esakal | मंगळवेढा तालुक्यात तिसऱ्या डोळ्याने टाकल्या माना
sakal

बोलून बातमी शोधा

CCTV off in Mangalvedha taluka

शहरातील दामाजी चौक, चोखोमेळा चौक, मुरलीधर चौक, बोराळे नाका आदी ठिकाणी गर्दी असते. वाहतूक कोंडीत व वर्दळीमध्ये वाहनचोरी, शहरात शिक्षणासाठी आलेल्या शालेय मुलीची छेडछाड व अन्य अप्रिय घटना घडल्यानंतर या प्रकरणाची चौकशी करताना शहरातील मोठ्या व्यापाऱ्यांच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या फुटेझचा आधार घ्यावा लागत होता.

मंगळवेढा तालुक्यात तिसऱ्या डोळ्याने टाकल्या माना

sakal_logo
By
हुकूम मुलाणी

मंगळवेढा (सोलापूर) : कोरोना व्हायरसमुळे नागरिकांना वटणीवर आणताना पोलिस ऐन उन्हात हतबल होताना तपास कार्यात व गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी बसवलेल्या तिसऱ्या डोळ्याने माना टाकल्याने संचारबंदीची अमंलबजावणी करताना पोलिसांना जिकरीचे ठरत आहे. परिणामी धाक नसलेली तरूणाई रस्त्यावर येऊ लागली आहे.


शहरातील दामाजी चौक, चोखोमेळा चौक, मुरलीधर चौक, बोराळे नाका आदी ठिकाणी गर्दी असते. वाहतूक कोंडीत व वर्दळीमध्ये वाहनचोरी, शहरात शिक्षणासाठी आलेल्या शालेय मुलीची छेडछाड व अन्य अप्रिय घटना घडल्यानंतर या प्रकरणाची चौकशी करताना शहरातील मोठ्या व्यापाऱ्यांच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या फुटेझचा आधार घ्यावा लागत होता. रतनचंद शहा बॅकेचे अध्यक्ष राहूल शहा यांनी शहरातील गुन्हेवारीवर नियंत्रण मिळविण्याच्या दृष्टीने दामाजी चौकात चार कॅमेरे, चोखोमेळा चौकात पाच कॅमेरे मुरलीधर चौकात एक आणि महिला हॉस्पीटल जवळ एक असे 11 कॅमेरे बसवून दिले. त्याची क्षमता ३१ कॅमेरे बसतील अशी आहे. याचे नियंत्रण पोलिस ठाण्यातून केल्यामुळे गुन्हेगारीवर नियंत्रण राहिल्याने पोलिसांचे काम गतीमान झाले. पण या कॅमेऱ्याने सध्या माना टाकल्या, कोरोनातील संचारबंदीची अमंलबजावणी करताना नागरिकावर लक्ष ठेवून दुचाकीवर कारवाई, नियमित तपास, गुन्हेगार अटक, न्यायालयात हजर, ग्रस्त ही प्रक्रिया राबविताना पोलिस दलातील रिक्त पदामुळे मेटीकुटीला येत आहेत. तरीही पोलिसांनी ३०० च्या आसपास दुचाकीवर कारवाई केली आहे.  हा तिसरा डोळा सुरू असता तर पोलिसांचे काम आणखी सोपे झाले असते. चार वर्षांपूर्वी झालेल्या नगरपालिका निवडणुकीमध्ये हे सत्ताधारी व विरोधी गटाच्या नेत्यांनी जाहीरनाम्यात शहरात सर्व ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याचा दावा केला म्हणून सत्ता येऊन चार वर्षात या सुविधेकडे दुर्लक्ष केल्यामुळे ताण पोलिस यंत्रणेवर पडत आहे. शहरात संचारबंदीत घराबाहेर पडणे, दुचाकीवर बेफाम सुटणे अशी कृते जनतेकडून होताना यावर तिसय्रा डोळ्याने वचक ठेवणे अधिक सोयीचे ठरले असते. परंतु दुर्दैवाने हे झाले नाही. सोशल डिस्टन्सीग रहावा म्हणून लोकप्रतिनिधीही सध्या कोरोनाच्या भितीत जनतेपासून लांब आहेत. अशा परिस्थितीत कोरोनाचा सामना करण्याची जबाबदारी आरोग्य, महसूल आणि पोलिस पथकावर राहिली. पण या खात्यातील रिक्त पदामुळे त्यांना अतिरिक्त काम आणि शारीरीक त्रासाला सामोरे जावे लागले यात मंगळवेढ्यातील वरिष्ठ अधिकारी देखील सुटले नाहीत. अशा परिस्थितीत शहरातील तिसरा डोळा सुरू करणे या दृष्टीने ना नगरपालिकेने लक्ष दिले, ना सामाजिक संस्थेने पुढाकार घेतला. उलट या बंद कॅमेऱ्यामुळे पोलिसांची डोकेदुखी वाढली.

खर्चासाठी तरतुद नाही
शहरात सीसीटीव्ही बसविल्यानंतर देखभाल, दुरूस्ती करणे ही महत्त्वाचे होते. बसविल्यापासूनचा खर्च आजतागायत कोणीही उचलला नाही. यासाठी दरमहा साधारणपणे सहा हजार रुपये खर्चासाठीची अशी कोणतीही तरतूद केली नाही. सुरूवातीची दीड वर्ष नैतिक जबाबदारी म्हणून आम्ही विनामूल्य सेवा दिली.त्यानंतरही कोणीही जबाबदारी घेतली नाही. केवळ दुरुस्ती व देखभाल वेळेवर न केल्यामुळे दीड वर्षापासून ही यंत्रणा बंद अवस्थेत आहे.
- जमीर इनामदार, मंगळवेढा