Solapur : ‘बेताल’ वक्तव्याने माजी आमदार राजन पाटील अडचणीत; प्रकरण महिला आयोगाकडे जाणार?

राज्यभर उठले चर्चेचे मोहोळ, महिला आयोगाकडे तक्रार दाखल करण्याची चाचपणी, जीभ घसरण्याने पेटला वेगळाच वाद
Solapur
Solapursakal

सोलापूर : टाकळी सिंकदर(ता.मोहोळ) येथील भीमा साखर कारखान्याच्या निवडणूक प्रचारादरम्यान भीमा बचाव आघाडीचे पॅनल प्रमुख आणि राष्ट्रवादीचे माजी आमदार राजन पाटील यांनी केलेल्या अत्यंत वादग्रस्त वक्तव्याने, अक्षरश: वातावरण ढवळून निघाले असून त्यांच्या ‘त्या’ वक्तव्याने महिलांना अपमानीत झाल्याचा बोलबाला असून, याबद्दल महिला वर्गामधून प्रचंड रोष व्यक्त केला जात असल्याची चर्चा आहे. पाटील यांच्या ‘त्या’ वक्तव्याच्या पार्श्‍वभूमीवर, महिला आयोगाकडे तक्रार दाखल करण्यासाठी चाचपणी सुरु झाल्याची माहिती समोर येत आहे.

खास बाब म्हणजे पाटील यांच्या ‘बेताल’ वक्तव्यावरुन उभ्या महाराष्ट्रात चर्चेेचे मोहोळ उठले असून त्यांच्या जीभ घसरण्यावरुन वेगळाच वाद पेटला आहे. माजी आमदार पाटील हे अडचणीत आले आहेत.

भीमा साखर कारखान्याची निवडणूक उद्या रविारी होत आहे. या निवडणूकीच्या निमित्ताने, प्रचाराचे रणांगण भयावह तापले आहे. सत्ताधारी महाडिक गटाने विरोधी माजी आमदार राजन पाटील व प्रशांत परिचारक गटापुढेे मोठे आव्हान उभे केले आहे. महाडिक तसेच पाटील आणि परिचारक यांच्या राजकीय अस्त्विाची दिव्य परीक्षा या निवडणुकीच्या निमित्ताने होत आहे. त्यांची प्रतिष्ठापणाला लागली आहे.

दरम्यान काल शुक्रवारी निवडणुकीच्या जाहीर प्रचाराच्या टाकळी सिंकदर येथील शेवटच्या सभेत माजी आमदार राजन पाटील यांची जीभ चांगलीच घसरली.‘पाटलांच्या पोरांना लग्नाआधीच एवढी बाळं असतात, याचा आम्हाला स्वाभिमान आहे’ असं वादग्रस्त विधान त्यांनी केले आहे. विशेषत्वे, एवढ्यावच ते थांबले नाहीत. ‘आमच्या पोरांना भिती दाखवता का? वयाच्या 17 व्या वर्षी 302 कलम भोगणारी आमची पोरं हायती’ असे वादग्रस्त विधान करून त्यांनी पोराच्या गुन्हेगारी प्रवृत्तीचे जणू समर्थनच केले.

माजी आमदार पाटील यांच्या या वादग्रस्त वक्तव्याने महाराष्ट्रातील पाटील मंडळींना बदनाम करण्याचा तर प्रकार झालाच, शिवाय महिला अपमानीत होतील, दुखावल्या जातील, याबरोबरच मुलाच्या गुन्हेगारीचे उदात्तीकरण करणे असे अर्थ आता त्यांच्या वादग्रस्त विधानांशी लावले जात आहेत. तशी चर्चा सर्वत्र सुुरु आहे. पाटील यांच्या या वक्तव्याने दुसराच वाद पेटला असून राज्यभर त्याची चर्चा सुरु झाली आहे. पाटील यांची जीभ घसरल्याने त्यांची मोठी पंचार्ईत झाली आहे. ते अडचणीत आल्याचे मानले जात आहे.

पाटील यांच्या विधानावर खरपुस समाचार

माजी आमदार राजन पाटील यांनी जी अत्यंत वादग्रस्त विधाने केली, त्याचा खरपुस समाचार राष्ट्रवादीचे प्रदेश प्रवक्ते उमेश पाटी यांना एका जाहीर सभेतून घेतला आहे. ‘लग्नाअधीच पोरं आहेत, असे म्हणणार्‍या, महिलांचा अपमान होर्ईल, महाराष्ट्रातील समस्त पाटील मंडळींची बदनामी होईल, याशिवाय पोरांच्या गुन्हेगारी प्रवृत्तीचा अभिमान आहे, अशी बेताल वक्तव्य करणार्‍या विकृत माणसाच्या हाती भीमा कारखान्याची सत्ता सोपविणार का? असा सवाल त्यांनी उपस्थित करीत राजन पाटील यांना चांगलेच खिंडीत गाठल्याची चर्चा आहे.

वादग्रस्त वक्तव्य आणि योगायोग

वादग्रस्त वक्तव्य आणि योगायोग याचा प्रत्यय काल भीमा कारखान्याच्या टाकळी सिंकदर येथील सभेवेळी आला. फौजी आणि त्यांच्या परिवाराला वाईट वाटेल अशा आक्षेपार्ह वक्तव्याने माजी आमदार प्रशांत परिचारक हे प्रचंड अडचणीत आले होते. समाजामधील त्यांची प्रतिमा डागाळली. या वक्तव्याची किंमत त्यांना खुप मोजावी लागली. तेच परिचारक कालच्या टाकळी सिंकदर येथील प्रचारसभेवेळी व्यासपीठावर होते. ज्या व्यासपीठावरुन राजन पाटील यांनी बेताल वक्तव्ये केली. पाटील यांच्या बेताल वक्तव्यावेळी परिचारक हे त्यांच्याकडे पहात होते.भीमा कारखान्याच्या तापलेल्या रणांगणात राजन पाटील यांची शेवटची सभेतील वक्तव्य अडचणीची ठरली. जाहीर प्रचार सभांचा शेवट गोड झाला नाही, अशा प्रतिक्रिया व्यक्त केल्या.

शिवाजी भोसले, उपसंपादक, सोलापूर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com