
सोलापूर : बेगमपुरात वाळू ठेकदाराकडून शेतकऱ्यांना मारहाण
कोरवली - मोहोळ तालुक्यात वाळू ठेकेदाराचा सध्या मोठ्या प्रमाणावर सुळसुळाट झाला आहे. बेगमपूर (ता.मोहोळ) येथील शेतकरी विनोद विश्वनाथ पाटील यांना भीमा नदी पात्रात मोटारीचा पाइप जोडत असताना मारहणा केली. या घटनेची कामती पोलिसात नोंद झाली आहे. विनोद विश्वनाथ पाटील यांची भीमा नदी काठावर शेती आहे. ता. २९ रोजी सायंकाळी विनोद विश्वनाथ पाटील हे त्यांचे सहकारी भास्कर पांडुरंग पाटील, दीपक औदुंबर पाटील, अभिषेक आप्पासाहेब पाटील (सर्व रा.बेगमपूर) यांना घेऊन शेतातील विद्युत मोटारीचा पाइप जोडण्यासाठी गेले होते. हे सर्वजण पाईप जोडत असताना वाळू ठेकेदार नागेश ताकमोगे (रा. सोलापूर), दत्तात्रय गणपत चव्हाण (रा.बेगमपूर), महावीर कदम (रा.बार्शी) व इतर ५० ते ६० अनोळखी व्यक्ती तेथे आले.
त्यातील दत्तात्रय चव्हाण यांनी आम्ही येथील वाळूचा ठेका घेतला आहे. तुमचा नदीत यायचा काही संबंध नाही, अशी धमकी दिली. त्यावर आम्ही मोटारीचा पाईप जोडण्यासाठी आलो आहोत, असे सांगत असताना त्यांनी शिवीगाळ करून हातातील काठ्यांनी मारहाण करून आम्हाला जखमी केले. हे भांडण सोडवण्यासाठी केशव बाबासाहेब पाटील आले असता त्यांनाही धक्काबुक्की करून त्याचे मोटार सायकलची तोडफोड केली आहे. अशा प्रकारची फिर्याद विनोद पाटील यांनी कामती पोलिसात दाखल केली आहे. या घटनेचा पुढील तपास पोलिस करीत आहेत. या घटनेमुळे बेगमपूर परिसरातील नदीकाठ काठालगतचे शेतकरी प्रचंड धास्तावले आहेत.