आयुक्‍तसाहेब, तुम्ही तर लक्ष द्या ! रेणूका नगर 29 वर्षांपासून तहानलेलेच; ना आमदाराचे ना नगरसेवकांचे लक्ष 

1Water_Shortage_10.jpg
1Water_Shortage_10.jpg

सोलापूर : हद्दवाढ भाग शहरात येऊनही आता 29 वर्षे पूर्ण झाली. तरीही, जुळे सोलापुरातील रेणुका नगर विकासापासून कोसो दूर आहे. निवडणुकीवेळी वारंवार फिरकणारे नगरसेवक तथा आमदारांनी लक्ष न दिल्याने या भागातील नागरिकांना दररोज सोडाच, नऊ दिवसांतून एकदा पाणी मिळते. विद्यमान आमदार सुभाष देशमुख, नगरसेविका राजश्री चव्हाण यांच्या प्रयत्नातून प्रश्‍न सुटतील, असा विश्‍वास नागरिकांना वाटतोय. मात्र, तेही त्यांच्याकडे फिरकत नसल्याने त्यांनी 'सकाळ'कडे गाऱ्हाणे मांडले.

रेणुका नगराची सद्यस्थिती 

  • अंदाजित आठशे कुटुंब असून साधारणपणे साडेतीन हजार लोकसंख्येचे हे नगर 
  • काही वर्षांपूर्वी कुठेतरी ड्रेनेजलाईन टाकली, पण आऊटर लाईन जोडलीच नाही 
  • अंतर्गत रस्त्यांना डांबरीकरणाची प्रतीक्षा; खड्ड्यांमुळे पावसाळ्यात घराबाहेर पडताच येत नाही 
  • दररोज तर सोडाच, आठ-नऊ दिवसांतून एकदा मिळते टॅंकरद्वारे पाणी 
  • तीन-चार दिवसानंतर विकत घ्यावे लागते पाणी; पाण्यासाठी 12 महिने करावी लागते भटकंती 

महापालिकेला शहर असो वा गावठाणच्या तुलनेत सर्वाधिक महसूल हद्दवाढ भागातून विशेषत: जुळे सोलापुरातून मिळतो. मात्र, 29 वर्षांनंतरही काही नगरांमध्ये ना ड्रेनेज ना नळ कनेक्‍शनची सोय झाली. अंतर्गत रस्ते, ड्रेनेज नको, परंतु वेळेवर पुरेसे पाणी तर द्या, अशी मन हेलावणारी मागणी येथील नागरिकांनी केली आहे. पाण्याचा टॅंकर आठ-नऊ दिवसाला येतो, परंतु पुरेसे पाणीदेखील मिळत नाही. रस्ते खराब असल्याने टॅंकरच्या वेळा नियमित नाहीत. विभागीय कार्यालयातील अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार ठराविक भागाला चार-पाच दिवसाआड टॅंकरद्वारे पाणीपुरवठा केला जातो. मात्र, रेणुका नगरातील नागरिकांनी लोकप्रतिनिधी असो वा अधिकाऱ्यांकडे मागणी करुनही पुरेसे पाणी मिळत नसल्याचे चित्र आहे. आता उन्हाळा तोंडावर असल्याने महापालिका आयुक्‍त, पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी आणि लोकप्रतिनिधी या भागातील नागरिकांची तहान भागविणार का, याकडे लक्ष लागले आहे. 

प्रशासनाने आमची पाण्याची सोय करावी 
महापालिका आयुक्‍त चांगले काम करतात. त्यांचे अनेकांनी कौतुकही केले आहे. पाणीपुरवठ्यासाठी चांगला नवा अधिकारी आल्याचेही समजले. त्यांनी पुरेसे पाणी देऊन आमची तहान भागवावी. 
- अलिम शेख 

स्मार्टसिटीतून कोट्यवधींची कामे, आम्हाला पाणीही मिळेना 
रेणुका नगरातील रस्ते, ड्रेनेज, पाण्याची व्यवस्था, रस्त्यांवरील विजेच सोय, असे अनेक प्रश्‍न 29 वर्षांत सुटलेले नाहीत. स्मार्ट सिटीच्या गप्पा मारणाऱ्या अधिकाऱ्यांनी याठिकाणी भेट देऊन पाणी करायला हवी. 
- ताराबाई चव्हाण 

आमदार सुभाष देशमुख यांच्या माध्यमातून होईल काम 
आमदार, नगरसेवकांकडे आमचा पाण्याचा प्रश्‍न सोडवा, म्हणून अनेकदा मागणी केली. मात्र, निवडणुकीच्या निमित्ताने फिरकणारे लोकप्रतिनिधी आमचे प्रश्‍न सोडविण्यासाठी दोन वर्षांत एकदाही आले नाहीत. 
- सुरेखा सलगर 

मुलाबाळांसाठी बाहेरुन आणावे लागते पाणी 
शहरातील नागरिकांना वेळेनुसार पुरेशा प्रमाणात पाणी मिळते. परंतु आम्हाला आठ-दहा दिवसाआड टॅंकरद्वारे पाणी मिळते. पुरेसे पाणी मिळत नसल्याने मुलाबाळांसाठी बाहेरुन विकत पाणी आणावे लागते. 
- कणकलता महिमाने 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com