Solapur : पोलिसांना मारहाण करणाऱ्या मनसेजिल्हाध्यक्षावर गुन्हा दाखल, बचावासाठी उतरले सगळे पक्ष | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

case registered against MNS district president Prashant Gidde beating government employees solapur

Solapur : पोलिसांना मारहाण करणाऱ्या मनसेजिल्हाध्यक्षावर गुन्हा दाखल, बचावासाठी उतरले सगळे पक्ष

मोडनिंब : मनसेचे सोलापूर जिल्हाध्यक्ष प्रशांत गिड्डे व अन्य आठ जणांवर टेंभुर्णी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गिड्डे यांना आज (शनिवारी) न्यायालयात हजर केले असता, त्यांना न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे.

याबाबत हकीकत अशी की, शुक्रवारी (ता. १९) सायंकाळी साडेआठच्या सुमारास करकंब पोलिस ठाण्यातील कर्मचारी काही आरोपींना घेऊन मोडनिंबमार्गे पंढरपूर येथे जात होते. येथील चौकात आल्यानंतर रोडवर प्रशांत गिड्डे यांची गाडी उभी होती.

पोलिस कर्मचाऱ्यांनी ही गाडी बाजूस घेण्याविषयी चालकास सांगितले असता, गिड्डे यांनी पोलिस कर्मचाऱ्यांना शिवीगाळ करून मारहाण केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. या प्रकरणी प्रशांत गिड्डे व अन्य आठ जणांवर शासकीय कामात अडथळा व शासकीय कर्मचाऱ्यांना मारहाण केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत नीलेश सूर्यकांत रोंगे यांनी फिर्याद दिली असून, तपास टेंभुर्णी पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक एम. पी. पवार करीत आहेत.

गिड्डे यांच्या अटकेनंतर सर्वपक्षीयांचे निवेदन

मोडनिंब : मनसेचे जिल्हाध्यक्ष प्रशांत गिड्डे यांच्यावर खोटे गुन्हे दाखल करून त्यांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्यावरील गुन्हे तत्काळ मागे घ्यावेत. करकंब पोलिस ठाण्यातील तीन कर्मचाऱ्यांनी दारू पिऊन गिड्डे यांना मारहाण केली. त्या कर्मचाऱ्यांची वैद्यकीय तपासणी करून त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी सर्वपक्षीयांकडून निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

यावेळी मनसे लोकसभा अध्यक्ष प्रशांत इंगळे, जिल्हाध्यक्ष विनायक महिंद्रकर, सोलापूर शहराध्यक्ष जैनुद्दीन शेख, अभिषेक रामपुरे, गोविंद बंदपट्टे, महादेव मांढरे, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष कैलास तोडकरी,

काँग्रेसचे बालाजी पाटील, आरपीआयचे नागनाथ ओहोळ, भाजपचे धनाजी लादे, श्रीकांत लादे, शिवसेनेचे दीपक सुर्वे, तंटामुक्तीचे अध्यक्ष प्रकाश गिड्डे, सुनील ओहोळ आदी सर्वपक्षीय पदाधिकारी उपस्थित होते. याबाबतचे निवेदन गुन्हे शाखेचे प्रमुख सुहास जगताप यांना सोलापूर येथे देण्यात आले.

‘पोलिसांची एकतर्फी कारवाई’

करकंब पोलिस ठाण्यातील तीन कर्मचारी व प्रशांत गिड्डे यांचा चालक यांच्यामध्ये गाडी रस्त्याच्या मध्ये का लावली, यावरून वादावादी झाली. यादरम्यान गिड्डे मध्यस्थी करण्यासाठी पुढे आले असता त्या तिघांनी प्रशांत गिड्डे यांना मारहाण केली.

याचवेळी मोडनिंब पोलिस दूरक्षेत्रचे गणेश जगताप व पोलिस कर्मचारी तेथे पोचले. जगताप यांनाही या कर्मचाऱ्यांनी अरेरावीची भाषा वापरली. करकंब पोलिस ठाण्याचे कर्मचारी हे खासगी वाहनातून व सिव्हिल ड्रेसवर असल्याने त्यांची ओळख पटणे शक्य नव्हते. जगताप यांनाही अरेरावीची भाषा झाल्यानंतर जमलेल्या गर्दीतील लोकांनी गाडीतील तिघांना मारहाण केली.

दरम्यान, या प्रकरणाची माहिती पंढरपूर उपविभागीय अधिकारी कदम यांना कळताच ते घटनास्थळी दाखल होऊन सत्यता न तपासता गिड्डे यांच्यासह चार ते पाच जणांची धरपकड केली. त्यांना टेंभुर्णी पोलिस ठाण्यात नेले. गिड्डे यांच्यावर एकतर्फी कारवाई करण्यात आल्याचा आरोप मनसे जिल्हा कार्यकारिणी सदस्य फिरोज मुजावर यांनी केला आहे.

‘सीसीटीव्ही’तून उघड झाला नेमका प्रकार

दरम्यान, गुन्हा घडला त्या ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेज तपासले असता त्यात गिड्डे यांची गाडी रस्त्याच्या पूर्णपणे बाजूस उभी दिसत असून त्याच्यापुढे येऊन एक पांढऱ्या रंगाची गाडी उभी राहते व त्यातील तिघेजण उतरून गिड्डे यांच्या गाडीजवळ जाऊन मारहाण करीत असल्याचे चित्र स्पष्टपणे दिसते. यानंतर मात्र प्रचंड गर्दी जमा झाल्याने पुढील काही घटना दिसत नाही.

ही घटना घडल्यानंतर अवघ्या काही वेळातच पंढरपूर उपविभागीय अधिकारी कदम व करकंब पोलिस ठाण्याचे कर्मचारी मोडनिंब येथे पोचले. घटना घडलेल्या चौकात यामुळे काही काळ दहशतीचे वातावरण निर्माण झाले होते. काही पत्रकारांच्या हातातील चित्रीकरण करणारे मोबाईल फोनही पोलिस कर्मचाऱ्यांकडून काढून घेण्यात आले. यानंतर मोडनिंब दूरक्षेत्र परिसरात असणाऱ्या गणपती मंदिराजवळ शतपावली करणाऱ्या काही ज्येष्ठ नागरिकांनाही या कर्मचाऱ्यांचा लाठीमार सहन करावा लागला.

टॅग्स :Solapurpolicepoliticalmns