
Solapur : कर्नाटक विधानसभा निवडणुकीचा परिणाम शिंदे सरकार झाले गतिमान; विविध योजनांचा सुकाळ
सोलापूर - राज्य सरकारच्या विविध योजनांचा सध्या भडीमार सुरु असून लाभार्थ्यांच्या दारात जाऊन लाभ देण्यासाठी जिल्हा प्रशासन व जिल्हा परिषद गतिमान कारभार करत आहेत. कर्नाटक विधानसभा निवडणुकीत भाजपच्या पराभवाच्या पार्श्वभूमीवर, महाराष्ट्र सरकारचा मतदारांना आकृष्ट करण्याचा प्रयत्न असून शकतो.
राज्य सरकारकडून १५ मे १५ जून या कालावधीत शासन आपल्या दारी हे अभियान राबविण्यात येत आहे. जिल्हा परिषद प्रशासनाने ‘शासन आपल्या दारी’ या उपक्रमातून विविध योजना दिल्या जात आहेत. याबाबत सर्व ग्रामपंचायतीना माहिती देण्यात आली असून लाभार्थीची अर्ज प्रक्रिया पूर्ण करणे. लाभार्थी निश्चित करणे हे काम पंचायत समिती स्तरावर सुरू आहे.
मुख्यमंत्र्यांच्या आदेशानुसार जिल्हा परिषदेच्या विविध ३८ योजनांचा लाभ देण्यात येत असल्याचे जिल्हा परिषदेचे उममुख्य कार्यकारी अधिकारी ईशादिन शेळकंदे यांनी सांगितले. सरकारच्या विविध योजनांसाठी लाभार्थी निश्चित करणे, अर्ज प्रक्रिया पूर्ण करण्याचे तसे मुंजरीची प्रक्रिया सुरू आहे. रोजगार हमी योजनेचे उद्दिष्ट तालुकानिहाय देण्यात आले आहे.
स्वच्छ भारत अभियानांतर्गंत वैयक्तिक शौचालयसाठी १२ हजार लाभार्थ्यांचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. १५ जूनपर्यंत चार हजार ९०० जणांना शौचायलय अनुदानाचा लाभ मिळणार आहे. पशूसंवर्धन विभागाकडून शेळी-पालन योजनेसाठी १९९ लाभार्थी निश्चित करण्यात आले आहेत. कुकुटपालन योजनेसाठी ४४ तर मेंढीपालन योजनेसाठी १५४ लाभार्थी निश्चित करण्यात आले आहेत.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वालंबन योजनेसाठी १२९० अर्ज भरून घेण्यात आले आहेत. रोजगार हमी येाजनेतून विहिरीसाठी २.५० लाख अनुदान देण्यात येते. यासाठी ८४ अर्ज आले होते त्यापैकी १२ अर्ज मंजूर करण्यात आले आहेत. शिक्षण विभागीतील योजना शाळा सुरू झाल्यानंतर सुरू करण्यात येणार आहेत. पंचायत समिती स्तरावर सर्व योजनांची माहिती व अर्ज उपलब्ध आहेत, जिल्ह्यातील सर्व लाभार्थ्यांनी या ठिकाणी संपर्क साधण्याचे आवाहन श्री. शेळकंदे यांनी केले आहे.