esakal | बाप रे! साडेचार हजार घरांमध्ये डेंग्यूच्या अळ्या
sakal

बोलून बातमी शोधा

सोलापूर

बाप रे! साडेचार हजार घरांमध्ये डेंग्यूच्या अळ्या

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

सोलापूर : शहरात डेंग्यूच्या साथीने डोके वर काढले असून, अवघ्या तीन महिन्यात 479 डेंग्यू रुग्ण आढळले आहेत. गतवर्षीच्या तुलनेत यंदाची साथ दहापटीने अधिक आहे. साथीवर नियंत्रण आणण्यासाठी महापालिका प्रशासनाने केलेल्या 40 हजार घरांच्या तपासणीत 4 हजार 617 ठिकाणी डेंग्यूच्या अळ्या सापडल्या आहेत. भवानी पेठ, जुळे सोलापूर, विडी घरकूल, कुमठा नाका हे परिसर डेंग्यूचा हॉटस्पॉट बनले आहेत. बालरुग्णालये हाऊसफुल्ल झाली आहेत.

मे महिन्यात कोरोना लाट ओसरली तर जून महिन्यापासून शहरात डेंग्यूची साथ सुरू झाली. या तीन महिन्यात 1 हजार 77 डेंग्यूसदृश रुग्णांची तपासणी करण्यात आली. त्यात शहरात तब्बल 479 डेंग्यूचे रुग्ण आढळून आले. डेंग्यूबाधितांमध्ये बालकांचा 90 टक्के समावेश आहे. स्वच्छ पाण्यामध्ये आढळणाऱ्या डासांपासून हा अजार फैलावतो. पाण्याच्या साठवणुकीतून हा आजार बळवतो. डेंग्यूच्या साथीवर नियंत्रण आणण्यासाठी महापालिका प्रशासनाकडून फवारणी, धुराळणी सुरू असली तरी हा प्रभावी उपाय ठरत नाही. घरोघरी जाऊन पाण्याची तपासणी करण्यात येत आहे.

हेही वाचा: 'पडळकर नवीन उगवलेलं गवत, त्यांना अजून मूळ सापडलं नाही'

भवानी पेठ येथील परिसरात डेंग्यू अळ्यांचा प्रार्दूभाव अधिक दिसून आला. पाण्याच्या साठवणुकीच्या कालवधीवर निर्बंध आणणे गरजेचे आहे. महापालिकेतील पाणी नियोजनाचे तीन-तेरा पाहता हे प्रत्यक्षात नागरिकांना शक्‍य नाही. त्यातच हद्दवाढ भागात चार-पाच दिवसाआड पाणी येत असल्याने प्रत्येक कुटुंबियांकडे साठवणुकीसाठी साधने अधिक आहेत. गेल्या तीन महिन्यांपासून वाढत असलेल्या डेंग्यू साथीमुळे शहरातील सर्व छोटी-मोठी बालरुग्णालये हाऊसफुल्ल झाली आहेत.

डेंग्यूचे शहरातील हॉटस्पाट

भवानी पेठ, जुना विडी घरकुल, अक्कलकोट रोड, जुळे सोलापूर, गांधी नगर, शेळगी, कुमठा नाका या परिसरात डेंग्यूरुग्णांची संख्या अधिक आहे.

हेही वाचा: बोरीवलीत इमारतीच्या सातव्या मजल्यावर भीषण आग

डेंग्यू रुग्णसंख्येत दहापटीने वाढ

  1. जानेवारी ते डिसेंबर 2020 : तपासणी 204, डेंग्यू रुग्ण 48

  2. जून 2021 : तपासणी 102, डेंग्यू रुग्ण 40

  3. जुलै 2021 : तपासणी 333, डेंग्यू रुग्ण 157

  4. ऑगस्ट 2021 : तपासणी 1282, डेंग्यू रुग्ण 642

शहरातील डेंग्यूच्या साथीवर नियंत्रण आणण्यासाठी आरोग्य विभागाची 150 जणांची टीम कार्यरत आहे. यामध्ये 107 कर्मचारी प्रभागनिहाय फवारणी व धुराळणीचे काम करीत आहेत. 17 जणांची टीम ही घरोघरी जावून आरोग्य तपासणी व पाण्याचे कंटनेर तपासणी करीत आहेत. नियोजबध्द उपाययोजना करीत आहोत. नागरिकांमध्ये कोरडा दिवस पाळण्याबाबत जनजागृती करण्यात येत आहे.

- डॉ. पूजा नक्का, वैद्यकीय अधिकारी, महापालिका

loading image
go to top