
Corona Update Solapur : कोरोना विषाणूचा डंख उतरला
सोलापूर : कोरोना विषाणूच्या पहिल्या व दुसऱ्या लाटेत ‘जगतो की मरतो’ अशी असणारी भीती आता पूर्णतः: कमी झाली आहे. सोलापूर जिल्ह्यात सध्या कोरोनाचा एकही रुग्ण नसून दिलासादायक बाब म्हणजे २० नोव्हेंबरनंतर सोलापूर शहरात एकही नवीन रुग्ण आढळलेला नाही. तर मागील अडीच महिन्यांत जिल्ह्यातील माढा, मंगळवेढा व पंढरपूर या तालुक्यातील तीन रुग्ण वगळता उर्वरित आठ तालुक्यात देखील नवीन रुग्ण सापडलेला नाही.
कोरोना विषाणूच्या पहिल्या दोन लाटांमध्ये मृत्यूदरात सोलापूर शहर देशातील टॉपटेन शहरांमध्ये होते. ग्रामीणमधील पंढरपूर, करमाळा, मोहोळ या तालुक्यांमध्येही सर्वाधिक मृत्यूदर होता. कोरोनाने अनेक चिमुकल्यांचे आई-वडील तर उतारवयातील आई-वडिलांचा तरुण आधार हिरावला. कोरोनाने कोणाची लाडकी लेक तर कोणाचा आवडता मुलगा गेला.
जिल्ह्यातील जवळपास दीड हजार मुलांचे (१८ वर्षांखालील) पालक कोरोनामध्ये मरण पावले. अनेक विवाहिता विधवा देखील झाल्या. त्या कोरोना विषाणूचा डंख आता उतरला आहे. कोर्बोवॅक्स (१२ ते १४ वयोगट), कोविशिल्ड व कोवॅक्सिन (१८ वर्षांवरील) या प्रतिबंधित लसींमुळे कोरोनाची तीव्रता कमी झाली आणि लोकांमधील सामुहिक रोगप्रतिकारक शक्ती वाढली.
जिल्ह्यातील जवळपास २४ लाख ५१ हजार व्यक्तींनी प्रतिबंधित लस टोचून घेतली. त्याचबरोबर कोरोना होऊ नये म्हणून प्रत्येकांनी पंचसूत्रीचे पालन देखील तंतोतंत केले. त्यामुळे दोन लाख २१ हजार ९४६ व्यक्तींना होऊन गेलेला कोरोना आता पूर्णपणे शांत झाला आहे.
संपूर्ण जिल्हा दोन महिन्यांपासून कोरोनामुक्त
१६ जानेवारी २०२१ पासून कोरोनावरील प्रतिबंधित लसीकरणास सुरवात झाली. त्यानंतर कोरोनाची तीव्रता कमी होण्यास मोठी मदत झाली. आतापर्यंत कोरोना होऊ नये म्हणून जिल्ह्यातील १५ ते १८ वयोगटातील सव्वादोन लाख तर १२ ते १५ वयोगटातील दीड लाख मुलांनी कोरोनाचा प्रतिबंधित डोस टोचून घेतला आहे.
मागील दोन महिन्यांपासून सोलापूर शहरात व ग्रामीणमधील एकाही तालुक्यात कोरोनाचा रुग्ण आढळलेला नाही. लोक अजूनही गर्दीच्या ठिकाणी मास्क लावतात, हे विशेष. दुसरीकडे बाहेरून आल्यावर हाताची स्वच्छता करतात. त्यामुळे कोरोना हद्दपार होण्यास मदत झाल्याचे वैद्यकीय तज्ज्ञ सांगत आहेत.
लसीकरणाची स्थिती
एकूण टार्गेट - ३२,६२,८७६
दोन डोस घेतलेले - २४,५०,१७६
बूस्टर डोस घेतलेले - १,८१,४५६
एकूण लसीचे डोस - ५८,९४,५०८