महापालिकेचे कर्मचारी आहोत म्हणून शिरले घरात! निवृत्त प्राध्यापकाच्या घरातून साडेचौदा तोळे दागिने घेऊन दोघे पसार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Crime Chori
महापालिकेचे कर्मचारी आहोत म्हणून शिरले घरात! निवृत्त प्राध्यापकाच्या घरातून साडेचौदा तोळे दागिने घेऊन दोघे पसार

महापालिकेचे कर्मचारी आहोत म्हणून शिरले घरात! निवृत्त प्राध्यापकाच्या घरातून साडेचौदा तोळे दागिने घेऊन दोघे पसार

सोलापूर : ‘महापालिकेच्या टॅक्स विभागाचे कर्मचारी आहोत, तुम्ही टॅक्स भरलाय का, तुमच्या बाथरूमचे कनेक्शन ड्रेनेज लाईनला जोडायचे आहे’ असे सांगून दोघेजण घरात शिरले. त्यांनी घरात सेवानिवृत्त प्राध्यापक दिनेश सुरवसे (वय ६८) व त्यांची पत्नी लक्ष्मी सुरवसे (वय ६२) हे दोघेच असल्याची संधी साधून घरातील साडेचौदा तोळे दागिने घेऊन पोबारा केला. शुक्रवारी (ता. १०) सकाळी साडेअकराच्या सुमारास दमाणी नगरात हा प्रकार घडला.

शुक्रवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास एका काळ्या रंगाच्या दुचाकीवरून दोघेजण दमाणी नगरातील गडदर्शन सोसायटीत आले. त्यांनी एका महिलेला धोंडिबा सुरवसे कुठे राहतात, असे विचारले. त्यांनी सुरवसे यांचे घर दाखवले. दोन्ही अनोळखी इसमांनी दुचाकी सुरवसे यांच्या घराबाहेर लावून घरात प्रवेश केला. प्रकृती ठीक नसल्याने घरात सेवानिवृत्त प्राध्यापक दिनेश सुरवसे आणि त्यांच्या पत्नी लक्ष्मी जागेवरच बसून होत्या.

मुलगा अभिजित नेहमीप्रमाणे दुकानावर गेला होता आणि सुनबाई माहेरी होत्या. त्या दोघांनी आम्ही सोलापूर महापालिकेच्या टॅक्स विभागाचे कर्मचारी असून बाथरूमचे माप घ्यायचे असल्याचे सांगून त्यांना बोलण्यात गुंतवले. एकाने टॅक्स भरल्याची पावती घेऊन घराबाहेर बोलवले. त्याचवेळी घरातील त्या व्यक्तीने उघड्या कपाटातील सोन्याची पर्स लंपास केली. दिनेश सुरवसे यांना संशय आल्याने त्यांनी कपाटातील दागिने पाहिले, पण ते दिसले नाहीत.

शेजारील महिलेने मुलगा अभिजीत यांना फोन करून चोरी झाल्याची माहिती दिली. फौजदार चावडी पोलिसांना याची माहिती मिळताच सहायक पोलिस आयुक्त डॉ. संतोष गायकवाड, वरिष्ठ पोलिस निरीक्षक उदयसिंह पाटील, सहायक पोलिस निरीक्षक सतीश भोईटे यांच्यासह गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी त्याठिकाणी भेट दिली.

शेजारील महिलेची पोलिसांना मदत

चोरट्यांनी दिनेश सुरवसे यांचे घर कोणते आहे, हे ज्या महिलेला विचारले होते, त्या महिलेने पोलिसांना संशयितांचे वर्णन सांगितले. काळ्या दुचाकीवरून ते दोघे तेथे आले होते, असेही त्या महिलेने सांगितले. तर चोरटे एकमेकांमध्ये बोलताना कन्नडमधून तर आम्हाला बोलताना एकजण मराठीतून बोलत होता, असे माहिती दिनेश सुरवसे यांनी पोलिसांना सांगितले. दरम्यान, परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे नसल्याने पोलिसांना तेथील फुटेज मिळू शकले नाही. तरीपण, चोरटे लवकरच जेरबंद होतील, असा विश्वास फौजदार चावडी पोलिसांनी व्यक्त केला आहे.

टॅग्स :policecrimesolapur city