
जिल्हाधिकाऱ्यांची पालकमंत्र्यांशी चर्चा! शाळांचा आज होणार अंतिम निर्णय
सोलापूर : ग्रामीणमधील कोरोनाचा पॉझिटिव्हीटी रेट हा 23 वरून 17 पर्यंत खाली आला आहे. मागील आठवड्याच्या तुलनेत रुग्णसंख्याही कमी होऊ लागली आहे. रुग्णालयात दाखल रुग्णांची संख्या खूपच कमी असून बहुतेक रुग्णांमध्ये कोणतीही लक्षणे नाहीत. राज्य सरकारनेही शाळा सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. या पार्श्वभूमीवर ग्रामीणमधील शाळा सुरु करण्याचा अंतिम निर्णय सोमवारी (ता. 31) घेतला जाणार आहे.
हेही वाचा: पैसे कोणी मागितले! ग्लोबल टिचर डिसलेंना द्यावे लागणार उत्तर, अन्यथा...
कोरोनाचा शिरकाव मार्च 2020 पासून महाराष्ट्रात झाला आणि त्याचा थेट परिणाम विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर झाला. दोन-तीन महिन्यांहून अधिक दिवस शाळा सुरु राहिल्या नाहीत. त्यामुळे विद्यार्थ्यांची बौध्दिक पातळी खालावली असून त्यांची गुणवत्ताही कमी झाल्याचे चित्र आहे. कोरोनाची तिसरी लाट अतिशय सौम्य असल्याने राज्य सरकारने शाळा सुरु करण्याचा निर्णय घेतला. परंतु, त्यासंबंधीचा अंतिम निर्णय घेण्याचा अधिकार स्थानिक प्रशासनावर सोपविला. सोलापूर महापालिकेने व जिल्हा परिषदेने शाळा सुरु करण्यासंदर्भात 31 जानेवारीपर्यंत थांबण्याची भूमिका घेतली. दरम्यान, आता कोरोनाचा पॉझिटिव्हीटी रेट कमी झाल्याने शाळा सुरु करायला हरकत नाही, असे प्रशासनाचे मत झाले आहे. महापालिका आयुक्त पी. शिवशंकर हे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांच्याशी चर्चा करून उद्याच (सोमवारी) निर्णय घेतील, असे बोलले जात आहे. तर पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्याशी चर्चा करून ग्रामीणचा निर्णय जिल्हाधिकारी शंभरकर हे सोमवारीच घेणार आहेत.
हेही वाचा: कधीतरी तयार झालेला रस्ता दाखवा MIDC रस्त्यांवरुन मनसेकडून शिवसेना ट्रोल
जिल्ह्यातील शाळांची स्थिती
झेडपी शाळा - 3746
विद्यार्थी संख्या - 2.01 लाख
माध्यमिक शाळ - 1087
विद्यार्थी संख्या - 1.98 लाख
ऍन्ड्राईड मोबाइल नाहीत -1.04 लाख
ग्रामीणमधील शाळा सुरु करण्यासंदर्भात जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांच्याशी चर्चा झाली आहे. उद्या (सोमवारी) पालकमंत्र्यांशी चर्चा करून शाळा सुरु करण्याचा अंतिम निर्णय घेतला जाईल. शाळा सुरु करण्यासाठी पोषक वातावरण असून पालकांचीही तशी मागणी आहे.
- दिलीप स्वामी, मुख्य कार्यकारी अधिकारी, सोलापूर जिल्हा परिषद
ऍन्ड्रॉईड मोबाइल नसलेल्यांसमोर अंधार
कोरोनाचा शिरकाव सुरु झाल्यानंतर विद्यार्थी शिक्षणाच्या प्रवाहापासून दूर जाऊ नये, त्यांच्यातील शिक्षणाची गोडी कायम राहावी, यादृष्टीने ऑनलाइन शिक्षण सुरु झाले. शिक्षक तंत्रस्नेही बनले, परंतु ज्या विद्यार्थ्यांच्या पालकांचे हातावरील पोट आहे, त्या विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षण घेता आले नाही. दोन वर्षे उलटली, परंतु त्यांच्यापर्यंत ऑनलाइन शिक्षण पोहचलेच नाही. त्या जवळपास एक लाखांहून अधिक विद्यार्थ्यांच्या भवितव्यासाठी शाळा सुरु होणे गरजेचे आहे. त्यावेळी मुख्याध्यापक, शिक्षक व पालकांनी विद्यार्थ्यांच्या आरोग्याला प्राधान्य द्यायला हवे.
Web Title: Final Decision Of The Schools Will Be Taken Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..