esakal | समाधानकारक पाऊस ! अक्कलकोटमध्ये पेरण्या मार्गी लागण्याची आशा
sakal

बोलून बातमी शोधा

Akkalkot

समाधानकारक पाऊस ! अक्कलकोटमध्ये पेरण्या मार्गी लागण्याची आशा

sakal_logo
By
राजशेखर चौधरी

शेतकरी बांधव महागड्या खतांची व बियाणांची खरेदी करून ठेवलेली आणि जमिनीची मशागत सुद्धा केलेली होती. पण पेरणीसाठी पाऊस गायब झाला होता.

अक्कलकोट (सोलापूर) : अक्कलकोट (Akkalkot) शहर व तालुक्‍यातील सर्वच गावांत गेल्या पंधरा दिवसांपासून दडी मारलेल्या पावसाने (Rain) पुनरागमन केले असून, शुक्रवारी सलग चौथ्या दिवशी चांगला पाऊस झाला आहे. मात्र आज (शनिवारी) अद्याप पाऊस नसला तरी ग्रामीण भागापेक्षा अक्कलकोट शहरात पाऊस खूप मोठ्या प्रमाणावर बरसला आहे. ग्रामीण भागात जेमतेम पाऊस काही ठिकाणी झाल्याची माहिती आहे. अद्याप ग्रामीण भागात सार्वत्रिक पाऊस होताना दिसत नाही. असे जरी असले तरी अक्कलकोट तालुक्‍यात सर्वत्र समाधानकारक पाऊस होत असून, शेतकरी बांधवांवर दुबार पेरणीचे संकट टळून खोळंबलेल्या पेरण्या लागणार मार्गी लागणार आहेत. (Farmers are happy with satisfactory rainfall in Akkalkot taluka)

हेही वाचा: "उजनी'ला राष्ट्रीय प्रकल्प दर्जा मिळाल्यास पर्यटनवाढीस चालना

या पुनर्वसू नक्षत्राच्या चांगल्या पावसाने शेतकरी बांधवांत व नागरिकांत समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार सलग पाच दिवस पाऊस होण्याची शक्‍यताही खरी ठरताना दिसत आहे. शुक्रवारपर्यंत सलग चार दिवस झाले अक्कलकोट शहरात पाऊण तास दररोज चांगला पाऊस झाला आहे. शुक्रवारी सकाळपासून वातावरणात निर्माण झालेली उष्णता ही सायंकाळी पाऊस नक्की होणार असल्याचे सूचित करीत आहे. शेवटी सायंकाळी पाच ते नऊ वाजेपर्यंत छोटा- मोठा पाऊस झाला.

हेही वाचा: आट्यापाट्याच्या मैदानावरील मैत्री आली धावून !

शेतकरी बांधव महागड्या खतांची व बियाणांची खरेदी करून ठेवलेली आणि जमिनीची मशागत सुद्धा केलेली होती. पण पेरणीसाठी पाऊस गायब झाला होता. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले होते. ती चिंता आता दूर दूर झाली आहे. येत्या आठवड्यात आता वाफसा आल्यानंतर पेरणी वेगाने सुरू होणार आहे. कालपर्यंत तालुक्‍यातील उत्तर भागात जास्त पाऊस झालेला होता. तर दक्षिण भागातील जेऊर, करजगी व नागणसूर आदी भागात पाऊस झालेलाच नव्हता. त्यामुळे त्याची वाट चातकारखी पाहात होते. पण अखेर वरुणराजा प्रसन्न झाला असून, या हंगामातील एका चांगल्या पावसाची शहरात नोंद झाली आहे. शुक्रवारी जवळपास दीड तास चांगला पाऊस सायंकाळी झाला आणि तो खूप वेळ सुरूच होता आणि सर्वत्र पाणीच पाणी साचलेले पाहावयास मिळाले. काल शुक्रवारी झालेल्या जोरदार पावसाने अंदेवाडी ते दुधनी जाणाऱ्या रस्त्यावरील ओढ्यावर पाणी आल्याने वाहतूक ठप्प झाली होती. तालुक्‍यातील सर्वत्र झालेल्या पावसाने अनेक भागांत जलसंचय झालेला दिसला. तसेच गावाची ओढी व नाली भरून वाहिलेली दिसली. आता एकंदरीत समाधानकारक परिस्थिती दिसून येत आहे.

अक्कलकोटला तालुक्‍यात 10 जुलै रोजी नोंदलेली पावसाची आकडेवारी (शनिवार झालेला पाऊस व कंसातील आकडेवारी एकूण पाऊस मिलिमीटरमध्ये) : अक्कलकोट 60 (156), चपळगाव 24 (90), वागदरी 16 (96), किणी 22 (69), मैंदर्गी 05 (31), दुधनी 13 (84), जेऊर 15 (62), करजगी 12 (66), तडवळ 08 (41) असे आहे. यावरून अक्कलकोट तालुक्‍यात आजचा पाऊस 19.44 मिमी एवढा असून एकूण सरासरी आजपर्यंत 175 मिमी एवढा पाऊस झाला आहे.

loading image