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

BJP leader Shrikant Deshmukh Video goes viral

अंगावर शालू, गळ्यात मंगळसूत्र असं सुवासिनीचं लेणं घालूनच तिने आत्महत्येचा प्रयत्न केला.

Solapur : 'मला शेवटचं बोलायचंय..’; भाजप नेत्याचा बेडरूममधील व्हिडिओ व्हायरल; महिलेचा आत्महत्येचा प्रयत्न

सांगोला : भाजपचे (BJP) सोलापूरचे तत्कालीन जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख (Shrikant Deshmukh) यांचा एका महिलेसोबतचा बेडरूममधील व्हिडिओ व्हायरल झाला होता. त्या महिलेने गुरुवारी (ता. १८) विषारी वनस्पतीच्या बिया खाऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे.

आत्महत्या करण्याचा प्रयत्न करण्यापूर्वी तिने ‘श्रीकांत देशमुख, मला तुम्हाला शेवटचं बोलायचं आहे...’ असे म्हणत एक व्हिडिओही व्हायरल केला आहे. त्या महिलेवर प्रथम सांगोल्याच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल करून उपचार सुरू केले व पुढील उपचारासाठी सोलापूर येथे पाठविण्यात आले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्यापासून भाजपच्या नेत्यांची नावे घेऊन बदनामी करते म्हणून सांगोल्यातील एका भाजपच्या पदाधिकाऱ्याने संबंधित महिलेच्या विरोधात स्थानिक पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती. त्यावरून तिच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर संबंधित महिला आज (गुरुवारी) श्रीकांत देशमुख यांच्या जवळा (ता. सांगोला) येथील घरी गेली होती. संबंधित महिलेने विषारी बिया खाऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे.

अंगावर शालू, गळ्यात मंगळसूत्र असं सुवासिनीचं लेणं घालूनच तिने आत्महत्येचा प्रयत्न केला. आत्महत्येचा प्रयत्न करण्यापूर्वी तिने केलेल्या व्हिडिओमध्ये म्हटले आहे, ‘श्रीकांत देशमुख, मला तुम्हाला शेवटचं बोलायचं आहे. मी आता जगण्याची लायकीची राहिली नाही. माझ्याजागी दुसरी मुलगी असती तर तिने हे पहिलंच केलं असतं.

भाजपच्या लोकांना कळावं म्हणून मी हे पाऊल उचलत आहे. माझ्याकडे काही पर्याय नसल्यामुळे मी माझे जीवन संपवत आहे. माझ्या मृत्यूला राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, माढ्याचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, श्रीकांत देशमुख, त्यांचे दोन्ही भाऊ हे जबाबदार असतील. भाजपच्या माणसाला सांगून माझ्यावर एक केस केली आहे. त्यामुळे मला हे सर्व अनावर झाले आहे, त्यातून मी माझे जीवन संपवत आहे,’ असे सांगून तिने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे.

व्हिडिओमध्ये ती म्हणत आहे की, ‘मला कोणीही पाठिंबा दिलेला नाही. मदत मागितली, पण कोणीही मला मदत दिली नाही. युवा मोर्चामधील गणेश पांडे, दिवेकर, अमित शेलार, नील सोमय्या, दीपक ठाकूर, संतोष आव्हाड आणि इतर लोकांना माहिती आहे की मी कशी आहे ते. आशिष शेलार आणि दिव्या ढोले यांनाही मी कशी आहे, ते माहिती आहे. माझा संसार होता. बीजेपीवाल्यांमुळे माझा संसार उद्‌ध्वस्त केला आहे.’

पोलिसांनी दाखल केले दवाखान्यात

संबंधित महिलेने थेट पोलिस स्थानकात येऊन आपण धोत्र्याच्या बिया खाल्ल्याचे पोलिसांना सांगितले असता, सांगोल्याचे पोलिस निरीक्षक अनंत कुलकर्णी यांनी महिलेस तत्काळ सांगोला ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी तिला पुढील उपचारासाठी सोलापूरला पाठविले. रात्री उशिरापर्यंत याबाबत पोलिसांत नोंद झाली नव्हती.