esakal | कोरोना विकत घेण्यासाठीच भरला बाजार जणू ! प्रशासन आदेश काढून मोकळे; कोणालाच नाही गांभीर्य

बोलून बातमी शोधा

Crowd

कोरोना विकत घेण्यासाठीच भरला बाजार जणू ! प्रशासन आदेश काढून मोकळे; कोणालाच नाही गांभीर्य

sakal_logo
By
विजय थोरात

सोलापूर : शहर- जिल्ह्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. रुग्णांची संख्या देखील झपाट्याने वाढत आहे. याच पार्श्वभूमीवर सोलापूर जिल्हा प्रशासनाने रविवारी वैद्यकीय सेवा वगळता सर्व दुकाने बंद ठेवण्याचे आदेश दिले होते. त्यामुळे सोमवारी सकाळी बाजार उघडताच नागरिकांची एकच गर्दी पाहायला मिळाली. आज मंगळवारीही बाजारातील दृष्य चिंताजनकच होते. त्यामुळे गर्दी हटेना, कोरोना कमी होईना; भाजी बाजारात नियमांचे सर्रास उल्लंघन होत असल्याचे पाहायला मिळाले. जणू कोरोना विकत घेण्यासाठीच बाजार भरल्याचे चित्र सर्वत्र आहे. (Corona infection is on the rise due to congestion in the city markets)

शनिवार व रविवार वगळता शहरातील भाजी मार्केटमध्ये नियमांचे उल्लंघन होत असल्याचे चित्र सर्रास पाहायला मिळत आहे. महापालिका प्रशासन आदेश काढून मोकळे झाले; मात्र नेहमीप्रमाणे निर्णय केवळ कागदावरच राहिल्याचे शहरातील गर्दीकडे पाहून यावर शिक्कामोर्तबच झाले. आदेशाच्या अंमलबजावणीसाठी बाजारामध्ये सकाळी महापालिका यंत्रणा कुठेच दिसून येत नाही. सकाळी सात ते अकरा वाजेपर्यंत भाजी मार्केट व इतर दुकाने सुरू ठेवण्याची परवानगी असताना देखील अकरानंतर देखील दुकाने अर्धे दार उघडून सुरू असतात. पोलिस मात्र जनजागृती करण्याच्या घोषणा देत होते. मात्र पोलिस प्रशासनाकडून कोणतीही कारवाई झाली नाही.

हेही वाचा: निवडणुकीच्या रिंगणात या, मग दंड थोपटा ! भगीरथ भालकेंचं परिचारकांना थेट आव्हान

सोलापूर शहर- जिल्ह्यातील रुग्णांची संख्या कमी व्हावी व कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव कमी व्हावा यासाठी रविवारी सर्व व्यवहार बंद ठेवण्यात आली होती. मात्र सोमवारी सकाळी तसेच मंगळवारीही नागरिकांची खरेदीसाठी एकच गर्दी झाल्याचे दिसून आले.

महापालिका व पोलिस प्रशासनाची नाही कारवाई

निर्बंधाचे आदेश केवळ कागदावरच असल्याचे कस्तुरबा मार्केट, रेल्वे स्टेशन भाजी मंडई, लक्ष्मी मार्केटमध्ये दिसून आले. जवळपास दोन- अडीच तास व्यापारी, किरकोळ व्यावसायिकांनी व नागरिकांनी गर्दी केली होती. काहींनी तर तोंडाला मास्क लावण्याची आणि फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन करण्याची तसदीही घेतली नाही. नियमांचा फज्जा उडत असतानाही महापालिका, पोलिस प्रशासन कारवाई करताना दिसून आले नाही.

हेही वाचा: "आमचं ठरलंय ! काय ठरलं होतं हे आता संजयमामांनीच सांगावं !'

पोलिसांची जनजागृती, पण परिणाम काहीच नाही

कस्तुरबा मार्केट व रेल्वे स्टेशन परिसरातील भाजी मार्केटमध्ये सोमवारी सकाळी भाजीपाल्याची विक्री होत होती आणि व्यावसायिक व ग्राहकांकडून नियमांना हरताळ फासण्यात येत होते. या ठिकाणी एक पोलिस कर्मचारी व एक होमगार्ड जवान कारवाई करण्याऐवजी येथे विक्री करू नका, वेळ संपली आहे, असे सांगत निघून गेले. माणुसकी म्हणून आता कारवाई करत नाही; मात्र नियमांचे पालन करा, असेही ते या वेळी येथील भाजी विक्री करणाऱ्या व्यापाऱ्यांना सांगत होते.