Solapur News: सरकारकडून प्रोत्साहन अनुदानाचा निधी मंजूर! जिल्ह्यातील २७४० शेतकऱ्यांना मिळणार ११ कोटी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Eknath Shinde Fadanvis
सरकारकडून प्रोत्साहन अनुदानाचा निधी मंजूर! जिल्ह्यातील २७४० शेतकऱ्यांना मिळणार ११ कोटी

Solapur News: सरकारकडून प्रोत्साहन अनुदानाचा निधी मंजूर! जिल्ह्यातील २७४० शेतकऱ्यांना मिळणार ११ कोटी

Solapur News : बॅंकांकडून घेतलेल्या कर्जाची नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना सरकारच्या माध्यमातून प्रत्येकी ५० हजारांचे प्रोत्साहन अनुदान मिळाले. पण, अनेक शेतकऱ्यांना निधीअभावी लाभ मिळाला नव्हता.

अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी राज्य सरकारने अनुदानाच्या प्रतीक्षेतील शेतकऱ्यांसाठी निधी मंजूर केला. त्यामुळे सोलापूर जिल्ह्यातील दोन हजार ७४० शेतकऱ्यांसाठी ११ कोटी रुपये मिळणार आहेत.

महाविकास आघाडी सरकारने नियमित कर्जदार शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर अनुदानाची घोषणा केली, पण अनुदान वितरीत केले नव्हते. शिंदे-फडणवीस सरकारने अनुदान वितरीत केले. मात्र, त्यासाठी पुरेसा निधी नसल्याने १० ऑक्टोबर २०२२ ते १५ फेब्रुवारी २०२३ या कालावधीत तब्बल नऊ टप्प्यात निधी वितरीत करण्यात आला.

तरीदेखील अनेक शेतकऱ्यांना प्रोत्साहन अनुदान मिळालेले नव्हते. त्यांच्यासाठी राज्य सरकारने आता पुरवणी मागण्यातून तरतूद केली आहे. त्यामुळे आता काही दिवसांतच त्या नियिमत कर्जदार शेतकऱ्यांना अनुदान मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. ही रक्कम शेतकऱ्यांच्या बचत खात्यात जमा केली जाणार आहे.

‘डीसीसी’चे तालुकानिहाय लाभार्थी

आता प्रोत्साहनपर अनुदान मिळणाऱ्यांमध्ये जिल्हा बॅंकेचे एक हजार ७४० तर राष्ट्रीयीकृत बॅंकांचे जवळपास एक हजार शेतकरी आहेत.

जिल्हा बॅंकेच्या माध्यमातून आता उत्तर सोलापूर तालुक्यातील १६, दक्षिण सोलापूर २२३, पंढरपूर तालुक्यातील ११२, सांगोल्यातील ३२८, माळशिरसमधील ३११, बार्शीतील १९३, करमाळ्यातील ८८, माढ्यातील ४०, मोहोळ तालुक्यातील २६४, अक्कलकोट तालुक्यातील १२७ आणि मंगळवेढ्यातील ३८ शेतकऱ्यांना सात कोटी रुपयांचे प्रोत्साहनपर अनुदान मिळणार आहे.