भाजप जिल्हाध्यक्षांच्या निवडीची उत्सुकता 

भाजप जिल्हाध्यक्षांच्या निवडीची उत्सुकता 

सोलापूर ः भाजपचे विद्यमान जिल्हाध्यक्ष शहाजी पवार यांचा कार्यकाळ संपला आहे. मात्र, अद्यापही पक्षाने नव्या जिल्हाध्यक्षांची निवड केली नाही. एकीकडे शिवसेनेने सोलापूर जिल्ह्यासाठी तीन-तीन जिल्हाप्रमुखांची नेमणूक केली आहे. मात्र, भाजप अद्याप एकाही जिल्हाध्यक्षांची निवड करू शकला नाही. नव्या अध्यक्षांची निवड करताना निष्ठावंतांना संधी मिळणार की नव्याने आलेल्यांवर पक्षाची जबाबदारी सोपविणार याबाबत श्रेष्ठींच्या निर्णयाकडे कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहे. 

केंद्रीय गृहमंत्री तथा भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्याप्रमाणेच भाजपचे जिल्हाध्यक्ष पवार यांना दोन टर्म जिल्हाध्यक्ष म्हणून काम करण्याची संधी मिळाली. त्यांच्या कार्यकाळात पक्षाला चांगले दिवस आले आहेत. देश, राज्य व जिल्ह्यातही पक्षाला सत्ता संपादन करता आली. पक्षाने शहराध्यक्षपदाची निवड केली आहे. मात्र, जिल्हाध्यक्षांच्या निवडीबाबत चालढकल केली जात आहे. 12 फेब्रुवारीला सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आल्यानंतर प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी माजीमंत्री विजयकुमार देशमुख हे जिल्हाध्यक्ष होऊ शकत नसल्याचे वक्तव्य केले होते. त्यामुळे पक्षाचा नवीन अध्यक्ष कोण होणार याबाबत कार्यकर्त्यांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे. 

माजी खासदार रणजितसिंह मोहिते-पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्यांच्या प्रवेशामुळे पक्षाला माढा लोकसभा व माळशिरस विधानसभेची जागा जिंकता आली आहे. त्यामुळे मोहिते-पाटील कुटुंबातील जिल्हा परिषदेचे माजी सदस्य धैर्यशील मोहिते-पाटील यांच्या नावाची जिल्हाध्यक्ष पदासाठी चर्चा सुरू आहे. मात्र, त्यांना पक्षामध्ये येऊन काही महिनेच झाले आहेत. त्यांना जर जिल्हाध्यक्ष केले तर पक्षातील निष्ठावंत नाराज होतील का? याचाही विचार पक्षाकडून केला जात आहे. कदाचित त्यामुळेच जिल्हाध्यक्षांची निवड लांबणीवर पडली आहे. धैर्यशील मोहिते-पाटील यांच्याशिवाय आमदार सचिन कल्याणशेट्टी, सांगोल्याचे माजी जिल्हा परिषद सदस्य श्रीकांत देशमुख, बोरगावचे राजकुमार पाटील यांच्या नावाची चर्चाही जिल्हाध्यक्षपदासाठी सुरू आहे. त्यामुळे यापैकी कोणाची वर्णी लागणार की नव्याच चेहऱ्याला संधी मिळणार याबाबत कार्यकर्त्यांमध्ये उत्सुकता आहे. 

जिल्हाध्यक्ष हवा लोकसंपर्क असणारा 
राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आहे. त्यामुळे त्या सरकारच्या विरोधात रस्त्यावर उतरण्यासाठी लोकसंपर्क असणारा व जिल्ह्याच्या राजकारणाची नाळ माहीत असलेला नवा जिल्हाध्यक्ष करणे भाजपसाठी सोईचे ठरणार आहे. त्यामध्ये कुणाला संधी मिळते हे पाहणे औत्सुक्‍याचे आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com