
Gold Rate : अर्थसंकल्पाची निराशा सोने बाजारावर कायम; ग्राहक संख्या घटली
सोलापूर :अर्थसंकल्पाने सोने-चांदी बाजाराला कोणताच दिलासा न दिल्याने सोन्याच्या भाव कमी होण्याची शक्यता अजूनही धूसरच आहे. चढत्या भावामुळे ग्राहक संख्या निम्म्याने घटली आहे.
मागील काही महिन्यापासून सोन्याचे भाव कमी व्हावेत यासाठी सुवर्णकार व्यापारी संघटनांनी देशपातळीवर एकत्रितपणे सोन्यावरील आयात कर कमी व्हावा यासाठी प्रयत्न केले होते. सोन्याचे भाव पन्नास हजार रुपयाच्या पुढे वाढले की ग्राहक संख्या घटण्यास सुरवात होते. त्याप्रमाणे ग्राहक संख्या निम्याने घटली असून सोने खरेदीसाठी इच्छुक असलेल्यांना आता दर कमी होण्याची प्रतीक्षा लागून राहिली आहे.
आवाक्याच्या बाहेर सोन्याचे भाव गेले की, निम्न मध्यमवर्गातील ग्राहक सोने खरेदीचा नादच सोडून देतो. त्यामुळे आयात कर कमी झाल्यास झालेली भाव वाढ काही प्रमाणात कमी होणे शक्य होते. पण प्रत्यक्षात अर्थसंकल्पात याबाबतची कोणतीही घोषणा झाली नाही. आयात कर व जीएसटी हे दोन्ही कर सोन्याच्या व्यवहारात स्थिर राहीले आहेत.
अर्थसंकल्पानंतर एक दिवस सोन्याचे भाव एक हजार रुपयांनी वाढले होते. पण त्यानंतर पुन्हा कमी झाले. तरीही सोन्याचे भाव ५६ ते ५७ हजार रुपये प्रती तोळा याच प्रमाणात कायम आहे. केवळ तीनशे ते चारशे रुपयांचा फरक त्यामध्ये पडतो आहे.
चांदीच्या बाबतीतदेखील हीच स्थिती आहे. त्यामुळे अगदी लग्नसराई जोरात असताना देखील ग्राहकी निम्म्यापेक्षा अधिक घटली आहे. खरेदीदारांनी पाठ फिरवल्याने सोने बाजाराला आता आयात कर कमी झाल्याशिवाय कोणताही दिलासा मिळणे अशक्यच झाले आहे.
काय घडलं-बिघडलं बाजारात?
सोने आयात करात बदल न झाल्याने दरवाढ कायम
अर्थसंकल्पातील घोषणांचा दरावर परिणाम नाही
सोन्याचे भाव ५० हजाराच्या पुढे जाताच सामान्य ग्राहकांची निराशा
सोने गुंतवणूक मर्यादेबाहेर गेल्याने पर्यायी गुंतवणुकीचा शोध