सावधान...! लॉकडाउनमध्ये डोळ्याच्या आजाराचा धोका 

Caution risk of eye disease in lockdown
Caution risk of eye disease in lockdown

अक्कलकोट (जि. सोलापूर) : राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी लॉकडाउन सुरू आहे. त्यामुळे घरातील सर्व आबालवृद्ध सुरक्षिततेसाठी घरातच आहेत. परिणामी वेळ जात नाही म्हणून सर्वजण हातातील स्मार्ट फोन हा मुख्य आधार समजून विरंगुळा करत आहेत. लहान मुलांपासून ज्येष्ठांपर्यंत तासंतास स्मार्ट फोन, लॅपटॉप व संगणक वापरले जात आहे. शाळा व नोकरी बंद असल्याने घराघरात प्रत्येकाचा "स्क्रीन टाइम' प्रचंड वाढलेले आहे. मात्र, हा स्क्रीन टाइम धोकादायक असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. सतत मोबाईल, टीव्ही पाहण्याने लहान मुले, ज्येष्ठ नागरिक तसेच सर्वच वयोगटात डोळ्यांच्या आजारांचा धोका वाढू लागला आहेत. त्यामुळे लॉकडाउनमध्ये डोळ्यांच्या समस्या कमी करण्यासाठी स्क्रीन टाइम कमी करणे व पारंपरिक बाबींकडे वळणे हिताचे ठरणार आहे. 
कोरानाचा प्रादुर्भाव कधी कमी होणार आणि लॉकडाउन कधी संपेल याची नेमकी माहिती कोणी सांगू शकत नाही. यामुळे या दोन-तीन महिन्याच्या कालावधीत सतत मोबाईल वापरल्याने डोळ्याचे आजार वाढून त्यातून समस्या निर्माण होण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे डोळ्यांच्या तज्ज्ञांबरोबर संवाद साधून डोळ्यांची काळजी घेणे हिताचे ठरणार आहे. 
याबाबत"सकाळ'शी बोलताना सोलापूरच्या प्रसिद्ध नेत्ररोग तज्ज्ञ डॉ. अनुराधा अवस्थी म्हणतात, सतत मोबाईल वापरण्याने डोळे कोरडे होतात आणि त्यातून डोळ्यांच्या अनेक समस्या उद्भवू शकतात. यासाठी दहा-पंधरा मिनिटे मोबाईल पाहिल्यानंतर परत फिरणे व अन्य कामात वेळ घालविणे हिताचे आहे. सतत आपल्या डोळ्यांच्या पापण्यांची हालचाल होत राहणे महत्त्वाचे आहे. सध्या उन्हाळा असल्याने आर्द्रता कमी असते, त्यातून सतत मोबाईल पापण्या उघडझाप न करता पाहिल्याने कोरडेपणा येऊ शकतो. त्यामळे डोळे कचकच करतात, मग आपल्याला पहायला त्रासदायक वाटायला लागते. वापर वाढला असल्याने अनेकांना डोळ्यांच्या समस्या जाणवू लागल्या आहेत. यासाठी काळजी घेणे हिताचे आहे. शाळा बंद असल्याने लहान मुले घरीच आहेत. त्यांचे बाहेर खेळायला जाणे बंद केल्याने त्यांना धुळीचा त्रास कमी होत आहे. ऍलर्जी होण्याचे प्रमाण कमी झाल्याचे लाभ दिसत असला तर ही मुले मोबाईलच्या पूर्ण अधिन राहणे हेही धोकादायक ठरणार आहे. ज्येष्ठ व्यक्तींनी सतत मोबाइल वापरणे हे डोळ्याच्या समस्या वाढविणारे आहे. जसे वाहनांचे वायपर हे सतत काच स्वच्छ ठेवण्याचे काम करतात तसेच डोळ्याच्या पापण्याची सतत उघडझाप केल्यानेच डोळे स्वच्छ व सदृढ राहतात. त्यासाठी डोळ्यांची सतत हालचाल ठेवणे गरजेचे आहे, असेही डॉ. अवस्थी यांनी सांगितले. 

मुलांच्या डोळ्यांचे दोष वाढतायेत 
अनेक मुले तासन्‌तास मोबाईल पाहतात. अंधारातही मोबाईल पाहण्याचे प्रमाण अधिक असते. सतत स्क्रीनवर पाहिल्याने मुलांत डोळ्यांचे दोष निर्माण होतात. संशोधनानुसार, लहान वयापासून अतिरिक्त स्क्रीन पाहण्याने मुलांच्या वाढीत अनेक चिंता निर्माण होण्याची शक्‍यता असते. स्क्रीनच्या किरणांमुळे केवळ त्यांच्या डोळ्यांवर परिणाम होतो इतकेच नव्हे, तर त्यांच्या झोपेच्या चक्रावरही दुष्परिणाम होऊन रात्रीची झोपही कमी होते. वाढीच्या वयातल्या मुलांत लठ्ठपणा मोठ्या प्रमाणावर आढळतो. कारण, मुले मोबाईल पाहात पाहात अनेकदा जंक फूड खातात जे आरोग्याला घातक असतं. मुले मोबाईल पाहताना इतकी तल्लीन होतात, की त्यांना काय आणि किती खावे याचे भान राहत नाही. पालकांनी मोबाईलची सवय मुलांना कुठून लागली, याचाही गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com