Solapur News: कोरोनामुळे ८० वर्षांवरील दोन महिलांचा मृत्यू! सोलापूर जिल्ह्यात १९ रुग्ण; घाबरू नका, पण काळजी घ्या | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Solapur News
कोरोनामुळे ८० वर्षांवरील दोन महिलांचा मृत्यू! सोलापूर जिल्ह्यात १९ रुग्ण; घाबरू नका, पण काळजी घ्या

Solapur News: कोरोनामुळे ८० वर्षांवरील दोन महिलांचा मृत्यू! सोलापूर जिल्ह्यात १९ रुग्ण; घाबरू नका, पण काळजी घ्या

Solapur News: : सोलापूर शहरात कोरोनाचे १५ आणि ग्रामीणमध्ये चार असे एकूण १९ सक्रिय रुग्ण आहेत. शनिवारी (ता. ११) शहरातील ८० वर्षीय आणि ग्रामीणमधील ७४ वर्षीय अशा दोन को-मॉर्बिड महिलांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. त्याची नोंद मंगळवारी (ता. १३) आरोग्य विभागाच्या अहवालात झाली आहे.

कोरोनामुळे सोलापूर शहरात मृत्यू होणाऱ्यांची संख्या आता एक हजार ५१७ झाली आहे. मागील तीन-चार महिन्यातील पहिल्या मृत्यूची नोंद मंगळवारी झाली. ग्रामीणमध्येही अनेक दिवसांनी माढा तालुक्यातील एका ७४ वर्षीय महिलेचा शनिवारी (ता. ११) कोरोनामुळे मृत्यू झाला. दोन्ही रुग्णावर छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयात उपचार सुरु होते.

ॲडमिट झालेल्या दिवशीच त्या महिलेचा मृत्यू झाल्याने त्यांचा कोरोना रिपोर्ट सोमवारी प्राप्त झाला. त्यामुळे दोन्ही मृत्यूची नोंद सोमवारच्या रिपोर्टमध्ये झाली आणि तो मंगळवारी (ता. १४) प्रसिद्ध करण्यात आल्याचे आरोग्य विभागाने स्पष्ट केले.

शहरातील मृत ८० वर्षीय महिला १५ दिवसांपूर्वी रुग्णालयात दाखल होती. तिला उच्च रक्तदाब, मधुमेह, किडनीचा आजार, दम्याचा आजार असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. दरम्यान, त्या महिलेच्या कुटुंबीयांची कोरोना टेस्ट पार पडली. त्यावेळी घरातील कोणीच पॉझिटिव्ह आढळले नाही.

जिल्ह्यातील ‘या’ चार गावात कोरोनाचे रुग्ण

ग्रामीणमध्ये सध्या सांगवी (ता. पंढरपूर), बिटले (ता. मोहोळ), वडाळा व खेड (ता. उत्तर सोलापूर) या गावांमध्ये कोरोनाचा प्रत्येकी एक रुग्ण आहे.

दिलासादायक बाब म्हणजे त्यांना कोणतीही तीव्र अथवा मध्यम स्वरूपाची लक्षणे नाहीत. त्यामुळे स्वतः:च्या घरी ते होम आयसोलेशनमध्ये आहेत.

शहरात आढळले आठ पॉझिटिव्ह

आरोग्य विभागाने सोमवारी शहरातील १२६ संशयितांची कोरोना टेस्ट केली होती. त्यातील तीन पुरुष व पाच महिलांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत.

दिलासादायक बाब म्हणजे दोन दिवसांत शहरातील नऊ रुग्ण बरे झाले आहेत. शहरात आता कोरोनाचे १५ रुग्ण उपचार घेत आहेत.

नागरिकांनी गर्दीत जाऊ नये, घरातील ज्येष्ठ विशेषतः: को-मॉर्बिड (पूर्वी आजार असलेले लोक) रुग्णांची काळजी घ्यावी, गर्दीत मास्कचा वापर करावा, प्रतिबंधित लसीचा डोस घ्यावा, असे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.