चीनशी स्पर्धा करणारा सोलापुरातील "हा' उद्योग होतोय कोलॅप्स ! काय आहे कारण?

चीनशी स्पर्धा करणारा सोलापुरातील "हा' उद्योग होतोय कोलॅप्स
Garment
Garmentpc

सोलापूर : संपूर्ण जगाला "कोव्हिड-19'च्या दुष्टचक्रात ढकललेल्या चिनी ड्रॅगनशी स्पर्धा करणारा सोलापूर टेक्‍स्टाईल उद्योगातील महत्त्वाचा युनिफॉर्म गारमेंट उद्योग आता कोलॅप्स होण्याच्या मार्गावर आहे. वार्षिक कोट्यवधींची उलाढाल करणाऱ्या या उद्योगावर आता मजुरी बेसिसवर काम करण्याची वेळ आली आहे. ही वेळ आणली केवळ अन्‌ केवळ कोव्हिड-19 च्या भयानक विषाणूने.

आज शहरातील महिला विडी कामगारांना पर्यायी रोजगार देणारा व्यवसाय म्हणून गारमेंट उद्योगाकडे पाहिले जात आहे. येथे फॅन्सी गारमेंटशिवाय आज येथील गारमेंट व्यवसायाने जगात सोलापूरचे नाव युनिफॉर्म हब म्हणून केले आहे. सोलापुरात जवळपास 450 ते 500 छोट्या- मोठ्या युनिफॉर्म गारमेंट फॅक्‍टऱ्या आहेत. 20 ते 25 हजार कामगार कार्यरत आहेत. या उद्योगात नर्सरी ते कॉलेजपर्यंतच्या स्टुडंट्‌स युनिफॉर्म, कॉर्पोरेट युनिफॉर्म्सची व हॉस्पिटल आदी अनेक क्षेत्रांसाठी लागणाऱ्या युनिफॉर्मची निर्मिती मोठ्या प्रमाणात होते.

युनिफॉर्म उत्पादकांनी केंद्र व राज्य वस्त्रोद्योग मंत्रालयाच्या सहकार्याने गेल्या चार वर्षांपासून (2015 ते 2019) सलग आंतरराष्ट्रीय प्रदर्शनांचे आयोजन करून सोलापूर युनिफॉर्मचे नाव जगभरात केले. असे आंतरराष्ट्रीय प्रदर्शन भरवणारे जगातील गारमेंट असोसिएशन म्हणूनही सोलापूरचे नाव झाले. परिणामी, देशातील अनेक राज्यांसह विदेशातूनही युनिफॉर्मला मोठ्या प्रमाणात मागणी असते.

टेक्‍स्टाईल उद्योगातील जागतिक स्पर्धा

2018-19 च्या जागतिक निरीक्षणानुसार समोर आलेल्या आकडेवारीनुसार, संपूर्ण जगाला टेक्‍स्टाईल उत्पादने पुरवण्यात चीनचा वाटा 61.69 टक्के आहे. चीन जगभरात 157.8 मिलियन डॉलरची टेक्‍स्टाईल उत्पादने निर्यात करतो. त्यानंतर दुसरा क्रमांक युरोपियन युनियनचा (147.5 बिलियन डॉलर), तिसरा क्रमांक बांगलादेश (32.5), चौथा क्रमांक व्हिएतनाम (31.5) व पाचवा क्रमांक भारताचा लागतो (16.6). यानंतर टर्की, हॉंगकॉंग, इंडोनेशिया, कंबोडिया व यूएसए यांचा क्रमांक लागतो. भारतातील टेक्‍स्टाईल उद्योगाला चार देशांकडून स्पर्धा आहे.

चीन व इतर देशांशी स्पर्धा करणाऱ्या व उत्तरोत्तर प्रगती करणाऱ्या गारमेंट उद्योगाला मात्र कोरोनाने नामोहरम केले आहे. गेल्या वर्षीपासून ब्रेक बसलेल्या युनिफॉर्म उद्योगाला या वर्षीही शाळा- कॉलेज बंद असल्याने मोठ्या संकटाला सामोरे जावे लागत आहे. 450 ते 500 युनिफॉर्म फॅक्‍टऱ्यांपैकी निम्म्यावर फॅक्‍टऱ्या बंद झाल्या आहेत. हजारो कामगार बेरोजगार झाले असून, ते हैदराबाद व इतर ठिकाणी स्थलांतर करण्याच्या मानसिकतेत असून जवळपास 500 कुटुंबे स्थलांतर झाल्याचे समजते.

करोडोंची उलाढाल करणारा उद्योग आता पिशव्या शिवतोय!

अनेक युनिफॉर्म फॅक्‍टऱ्या बंद पडल्या असून, ज्या सुरू आहेत त्याही फक्त कामगार टिकावेत व त्यांचा प्रपंच चालावा यासाठी मास्क व इतर किरकोळ कामे मजुरी बेसिसवर करत आहेत. मुंबईहून रेक्‍झिनच्या पिशव्या पडेल त्या मजुरीवर शिवत आहेत. आता पिशव्यांच्या ऑर्डरी संपल्या असून, पुढे काय? असा प्रश्‍न या उद्योगासमोर उभा आहे.

जरी शाळा सुरू झाल्या तरी...

शाळा- महाविद्यालये सुरू झाली तरी हा उद्योग आता सावरू शकत नाही, अशी परिस्थिती आहे. कारण, गेल्या वर्षी प्रत्येक उद्योजकाने कापड व इतर सामग्रीसाठी गुंतवलेली लाखोंची गुंतवणूक तशीच पडून असून, दुसरीकडे बॅंकांचे कर्ज फेडण्यामध्ये भांडवल संपले आहे. आता जरी कामे मिळाली तरी बॅंका कर्ज देतील का, हा प्रश्‍न उद्योजकांसमोर उभा आहे.

पर्यायी उद्योगाकडे वळत आहे युनिफॉर्म इंडस्ट्री

युनिफॉर्म ऑर्डरी मिळणार नसल्याने उद्योजक आता पर्यायी उद्योगाकडे वळत आहेत. कोणी फॅन्सीमध्ये तर कोणी दुसराच उद्योग सुरू करण्याच्या मानसिकतेत आहेत. कामगार स्थलांतर करण्याच्या मार्गावर असल्याने फॅन्सीमध्येही कामगार मिळण्याची शक्‍यता कमी वाटत आहे. तसेच 50 ते 60 टक्के उद्योजक बॅंकांच्या कर्जावर अवलंबून असल्याने त्यांना उद्योग बंद करून कर्ज फेडावे लागणार आहे. उद्योजक आता कामगार बनण्याच्या मार्गावर आहेत.

- राजेंद्र कोचर, सचिव, श्री सोलापूर रेडिमेड कापड उत्पादक संघ

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com