esakal | "विठ्ठल'च्या कारभारात उपमुख्यमंत्र्यांचे लक्ष ! वाद मिटवण्याचा प्रयत्न; कारखाना निवडणुकीची सूत्रे हाती घेण्याचे संकेत
sakal

बोलून बातमी शोधा

Ajit_Pawar.

पंढरपूर तालुक्‍याचे आर्थिक आणि राजकीय सत्ताकेंद्र म्हणून ओळख असलेल्या विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या कारभारात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी लक्ष घातले आहे. गुरुवारी श्री. पवार यांनीच जाहीर सभेत तसे स्पष्ट केले. 

"विठ्ठल'च्या कारभारात उपमुख्यमंत्र्यांचे लक्ष ! वाद मिटवण्याचा प्रयत्न; कारखाना निवडणुकीची सूत्रे हाती घेण्याचे संकेत

sakal_logo
By
भारत नागणे

पंढरपूर (सोलापूर) : पंढरपूर तालुक्‍याचे आर्थिक आणि राजकीय सत्ताकेंद्र म्हणून ओळख असलेल्या विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या कारभारात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी लक्ष घातले आहे. गुरुवारी श्री. पवार यांनीच जाहीर सभेत तसे स्पष्ट केले. त्यामुळे विधानसभा निवडणुकीनंतर विठ्ठल कारखान्याच्या निवडणुकीची सूत्रे अजित पवार यांच्या हाती जाणार, हे आता स्पष्ट झाले आहे. 

1977 साली (कै.) यशवंतराव चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली (कै.) औदुंबरअण्णा पाटील यांनी गुरसाळे येथील माळरानावर विठ्ठल साखर कारखान्याची उभारणी केली. औदुंबर पाटील यांनी अवघ्या काही वर्षातच विठ्ठल कारखाना राज्यात नावारूपाला आणला. परंतु 1996 साली झालेल्या कारखान्यावरील सत्तांतरामध्ये (कै.) वसंतराव काळे हे विठ्ठलचे अध्यक्ष झाले. त्यानंतर 2000 पासून ते 2019 पर्यंत तब्बल 19 वर्षे आमदार भारत भालके यांचे कारखान्यावर वर्चस्व होते. त्यांच्या अकाली निधनानंतर त्यांचे पुत्र भगीरथ भालके हे कारखान्याचे अध्यक्ष झाले. (कै.) औदुंबरअण्णा पाटील यांची कारखान्यावरील सत्ता गेली आणि कारखान्याच्या आर्थिक स्थितीला घरघर लागली. 

गेल्या 20 ते 25 वर्षांमध्ये फायद्यात असलेला कारखाना आज सुमारे 550 ते 600 कोटींच्या कर्जात आहे. वाढत्या कर्जामुळे कारखान्याचे आर्थिक चाक रुतून बसले आहे. कारखान्याकडे ऊस गाळप हंगामासाठी भांडवल उपलब्ध होत नसल्याने त्याचा थेट परिणाम कारखान्याच्या ऊस गाळपावर झाला आहे. प्रतिदिन 10 हजार टन गाळप क्षमता असलेला कारखाना मागील काही हंगामात जेमतेम तीन ते चार हजार टनाने चालला आहे. त्यामुळे कारखान्याच्या आर्थिक अडचणी वाढल्या आहेत. 

भारत भालके यांच्या निधनानंतर कारखान्याची धुरा भगीरथ भालके यांच्या हाती देण्यात आली आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली मागील वर्षीचा गाळप हंगाम झाला. परंतु त्यांनाही कारखाना पूर्ण क्षमतेने चालवणे शक्‍य झाले नाही. आजही ऊस उत्पादक शेतकऱ्यांची एफआरपी आणि कामगारांचा पगारी थकला आहे. अशा अडचणीच्या काळातच विधानसभा पोटनिवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. आमदारकी आणि कारखान्याचे अध्यक्षपद हे भालकेंकडे ठेवणे किती योग्य आणि अयोग्य, याबाबत स्वतः अजित पवारांचे त्याविषयी विचारमंथन सुरू आहे. 

दरम्यान, कारखान्याच्या निवडणुकीपूर्वीच विठ्ठल परिवारात कुरबुरी सुरू झाल्या आहेत. त्यातून (कै.) औदुंबर पाटील यांचे नातू विठ्ठल कारखान्याचे संचालक युवराज पाटील यांनी ऐन विधानसभा पोटनिवडणुकीच्या तोंडावर भगीरथ भालकेंच्या विरुद्ध बंड पुकारले. त्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष व जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी या वादावर पडता टाकत, विठ्ठल परिवारातील युवराज पाटील, कल्याणराव काळे यांना एकाच व्यासपीठावर आणले आहे. 

उपस्थितांकडून दाद 
गुरुवारी कल्याणराव काळे यांचा अजित पवारांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेशही झाला. याच वेळी अजित पवार यांनी विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत व त्यानंतर कारखान्याच्या कारभारात आपण स्वतः लक्ष घालणार असल्याचे जाहीरपणे सांगितले. त्यावर उपस्थितांनी त्यांना दाद दिली. एकूणच, पंढरपूच्या पोटनिवडणुकीनंतर होणाऱ्या विठ्ठल कारखान्याच्या निवडणुकीची आणि कारखान्याच्या कारभाराची सूत्रे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हाती असतील, हे आता स्पष्ट झाले आहे. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

loading image