पंढरपुरात अजित पवारांना दाखवणार काळे झेंडे ! शेतीपंपाचा वीजपुरवठा बंद; "महाविकास आघाडी'विरोधात रोष

Ajit Pawar.
Ajit Pawar.

पंढरपूर (सोलापूर) : जिल्ह्यात शेतीपंपाच्या थकीत वीज बिलाचा कळीचा मुद्दा झाला आहे. कोरोना काळात थकलेल्या वीजबिल वसुलीसाठी महावितरण कंपनीने वीजपुरवठा तोडण्याची मोहीम सुरू केली आहे. या विरोधात आता शेतकरी संघटनांसह शेतकरीही आक्रमक झाले आहेत. सक्तीने वीजबिल वसुली सुरू केल्याने राज्यातील महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात जिल्ह्यातील शेतकऱ्यांमधून तीव्र रोष व्यक्त केला जात आहे. 

दरम्यान, रविवारी (ता. 21) उमपुख्यमंत्री अजित पवार आणि राष्ट्रवादीचे प्रदेश अध्यक्ष तथा जलसंपदा मंत्री जयंत पाटील पंढरपूर दौऱ्यावर येत आहेत. महाविकास आघाडीच्या या दोन्ही वजनदार मंत्र्यांना बळिराजा शेतकरी संघटना व भाजप कार्यकर्ते काळे झेंडे दाखवणार, असा इशारा दिला आहे. त्यामुळे वीजबिल वसुलीवरून सरकार आणि शेतकरी असा मोठा संघर्ष पेटण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. याचा फटका पंढरपूर पोट निवडणुकीतील राष्ट्रवादीच्या उमेदवाराला बसण्याची शक्‍यताही या निमित्ताने व्यक्त केली जात आहे. 

सततचा दुष्काळ, त्यातच नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. त्यातच गेल्या वर्षभरापासून कोरोनाचा संसर्ग सुरू आहे. दरम्यानच्या काळात शेती पिकांना भाव मिळाला नाही. एकीकडे वाढती महागाई आणि दुसरीकडे शेतीमालाला मिळणारा अत्यंत कमी भाव यामध्ये शेतकरी भरडला जात आहे. अशा संकट काळात शेतकऱ्यांना आर्थिक मदतीची गरज असताना उलट सक्तीने शेतीपंपाच्या वीज बिलाची वसुली सुरू केली आहे. जे शेतकरी वीजबिल भरू शकत नाहीत, अशा शेतकऱ्यांचा वीजपुरवठा तोडण्याचे काम सुरू आहे. 

पंढरपूर विभागाअंतर्गत येणाऱ्या पंढरपूर, मंगळवेढा आणि सांगोला भागातील शेकडो शेतकऱ्यांच्या शेतीपंपाचा वीजपुरवठा गेल्या तीन- चार दिवसांपासून बंद केला आहे. वीज बंद केल्यामुळे हातातोंडाशी आलेली पिके जळू लागली आहेत. शेतीपंपाचा वीज पुरवठा बंद करू नये अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने राज्य सरकारकडे केली आहे. वीजबिल वसुली विरोधात स्वाभिमानीने शुक्रवारी राज्यभरात रास्ता रोको आंदोलनही केले. तरीही वीजबिल वसुलीसाठी शेतीपंचाचा वीज पुरवठा तोडण्याचे काम सुरूच आहे. महावितरण कंपनीच्या या तुघलकी कारवाई विरोधात गावोगावचे शेतकरी आता रस्त्यावर उतरू लागले आहेत. आज महाविकास आघाडी व ऊर्जामंत्री नितीन राऊत यांच्या विरोधात पंढरपूर विभागात ठिकठिकाणी आंदोलने करून निषेध नोंदवण्यात आला. 

दरम्यान, उद्या (रविवारी) उपमुख्यमंत्री अजित पवार आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील हे पोट निवडणुकीच्या निमित्ताने पंढरपुरात येणार आहेत. त्यांनी शेतीपंपाच्या 
वीज तोडणीच्या निर्णया विरोधात स्थगिती आदेश घेऊनच पंढरपुरात यावे; अन्यथा महाविकास आघाडीच्या विरोधात आंदोलन करू, असा इशारा विविध शेतकरी 
संघटनांनी आज दिला आहे. यामध्ये बळिराजा शेतकरी संघटनेचे पश्‍चिम महाराष्ट्र अध्यक्ष माऊली हळणवर यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांना काळे झेंडे दाखवण्याचा इशारा दिला आहे. तर भाजपचे तालुकाध्यक्ष भास्कर कसगावडे यांनीही आक्रमक भूमिका घेत उपमुख्यमंत्री अजित पवारांची गाडी अडविण्याचा इशारा दिला आहे. त्यामुळे उद्याच्या बैठकीत उपमुख्यमंत्री अजित पवार याबाबत काय भूमिका घेतात, याकडेच जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com