शिक्षकांचा अनुशेष भरल्याशिवाय शैक्षणिक प्रगती अशक्यच; ३२ हजार शिक्षकांची लवकरच भरती

पट चांगला असतानाही शिक्षकांअभावी शिक्षणाचा खेळखंडोबाच झाल्याची स्थिती आहे. या पार्श्वभूमीवर, राज्य सरकारने ३२ हजार शिक्षकांची पदभरतीचा निर्णय घेतला आहे. त्यातून काहीसा फरक पडेल, पण शिक्षकांचा अनुशेष भरून काढल्याशिवाय शैक्षणिक प्रगती अशक्यच आहे.
schools
schoolssakal

सोलापूर : कोणत्याही शाळेत गेलो की तेथे एकच सूर आळवला जायचा, तो म्हणजे काय करावं शिक्षकांची संख्याच कमी आहे. तर दुसरीकडे नवीन शिक्षक म्हणायचे शिक्षणसेवक म्हणून मानधन खूपच कमी आहे. आता मुलांचा पट चांगला असतानाही शिक्षकांअभावी शिक्षणाचा खेळखंडोबाच झाल्याची स्थिती आहे. या पार्श्वभूमीवर, राज्य सरकारने ६६ हजार ७०० रिक्तपदांपैकी ३२ हजार शिक्षकांची म्हणजे जवळपास ५० टक्के पदभरतीचा निर्णय घेतला आहे. त्यातून काहीसा फरक पडेल, पण शिक्षकांचा अनुशेष भरून काढल्याशिवाय शैक्षणिक प्रगती अशक्यच आहे.

शिक्षण सेवकांच्या मानधनात दहा हजारांची भरघोस वाढ केली आहे. त्यानुसार, पहिली तीन वर्षे प्राथमिक व उच्च प्राथमिक शाळांवरील शिक्षण सेवकाला १६ हजार तर माध्यमिक शाळांवरील शिक्षण सेवकांना १८ हजार आणि उच्च माध्यमिक महाविद्यालयातील शिक्षण सेवकांना २० हजार मानधन मिळणार आहे. मात्र, शिक्षणासारख्या पायाभूत सुविधेत रिक्त पदांचा अनुशेष पूर्णपणे भरून काढल्याशिवाय शैक्षणिक प्रगतीचा आलेख पूर्णपणे उंचावणार नाही, ही वस्तुस्थिती नाकारता येणार नाही.

राज्यातील खासगी अनुदानित व स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये जवळपास दहा वर्षांपासून शिक्षक भरतीच झालेली नाही. त्यामुळे सध्या तब्बल ६७ हजार पदे रिक्त झाल्याची शिक्षण विभागाची माहिती आहे. या पार्श्वभूमीवर, आता ५० टक्के पदे भरली जातील. त्यात खासगी संस्थांमधील १७ हजार तर शासकीय म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये १५ हजार पदे आहेत. शिक्षक होण्यासाठी ‘टेट'चे बंधन असून त्याची परीक्षा नुकतीच पार पडली असून आता या महिन्यातच परीक्षेचा निकाल जाहीर होणार आहे. निकालानंतर गुणवत्ता यादी प्रकाशित होऊन शिक्षक भरती सुरु होईल.

एकाचवेळी तब्बल ३२ हजार ३०० शिक्षक भरती होण्याची दहा-बारा वर्षांतील पहिलीच वेळ असेल. शिक्षणाव्यतिरिक्त शिक्षकांवर अतिरिक्त कामाचाच ताण दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे पाचवा, सहावा अन् सातवा वेतन आयोग लागू झाल्यानंतरही अनेक शिक्षकांनी स्वेच्छानिवृत्तीचा सुखकर मार्ग चोखाळला. बहुतांश शाळांमध्ये पटसंख्या वाढल्याचे सर्वेक्षण आहे. या सर्व प्रकारानंतर शिक्षकांची हवी तशी भरती झाली नाही. शैक्षणिक संस्थांचे विविध प्रकारचे अनुदान पूर्वीसारखे राहिले नाही. संस्थांना शासकीय यंत्रणेबरोबर सतत लढावे लागते. त्यातच शिक्षकांची कमी झालेल्या संख्येचे त्यांच्यासमोर मोठे आव्हानच होते.

राज्यातील विविध खासगी संस्था व शासकीय शिक्षकांच्या ३२ हजार ३०० जागा भरण्यासाठी शासनाने परीक्षा घेतली, तेव्हा तब्बल दोन लाख ४० हजार उमेदवारांनी परीक्षा दिली. सध्याच्या स्पर्धात्मक युगात रिक्त जागा आणि उमेदवार, यांचे प्रमाण मोठे व्यस्त झाले आहे. शिक्षकांची संख्या कमी असल्यामुळे शिक्षणासारख्या पायाभूत रचनेवर मोठा ताण पडत होता. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेकडे उपलब्ध शिक्षकांना पुरेसा वेळ देता येत नव्हता. शैक्षणिक गळतीचे प्रमाण वाढण्यासाठी हा एक मुद्दा महत्त्वाचा ठरत होता. गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेली शिक्षक भरती आता जूनपूर्वी होणार असल्याने बेरोजगार उमेदवार व शैक्षणिक संस्था चालकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.

‘खासगी’ शिक्षक निवडीत वशिलेबाजी बंद होईल

पूर्वी बहुतेक शैक्षणिक संस्था आपल्या नात्यातील उमेदवारांना प्राधान्य देत होत्या. परंतु, शासनाच्या नवीन निकषांनुसार ‘टेट’ उत्तीर्णचे बंधन आणि एका जागेसाठी दहा उमेदवारांच्या मुलाखतीचे बंधन घातल्याने त्यातून एकाची निवड करणे क्रमप्राप्त आहे. निवड नाकारणारा न्यायालयात किंवा शालेय शिक्षण आयुक्त तथा शिक्षण संचालकांकडे दाद मागायला गेला, तर संबंधित शैक्षणिक संस्थेला त्याचे अचूक कारण द्यावे लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे वशिलेबाजीचा प्रकार (शंभर टक्के नसला तरी) काही प्रमाणात का होईना कमी होईल, असे वाटते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com